Thursday, 31 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.08.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पॅन क्रमांकाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या जोडणीचा आजचा शेवटचा दिवस होता

****

विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशासंदर्भात पंतप्रधानांची आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचं, कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेनं जारी केलेल्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. ज्या काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला.तो काळा पैसा कुठे गेला, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो आज सायंकाळी दिशासूचक उपग्रह IRNSS-वन-एच चं अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सायंकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी ३९ या यानामार्फत हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल.

****

खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष प्रणाली विकसित करण्याचा विचार सर्वोच्च न्यायालय करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही माहिती दिली. अशाप्रकारच्या प्रकरणांची सुनावणी सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याच्या दिशेनंचं विचार करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

मुंबईतील जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात आज सकाळी पाच मजली रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १६ झाली आहे. आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ३० जणांना बाहेर काढण्यात आलं असून, उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती आणि बचाव दलाद्वारे या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

****

मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पीटलचे डॉ दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह मुंबईत कोळीवाड्यानजिक समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. परवा २९ तारखेला झालेल्या अतिवृष्टीनंतर डॉ अमरापूरकर सांडपाण्याच्या गटारातून वाहून गेले होते.

दरम्यान, परवाच्या पावसात जागोजागी पाणी तुंबण्यासाठी नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. २६ जुलै २००५ च्या घटनेतून महानगरपालिकेनं काहीही धडा घेतला नसल्याचं सांगताना, सामाजिक कार्यकर्ते विनोद संपत यांनी पाणी तुंबण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

****

नोकरीत पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारनं तातडीनं अपील करावं अशी मागणी राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं अहमदनगर इथं करण्यात आली आहे. आशा सेविका आणि लिंकवर्कर यांचं थकित मानधन देवून, त्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणीही महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आलं.

****

उस्मानाबाद इथं औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या महिला स्वाधार केंद्राच्या अधीक्षकासह दोन जणांविरोधात फसवणूक तसंच महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रातल्या महिला गर्भवती प्रकरण तसंच शासकीय अनुदानासाठी बनावट हजेरीपत्र तयार केल्या प्रकरणी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद दौऱ्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

****

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूचं पहिलं श्रमिक साहित्य संमेलन येत्या दहा आणि अकरा सप्टेंबरला जालना इथं आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाचे निमंत्रक सुभाष थोरात यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवरील परिसंवादात  नामवंत वक्ते आणि चळवळीतले नेते मार्गदर्शन करणार आहेत.ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

****

भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं ३५ षटकात  चार बाद २७४ धावा केल्या आहेत. आज नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट १३१ तर रोहितनं १०४ धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा मनीष पांडे पाच तर महेंद्रसिंह धोनी   धावांवर खेळत होता.

****

महाराष्ट्रातल्या तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव इथल्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे यांचा समावेश आहे.

****


No comments: