Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 28 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमितसिंग
राम रहीमला बलात्कार प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयानं दहा वर्षांच्या तुरुंगवासाची
शिक्षा तसंच ६५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी गेल्या शुक्रवारी राम रहीमचा
गुन्हा सिद्ध झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयानं आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचं म्हणणं
ऐकून घेतल्यानंतर शिक्षा सुनावली.
दरम्यान, ही शिक्षा सुनावल्यानंतर
हरियाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हरियाणा सरकारनं
तातडीची बैठक बोलावली. नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर
यांनी केलं आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच डेरा समर्थकांनी दोन
वाहनं पेटवून दिल्याचं वृत्त आहे.
****
भारत आणि चीन यांच्यात डोकलाम
मुद्यावर अखेर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांनी या भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यास
तयारी दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली.
भारत आणि चीननं डोकलाम मुद्यावर राजकीय संबंध कायम ठेवले असून, याप्रकरणी भारताला आपले
विचार मांडण्याची पूर्ण संधी मिळाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
गोवा विधानसभेच्या दोन जागांसाठी
झालेली निवडणूक भारतीय जनता पक्षानं जिंकली आहे. पणजी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री
मनोहर पर्रिकर, तर वाल्पोई मतदारसंघातून विश्वजीत राणे विजयी झाले. दिल्लीतल्या बवाना
मतदारसंघाची निवडणूक आम आदमी पक्षाचे रामचंद्र यांनी जिंकली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार
वेद प्रकाश यांचा पराभव केला. आंध्र प्रदेशातल्या नांदयाल विधानसभा मतदासंघाची निवडणूक
तेलगु देसम पक्षाच्या भूब्रम्हानंद यांनी जिंकली आहे.
****
देशातल्या प्रतिभावान खेळाडूंचा
शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयानं सुरु केलेल्या राष्ट्रीय खेल प्रतिभा खोज पोर्टलचं
अनावरण आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. देशातला
कोणताही खेळाडू या पोर्टलवर आपल्या खेळाच्या यशाबद्दल संपूर्ण माहिती अपलोड करु शकतो.
अशा प्रतिभावान खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे पोर्टल
इंग्रजीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून, मोबाईल ॲपच्या रुपातही ते उपलब्ध
करण्यात आलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी आयला आयपीएल सामन्यांच्या प्रसारण अधिकाराचा ई लिलाव
करण्याचे निर्देश देण्यास मनाई केली आहे. आयपीएल सामन्यांच्या प्रसारण अधिकाराशी संबंधित
जाहिरात प्रक्रियेवर बंदी घालण्याची, तसंच या प्रक्रियेचा ई लिलाव सुरू करण्याची मागणी
करणारी भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांची याचिका, न्यायालयानं फेटाळून लावली. वृत्तपत्रातून
जाहिरात प्रक्रिया हा उत्तम मार्ग असून, प्रसारण अधिकारासाठी सर्व निवेदनकर्त्यांनी
बंद पाकिटात आपलं निवेदन दिल्याचं बीसीसीआयनं न्यायालयात सांगितलं.
****
२०२२ पर्यंत शेतीचं उत्पन्न दुप्पट
करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या संकल्प से सिध्दी न्यू इंडिया मंथन या अभियानाअंतर्गत
आज लातूर इथं शेतकरी जागृती मेळावा घेण्यात आला. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे
यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं, तर वंसतराव नाईक कृषी विद्यापीठाचे अधिकारी
डॉ व्ही पी सूर्यवंशी, सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ अजय जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पीकावर आळींचा मोठ्या प्रमाणावर
प्रार्दुभाव झाला असून सोयाबीनच्या शेंगा झाडापासून गळून पडत आहेत. आळी आणि शेंगगळती
सोबतच तीस ते पस्तीस टक्के शेंगेत बी भरत नसून नुसती पापडीच दिसत आहे. अशा शेंगा वाळत
असल्याचं निदर्शनास आलं आहे. मागील दहा दिवसांपासून
सतत हलका पाऊस होत असल्यानं, मूग तोडणी थांबली आहे. कापसावर लाल्यारोगाची साथ आल्यानं,
शेतकरी संकटात सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ आज पहाटे एका एसटी बसला
अपघात होऊन नऊ प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर सोळा जण जखमी झाले. ही बस त्र्यंबकेश्वरहून
पुण्याकडे जात होती. मृतांची ओळख अद्याप पटली नसून नारायणगाव पोलिसांनी संपर्क साधण्याचं
आवाहन केलं आहे.
****
नांदेड शहरातलं श्री गुरू गोविंदसिंघजी मैदान विकसित
करण्यात आलं असून, या मैदानावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही खेळता येतील, एवढ्या
सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मैदानाचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या
हस्ते आज करण्यात आलं. हे मैदान क्रिकेट खेळाडूंसाठी जास्तीत जास्त उपयोगात आणावं,
अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
नांदेड जिल्ह्यात आज सलग चौथ्या
दिवशी पावसानं हजेरी लावली. आज दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही आज सकाळच्या सुमारास पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या.
****
No comments:
Post a Comment