Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** राज्यात काल दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम;
मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी
** विभागात पावसाशी निगडित घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
** बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार
आणि
** श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा नऊ गडी
राखून दणदणीत विजय
****
राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पावसानं
सर्वत्र जोरदार हजेरी लावली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबईसह बहुतांश ठिकाणी काल
सूर्यदर्शनही झालं नाही. मराठवाड्यात ४२१ पैकी १७३ मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले पाच, जालना तीन, परभणी आणि हिंगोली प्रत्येकी
चार, बीड ३५, लातूर ५०, उस्मानाबाद १६ तर नांदेड जिल्ह्यातल्या ५६ मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात सरासरी
शंभर पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुखेड या दुष्काळी तालुक्यात सर्वाधिक
१९९ मिलीमीटर, तर माहूर तालुक्यात सर्वात कमी ३० मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या
१६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टी झाली. शहराच्या सखल भागात, तसंच अनेक घरात पाणी शिरलं
आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या २४
तासात सरासरी ४२ पूर्णांक २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जालना जिल्ह्यात आतापर्यंत २८९
मिलीमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात १८३ मिलीमीटर, तर लातूर जिल्ह्यात १०४
मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाच पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये
समाधान व्यक्त होत आहे. आज साजऱ्या होत असलेल्या बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर काल
बैलांच्या खांदेमळणी परंपरा उत्साहात साजरी झाली.
राज्यात मुंबईसह अहमदनगर,
सातारा, सोलापूर जिल्ह्यातही काल सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातही
पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून साडे चार हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं तर दारणा धरणातून पाच हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात
आला आहे. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे.
पैठण इथल्या जायकवाडी धरणात काल रात्री ६२ हजार २२२ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणात सध्या ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेडच्या
विष्णुपुरी प्रकल्पातला पाणीसाठाही सुमारे ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. विभागात इतरत्रही
नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. लातूर जिल्ह्यात
तावरजा नदीला चांगले पाणी आल्यामुळे मांजरा आणि तावरजा नदीवरच्या चार बंधाऱ्यांचे प्रत्येकी
दोन दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, विभागात पावसाशी
निगडित घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात तानाजी शिंदे या
बारा वर्षीय बालकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या पारवा इथं आम्रपाली येवले
आणि किर्ती येवले या दोघी बहिणी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेल्या, तर पूर्णा
तालुक्यातल्या धानोरा काळे इथं एका महिलेचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात काल सात गावांचा संपर्क
तुटला होता. औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज उपनगरात रांजणगाव शेणपुंजी इथं घराची
भिंत पडून दोन भावंडांचा मृत्यू झाला. जालना
जिल्ह्यात माळशेंद्रा इथं गोठ्यावर वीज कोसळून दोन जनावरं दगावल्याचं वृत्त आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला
स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठीच ‘सर्वांना घरे’ हा उपक्रम प्राधान्यानं राबवत असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ते काल बोलत
होते. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येत असून, ग्रामीण भागात तीन
लाख चार हजार घरं मंजूर करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीयांना घरं बांधण्यासाठी प्रत्येकी
एक लाख ५० हजार रुपये देण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या छोट्या
शहरात राहणाऱ्या लोकांसाठीही प्रधानमंत्री आवास योजना असून, ही योजना राज्यातल्या १४२
शहरांत लागू आहे, तर २४३ शहरांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
****
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी कॉंग्रेसनं धरसोड वृत्ती सोडण्याची
गरज आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त
केलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारच्या कर्जमाफी
योजनेवर टीका करताना, पवार यांनी कर्जमाफीचे निकष आपल्याला अद्यापही समजलेले नाहीत
असं नमूद केलं. शेतकरी सातत्यानं कर्जबाजारी होत असल्यानं, ही परिस्थिती बदलण्यासाठी
धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे
आरोप आहेत, पण अनेक वर्षांनी सत्ता मिळाल्यामुळे हे मंत्री खुर्चीला चिकटून असल्याची
टीकाही पवार यांनी केली.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना काल ७३ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र
अभिवादन करण्यात आलं. नवी दिल्लीत त्यांच्या वीरभूमी या समाधीस्थळावर विविध राजकीय
पक्षाच्या नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
महाराष्ट्र राज्य शिक्षण
मंडळाच्या वतीनं जुलै २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल
आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट
एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना
त्यांचे विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत. गुणपत्रिका २४ ऑगस्टला दुपारी तीन वाजता संबंधित
महाविद्यालयात मिळणार आहेत गुणपडताळणी साठी विद्यार्थ्यांना विहीत नमुन्यात विहीत शुल्कासह
उद्यापासून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील.
****
भारत-श्रीलंकेदरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल दांबोला
इथं झालेला पहिला सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेनं चव्वेचाळीस षटकात
सर्वबाद २१६ धावा केल्या. भारतानं हे आव्हान २८ षटकं आणि पाच चेंडूत एक गडी गमावून
पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहलीनं ७० चेंडूत ८२ धावा केल्या, तर फिरकीपटू अक्षर पटेलनं
तीन, जसप्रीत बुमराह, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन बळी घेतले. ९०
चेंडूत तडाखेबाज १२३ धावा करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला
दुसरा सामना येत्या गुरुवारी पल्लेकेले इथं होणार आहे.
****
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या
हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास लागलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर काल ठिकठिकाणी आंदोलन
करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात निदर्शनं करण्यात आली. जालना इथंही
अंधश्रध्दा निर्मूलन समितीसह इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी समितीच्या वतीनं निर्भय वॉकही करण्यात आला. नरेंद्र
दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाली असून आरोपींचा
तपास लागला नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं.
लातूर इथं गांधी चौकातही
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, तसंच एम एम कलबुर्गी
यांच्या हत्येच्या निषेधार्थ ‘जवाब दो ’ आंदोलन करण्यात आलं.
****
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर व्हावा, असं आवाहन निवृत्त न्यायमूर्ती
अंबादास जोशी यांनी केलं आहे सातव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचं उद्घाटन न्यायमूर्ती
जोशी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. काल सकाळी जागर दिंडीनं संमेलनाला
प्रारंभ झाला. संमेलनाध्यक्ष मंदा देशमुख, स्वागताध्यक्ष विधीज्ञ शरद लोमटे यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. चार सत्रात झालेल्या या संमेलनात परिसंवाद, कथाकथन,
कविसंमेलन आदी कार्यक्रम घेण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या
वतीनं दिला जाणारा डॉ संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार डॉ सा द सोनसळे यांना, तर
शीतल बोधले यांना डॉ शैला लोहिया लेखिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन येत्या बुधवारी साजरा होत आहे. या
निमित्त आज दुर्मीळ ग्रंथांचं दोन दिवसीय प्रदर्शन
आणि उद्बोधन कार्यक्रमाचं उद्द्घाटन होणार आहे. विद्यापीठातल्या ज्ञान स्त्रोत केंद्रात
हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची दुसरी प्रत अंतिम
निकाल लागेपर्यंत जतन करावी, अशा सूचना आयोगानं दिल्या आहेत. निकाल प्रक्रिया पारदर्शक
आणि अचूक व्हावी, कोणत्याही तक्रारीला वाव राहू नये या हेतूने आयोगाच्या परीक्षेत कार्बनलेस उत्तरपत्रिकांचा वापर
केला जातो. परीक्षेच्या वेळी या उत्तरपत्रिकेची मुख्य प्रत जमा केल्यानंतर परीक्षार्थींनी
दुय्यम प्रत सांभाळून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment