Friday, 25 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 25.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी घरोघरच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना दुपारनंतर होत आहे. यंदा अनंत चतुर्दशी पाच सप्टेंबर रोजी असल्यानं, गणेशोत्सव दहा ऐवजी बारा दिवस साजरा होणार आहे. नागरिकांनी हा उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन विविध पर्यावरणवादी तसंच सामाजिक संघटनांकडून केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, गणेशोत्सवानिमित्त आपणां सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो, अशा शब्दांत मराठीतून शुभेच्छा दिल्या.

****

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेचे अध्यक्ष ए.व्यंकय्या नायडू यांनी त्यांना शपथ दिली. शहा तसंच इराणी यांची गुजरातमधून राज्यसभेवर निवड झाली आहे.

****

सक्तवसुली संचालनालयाच्या एका सहाय्यक संचालकाला १० लाख रूपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागानं अटक केली. त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. शशी शेखर आणि राजकुमार अग्रवाल अशी या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ए.जी.पेरारिवलन याला तामिळनाडू सरकारनं एका महिन्याचा पॅरोल मंजूर केला आहे. आजारी वडिलांची भेट घेण्यासाठी पेरारिवलनना पॅरोल मंजूर केला गेला आहे. या कालावधीत पेरारिवलनच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश सरकारने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. पेरारिवलनच्या आईसह काही राजकीय पक्षांनी पेरारिवलनला पॅरोल देण्यासंदर्भातील मागणी सरकारकडे केली होती.
****

आगामी दोन ते तीन वर्षात देशाचा विकास दर आठ टक्क्यांच्यावर जाण्याची शक्यता आहे, असं, नीति आयोगानं म्हटलं आहे. नीति आयोगानं काल आपल्या तीन वर्षीय कार्ययोजनांची घोषणा करताना ही माहिती दिली. यासोबतच पुढील दशकात गरीबीच्या दराततही मोठ्या प्रमाणात घट होईल असं आयोगानं म्हटलं आहे.

****

२०० रुपये मूल्याची नोट आजपासून चलनात येणार असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. विमुद्रीकरणानंतर निर्माण झालेला चलन तुटवडा भरुन काढण्यास यामुळे मदत मिळणार असून, २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.

****

मागासवर्गियांचं पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे. यासाठी ज्येष्ठ वकील ॲङ हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. उच्च न्यायालयानं या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली आहे. या निकालाविरोधात राज्य शासन मुदतीच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.

****

केंद्र शासनाचे विविध विभाग आणि राज्य शासनाच्या विभागांमध्ये समन्वय राखून आंतरराज्य विषय आणि केंद्र शासनाशी निगडीत मुद्दे यावर तातडीनं कार्यवाही करुन ते निकाली काढण्यात यावेत, असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी केलं आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या स्थायी समितीच्या दहाव्या बैठकीत मुंबई इथं ते काल बोलत होते.  या बैठकीत केंद्र आणि राज्याच्या विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करुन त्यावर मार्ग काढण्यात आला. राज्यात आधार क्रमांक नोंदणीचं काम ९५ टक्के पूर्ण झालं असून, आधार संलग्न अनुदानाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी उर्वरित आधार नोंदणीचं काम पूर्ण करावं, असं मलिक यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गणेशोत्सवानंतर जायकवाडी इथं पाणी उपशाचं स्वयंचलित संयंत्र बसविलं जाणार आहे, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराला जायकवाडी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा अखंडीतपणे सुरू राहावा यासाठी महापालिकेने जायकवाडी आणि फारोळा इथल्या पाणी उपसा केंद्रांवर स्वयंचलित विद्युत यंत्र-रिमिनिंग युनिट बसविलं तर पाण्याचा उपसा कायम सुरू राहू शकतो. यासाठीचं अंदाजपत्रक महापालिकेला देण्यात येणार असल्याचं गणेशकर यांनी स्पष्ट केलं.

****

No comments: