Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 25 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा
राम रहीम गुरमीत सिंग यांच्यावर एका लैंगिक अत्याचार प्रकरणात १५ वर्षानंतर आरोप सिद्ध
झाले आहेत. हरियाणात पंचकुला इथं केंद्रीय गुन्हे अन्वेषण - सीबीआय न्यायालयानं आज
हा निर्णय दिला. येत्या सोमवारी बाबा राम रहीम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. आज
न्यायालयाच्या निर्णयानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हरियाणा आणि पंजाबमध्ये अॅलर्ट जारी करण्यात
आला आहे. दरम्यान, हा निर्णय जाहीर होताच, डेरा समर्थकांनी पंचकुलासह हरियाणात अनेक
ठिकाणी उग्र निदर्शनं केली. अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागलं. या मध्ये पाच
जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे शंभरावर लोक जखमी झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पंजाब, हरियाणा आणि चंदीगड मधल्या परिस्थितीचा दूरध्वनीवरून
आढावा घेतला.
****
देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी समुद्र किनारपट्टीवर
‘कोस्टल एम्लॉयमेंट झोन’ तयार करण्याचा सल्ला निती आयोगानं सरकारला दिला आहे. या झोनमध्ये
दहा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांना तीन वर्ष आणि वीस हजार
नोकऱ्यांची संधी देणाऱ्या कंपन्यांना सहा वर्षापर्यंत वस्तू आणि सेवाकरामध्ये सवलत
देण्यात यावी, तसंच पाच वर्षापर्यंत कॉर्पोरेट करापासूनही सूट देण्यात यावी असंही आयोगानं
सुचवलं आहे.
****
ग्रामीण भागात जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं असून, विद्यार्थ्यांना
शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण संस्थांनी कार्य करण्याचं आवाहन ज्येष्ठ
साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी केलं आहे. लोकसभेचे माजी सदस्य बाबुराव काळे
यांच्या ९२ व्या जयंत्तीनिमित्त आज औरंगाबाद इथं जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात ‘आधुनिक
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात खाजगी संस्थांचं योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात
ते बोलत होते. शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरण झालं आहे. तरी शिक्षणाचा मुळ
स्त्रोत कुठेही क्षीण झाला नसल्याचं पानतावणे म्हणाले. विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्धाटन झालं, सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची बौध्दीक
क्षमता वाढवण्याची गरज असून, हे उद्दिष्ट समोर ठेऊन शिक्षण संस्थांनी कार्य करणं गरजेचं
असल्याचं मत बागडे यांनी व्यक्त केलं.
****
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी, यशवंत सेनेच्या वतीनं आज विद्यापीठाला
टाळं ठोकून नामांतर झेंडा फडकवण्यात आला. विद्यापीठाच्या स्थापनेपासून गेल्या १३ वर्षांपासून
विद्यापीठाच्या नामांतराची मागणी होत आहे. येत्या सोमवारपर्यंत नामांतर न केल्यास,
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. दरम्यान, विद्यापीठ नामांतर कृती
समितीच्या वतीनं येत्या सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
येणार आहे.
****
गणेशोत्सवाला आज सर्वत्र भक्तीभावानं
उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक
मंडळांच्या गणेश मूर्तींची ढोल ताशाच्या गजरात स्थापना झाली. औरंगाबाद इथं जिल्हा गणेश
महासंघ उत्सव समितीच्या गणेशमूर्तीची स्थापना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते
करण्यात आली. लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणाऱ्या औरंगाबाद गणेश महासंघाच्या वतीनं
येत्या ५ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा तसंच जनजागृती कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
जालना इथं गणेश महासंघाच्या कार्यालयाचं
उदघाटन तसंच गणेश मूर्तीची स्थापना राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते करण्यात आली. नगराध्यक्षा संगीता
गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड हदगाव
मार्गावर पैनगंगा नदीत चारचाकी कोसळून, तीन जणांचा मृत्यू झाला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या
सीमेवर मार्लेगाव इथं आज सकाळच्या सुमारास एका ट्रकने या कारला धडक दिल्यानं ही दुर्घटना
घडली. मृतांमध्ये परभणी इथं वजन मापे विभागात कार्यरत निरीक्षक ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या
पत्नी रत्ना गोटे आणि वाहनचालक यांचा समावेश आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात येत्या ३० ऑगस्ट रोजी विभागीय
प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेत मृद आणि जलसंधारण
सचिव एकनाथ डवले यांचं जलयुक्त शिवार अभियान कार्यपद्धतीबाबत तर विभागीय आयुक्त महेश
झगडे यांचं २०१७-१८ मधील नियोजनाच्या रुपरेषेबाबत मार्गदर्शन होणार आहेत याशिवाय विविध
विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
//******//
No comments:
Post a Comment