Saturday, 26 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 26 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त बिहारसाठी तात्काळ ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी मदत आणि बचाव कार्य, नुकसान भरपाई आणि पुनर्वसनच्या कामाची तपशीलवार माहिती घेण्यासाठी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत बैठक घेतली. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर आणखी मदत देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं. बिहारमध्ये पुरामुळे आतापर्यंत २१ जिल्ह्यांमध्ये ४२१ लोकांचा बळी गेला आहे.

****

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिमला न्यायालयानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर हरियाणामध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरिय बैठक घेतली. परिस्थिती सामान्य झाली असून हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमध्ये जास्त प्रमाणात हिंसक घटना घडल्या नसल्याचं गृहसचिव राजीव महर्षी यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे हरियाणाच्या पोलीस महासंचालकांनी तिथली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यासंबंधात दाखल एका याचिकेवरील सुनवणीरदम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सुरक्षा व्यवस्थेवरून हरियाणा राज्य सरकारला फटकारलं आहे.

****

दरम्यान, देशात घडत असलेल्या विविध हिंसाचाराच्या घटना निंदनीय असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच समाजात शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी देशवासियांना केलं आहे.
कायदा आणि सुव्यवस्था यावर लक्ष असून आपण या घटनांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गृहसचिवांशी चर्चा केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

अंमलबजावणी संचलनालयानं मोईन कुरेशी या वादग्रस्त मांस निर्यातदाराला काल रात्री नवी दिल्लीतून अटक केली आहे. संचलनालयानं कुरेशीला आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशीला बोलावल्यानंतर अटक केली. मनी लॉन्ड्रींग कायद्याखाली कुरेशीला अटक करण्यात आली असून उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आयकर चुकवल्याप्रकरणी कुरेशीची आयकर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभागही चौकशी करत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३५वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमासाठी देशवासियांकडून त्यांच्या सूचना आणि प्रश्न नरेंद्र मोदी ॲप, माय जी ओ व्ही ओपन फोरम तसंच १८०० ११ ७८०० या नि:शुल्क क्रमांकावर मागवण्यात आले आहेत.

****

राज्यात कार्यरत असलेल्या सुमारे पंधरा हजार नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून या संस्थेमधल्या एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत संरक्षण देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघाच्या विविध प्रश्नांबाबतच्या पुणे इथं झालेल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते.
या बैठकीत थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्याप्रमाणे सहकार कायद्यात तरतूद करणं, अधिभार वसुलीबाबत धोरणात सुधारणा करणं, वसुली अधिकाऱ्यांना तीन वर्षांसाठी अधिकार देणं, निबंधकानं कलम १०१ प्रकरणावर ६० दिवसांत निर्णय देणं, याबाबत ऑनलाइन सनियंत्रण करणं अशा विषयांवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन च्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयात उद्या ‘सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सकाळी दहा वाजता या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत.
प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनी या परिषदेला अधिकाधिक संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

बिहारमधल्या एक हजार कोटी रुपयांच्या सृजन घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं एका असरकारी संस्थेचे अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. सरकारी योजनांसाठीच्या निधीमधून महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली सरकारी निधी हडप केल्याचा या संस्थेवर आरोप आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...