Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातला
आरोपी कर्नल प्रसाद पुरोहीतला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानं
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बाजुला ठेवत, तसंच काही अटी घालून हा जामीन मंजूर केला
आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातली दुसरी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन मंजूर केल्यानंतर
पुरोहीतनं जामीनासाठी अर्ज केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पुरोहीतला जामीन देऊ
नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र आपण राजकारणाचा बळी झालो असल्याचा आरोप
पुरोहीतनं केला होता. २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं झालेल्या
या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शहा आज नवी दिल्ली इथं भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या
राज्यांमधला विकास आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात येणार आहे.
****
बँकांचं एकत्रीकरण तसंच अन्य मागण्यांसाठी
देशभरातले १० लाख बँक कर्मचारी उद्या देशव्यापी संप पुकारणार आहेत. परिणामी उद्या सगळ्या
बँका बंद राहणार आहेत. आयसीआयसीआय, ॲक्सिस, कोटक महिंद्रा, एचडीएफसी या खासगी बँका
संपात सहभागी होणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक
युनियन्स या बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेनं हा संप पुकारला आहे.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था - आय आय टीमध्ये
प्रवेशासाठी घेण्यात येणारी आयआयटी - जेईई ही परिक्षा पुढच्या वर्षीपासून पूर्ण ऑनलाईन
पद्धतीनं घेण्यात येणार आहे. आयआयटीच्या संयुक्त प्रवेश मंडळाच्या चेन्नई इथं झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मंडळाचे अध्यक्ष आणि आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर
रामामूर्ती यांनी एक परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली.
****
बिहारमध्ये
आजही पूर परिस्थिती गंभीर आहे. राज्यातल्या एक कोटी तीस लाख नागरिकांना पुराचा फटका
बसला आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत २५३ नागरिक, तसंच दिडशे पेक्षा जास्त
जनावरांचा मृत्यू झाला. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य सुरु
असून, सात लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
उत्तर
प्रदेशातही पूर परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं
२४ जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागातल्या अनेक नागरिकांनी विविध
जिल्ह्यातल्या रेल्वे रुळांवर आसरा घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर इथल्या
रेल्वे अपघातप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला
असून, या विभागातल्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात
आलं आहे. एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली तर, रेल्वेचे दिल्लीचे विभागीय व्यवस्थापक,
उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डावरील विभागाच्या सदस्याला सक्तीच्या
रजेवर पाठवण्यात आलं आहे. या अपघातानंतर रेल्वे विभागाकडून प्राथमिक चौकशी अहवाल सादर
करण्यात आला, त्यात अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं आहे.
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला.
****
राज्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या
मुसळधार पावसानं आज थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यातल्या काही भागात आज पावसाचं वृत्त
आहे.
दरम्यान, मराठवाड्यात काल झालेल्या पावसानं
पाणी पातळी वाढली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
औरंगाबाद इथल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठ्यातही
गेल्या २४ तासात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात ५६ पूर्णांक ३६ टक्के पाणीसाठा
असून, ५४ हजार ४२९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
मराठवाडयातल्या
सात शहरांमध्ये जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. गुन्हे सिद्ध होऊन दोषींना
शिक्षा लवकर होण्यासाठी, अनेक प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करण्यासाठी हा निर्णय
घेण्यात आला आहे. लातूर, माजलगाव, बीड, परभणी, नांदेड, भूम, मुखेड या ठिकाणी ही जलदगती
न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
****
इटली मधल्या पोरपेटो
इथं झालेल्या कनिष्ठ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत भारताच्या शपथ भारद्वाजनं डबल ट्रॅप स्पर्धेत
कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या ज्यूनियर स्कीट अंतिम फेरीनंतर आज या स्पर्धेचा समारोप
होणार आहे.
****
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आजपासून ब्रिटन मधल्या ग्लासगो इथं
सुरु होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, के श्रीकांत, बी साई
प्रणित, समीर वर्मा, अजय जयराम या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. श्रीकांतचा आज पहिल्या
फेरीतला सामना रशियाच्या सरगेई सिरंत विरुद्ध होणार आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि
बी सुमित रेड्डी, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांची जोडी
सहभागी झाली आहे.
****
No comments:
Post a Comment