आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२५ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
तुळजापूर इथं काल केंद्र शासनाच्या ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी
मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक
सचिन सूर्यवंशी यांनी, सन २०२२ पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्यासाठीची सात सूत्रं
सांगितली. शेतीमालाला अधिक भाव देण्यासह शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारुन शेती मालाला
जास्त भाव देण्यावर सरकारचा भर असल्याचं ते म्हणाले.
****
लातूर
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या
दिवशी ३२ पैकी २३ जागी सदस्य बिनविरोध निवडून आले. जिल्हा परिषदेसाठीच्या २३ पैकी १८
जागा आणि महापालिकेसाठीच्या पाचही जागांवर
सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाच जागेसाठी आठ अर्ज, नगर पालिका
विभागातल्या तीन जागासाठी १० अर्ज, नगर पंचायत विभागाच्या एका जागेसाठी ३ अर्ज दाखल
झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रदीप मरवाळे यांनी दिली.
****
शासकीय
योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंच, पदाधिकारी तसंच अधिकाऱ्यांनी
पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्यात करमाड इथं महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबीराच्या समारोप प्रसंगी
ते काल बोलत होते. ‘या शिबिराच्या माध्यमातून एक हजारावर प्रमाणपत्रं वितरित करण्यात
आली.
****
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागानं देशात अनेक
उपक्रमांत पहिला क्रमांक घेतलेला आहे. मालमत्तेच्या सर्च रिपोर्टच्या बाबतीत सुध्दा
विभागानं अत्याधुनिक पध्दतीनं डाटा तयार केलेला असून त्याचा बॅंकांनी फायदा घेण्याचं
आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तसंच मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी केलं आहे.
नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार
परिषदेत लातूर इथं ते काल बोलत होते. ई रजिस्ट्रेशन सुरु करण्यात राज्याचा मुद्रांक
विभाग देशात पहिला असल्याचं कवडे यांनी यावेळी सांगीतल .
****
No comments:
Post a Comment