Wednesday, 30 August 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

काल रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं मुंबईचं जनजीवन संथ गतीनं पूर्वपदावर येत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक काही अंशी सुरळीत होत असून, मध्य रेल्वेची वाहतूक मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे. परळ, सायन इथं सखल भागात अद्यापही पाणी साचलेलं असल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः सुरु होऊ शकलेली नाही. दरम्यान, हवामान खात्यानं आजही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यानं, मुंबईकरांनी आजही घराबाहेर पडू नये, असं आवाहन, राज्य सरकारनं केलं आहे.

मुंबईतली पूर परिस्थिती हाताळण्यात आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचं, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. नाले रुंदीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर मुंबईची अशी अवस्था झाली नसती, असंही निरुपम म्हणाले. 

****

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण व्यवस्थापनानं एक सप्टेंबर पर्यंत धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा ठेवण्याचं निर्धारित केलं असून, सध्या धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या दोन दिवसात कोयना धरण ओसंडून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथं आज आणि उद्या भटके विमुक्त अधिकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी या परिषदेचं उद्घाटन होईल, 'गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम' या विषयावर परिषदेत चर्चासत्र होणार असून, उद्या सकाळी भटके विमुक्त अधिकार फेरी तसंच जाहीर सभा होणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

*****




No comments: