Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
व्यक्तीगत गोपनियता
हा मुलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश जे
एस खेहर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय दिला. सरकारी योजनांसाठी
आधार क्रमांकाच्या सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा
दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर
दोन ऑगस्टला न्यायालयानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.
आधार कार्डच्या
वैधतेबाबतचा निर्णय स्वंतत्रपणे घेतला जाईल, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
****
नेपाळचे पंतप्रधान
शेर बहादुर देउबा यांचं पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं असून, आज सकाळी राष्ट्रपती
भवनात त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. भारतानं नेपाळच्या विकासासाठी भरपूर
मदत केल्याचं, देउबा यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांनी राजघाटावर जाऊन
महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि देउबा यांच्यात आज द्विपक्षीय स्तरावर चर्चा होणार आहे.
****
उत्तर प्रदेशातल्या
गोरखपुरच्या बी आर डी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या मुलांच्या मृत्यूची
चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारनं
स्वीकारला आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य
आणि अन्य डॉक्टरांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस या अहवालात केली आहे. तसंच
या रुग्णालयात गेल्या तीन वर्षात खरेदी करण्यात आलेल्या औषधांच्या हिशोबाचं लेखा परीक्षण
करावं, असंही समितीनं म्हटलं आहे.
****
बिहारच्या उत्तर
भागात पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मुजफ्फरपूर, दरभंगा, समस्तीपूर आणि गोपालगंज
जिल्ह्यांमध्ये जनजीनव विस्कळीत झालं आहे. बागमती, कमला बालन आणि गंगा या नद्यांनी
धोक्याची पातळी ओलांडली असून, एक कोटी साठ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला
आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या ३७६ वर पोहोचली असून, राष्ट्रीय
आणि राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
****
राजस्थानमधल्या
धौलपूर आणि भरतपूर जिल्ह्यातल्या जाट समुदायाला इतर मागासवर्गीयांमध्ये आरक्षण देण्यात
आलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर याबाबतची अधिसूचना
जारी केली. दोन्ही जिल्ह्यातला जाट समाज आरक्षणाची मागणी करत होता.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ३५वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशातल्या औद्योगिक
उत्पादनांना जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत टिकून रहायचं असेल, तर दर्जेदार आणि किफायतशीर
वस्तूंचं उत्पादन करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
कलराज मिश्र यांनी म्हटलं आहे. ते पुणे इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशांतर्गत
इंजिनिअरिंग, ऑटो अशा विविध आठशे क्लस्टरची उभारणी केली जात असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
राष्ट्रीय आरोग्य
धोरणातल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र निधी ‘सेस'च्या माध्यमातून
उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचं आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी सांगितलं.
मुंबई इथं आयोजित ‘हेल्थ केअर कॉन्क्लेव्ह २०१७’चं उद्घाटन करताना ते काल बोलत होते.
या निधीच्या उभारणीसाठी विमा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खासगी कंपन्यांचं सहकार्य
देखील अपेक्षित असून, सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्राच्या सामूहिक भागीदारीतूनच हे काम
अधिक प्रभावीपणे केलं जाऊ शकेल, असं ते म्हणाले.
****
येत्या २९ आणि ३०
ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महा अवयवदान अभियान राबवण्यात येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत २९ ऑगस्टला विशेष ग्रामसभेचं
आयोजन करुन, गावागावात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
स्कॉटलंडमधल्या
ग्लासगो इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या
सायना नेहवालचा उप उपान्त्यपूर्व फेरीचा सामना आज दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यून
विरुद्ध होणार आहे.
पुरुष एकेरीच्या
काल झालेल्या दुसऱ्या फेरीत अजय जयरामनं नेदरलँड्सच्या मार्क काल्जोऊचा २१-१३, २१-१८
असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अजय जयराम सोबतच बी साई प्रणित, के
श्रीकांतनही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा
दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज श्रीलंकेत पल्लेकेले इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार
दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment