Wednesday, 23 August 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 23.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२३ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

गोवा विधानसभेच्या दोन आणि दिल्ली आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होत आहे. गोव्यामध्ये पणजी आणि वाल्पोई या जागांसाठी मतदान होत असून, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पणजीमधून निवडणूक लढवत आहेत.

****

आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दिल्लीला जाणऱ्या कैफीयत रेल्वे गाडीचं इंजिन डंपरला धडकल्यामुळे गाडीचे नऊ डबे रुळावरुन घसरले. उत्तर प्रदेशातल्या औरीया जिल्ह्यात हा अपघात झाला. यात ३५ जण जखमी झाले असून, कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

****

संगणकीकृत मुद्रांक शुल्क प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून, या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असल्याचं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुद्रांक सेवेत सुसूत्रीकरणासह  पारदर्शी, गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या १०० कोटीं रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारकडून  मान्यता देण्यात आली आहे. शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचं अंदाजपत्रक महनगरपालिकेतर्फे तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं  होतं, त्याला शासनानं मंजुरी दिली. या निधीतून शहरात सिमेंटचे ३१ रस्ते बनवण्यात येणार आहेत.

दरम्यान, रस्त्यांची कामं महापालिकेतर्फे केली जाणार असली तरी या रस्त्यांच्या कामांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखा परीक्षण करण्याचं बंधनकारक करण्यात आलं असून या सर्व कामांचं नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरायची मुदत येत्या १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली असून एक ऑक्टोबरपासून कर्जवाटप प्रक्रिया सुरु होईल. मंत्रीमंडळ उपसमितीच्या काल मंत्रालयात झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

****


No comments: