Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यात आठ जवानांना वीरमरण
** जनुकीय बदलाद्वारे सुधारित पीक वाणांना सुरक्षा पाहणीशिवाय परवानगी नाही
- संसदेच्या स्थायी समितीचा निर्णय
** जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी.व्ही.सिंधू महिला एकेरीच्या
अंतिम
फेरीत दाखल
आणि
** लेखकानं काळानुरुप लेखन करत साहित्यातून आपली भूमिका मांडावी
- ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांचं मत
****
काश्मीरमध्ये
पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस वसाहतीवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात आठ
जवानांना वीरमरण आलं, तर आठ जवान जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला.
हल्ला मोडून काढण्यासाठी जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. जैश
ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पहाटेपर्यंत ही
चकमक सुरू होती. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातले रविंद्र
धनावडे यांचा समावेश आहे. ते केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १८२ तुकडीमध्ये कार्यरत
होते.
दरम्यान, लातूर
जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातले जवान रामनाथ हाके यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी
मष्णेरवाडी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. सिलीगुडी इथं कर्तव्य बजावत असताना रामनाथ यांचं
परवा निधन झालं होतं.
नांदेड जिल्ह्याच्या भोकर
इथले जवान नरसिंग जिल्लेवाड यांच्या पार्थिव देहावर काल भोकर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. भारत-चीन सीमारेषेवर कर्तव्य बजावतांना त्यांचं परवा हृदयविकाराच्या तीव्र
झटक्यानं निधन झालं.
****
जनुकीय बदलाच्या
तंत्रज्ञानाद्वारे सुधारित पीक वाणांच्या जैविक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षिततेची
पाहणी आणि मूल्यमापन केल्याशिवाय त्यांना देशात परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचं संसदेच्या
स्थायी समितीनं म्हटलं आहे. या वाणांबाबत एकंदर पारदर्शकता आणि संपूर्ण जबाबदारी निश्चित
करणारी यंत्रणा तसंच त्यांचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचाही अभ्यास करणं गरजेचं
असल्याचं या समितीनं नमूद केलं आहे. काँग्रेस
नेत्या रेणुका चौधरी या समितीच्या अध्यक्षा असून
याबाबतचा अहवाल समितीनं नुकताच राज्यसभेकडे सादर केला आहे.
****
दिव्यांगांच्या सर्वांगीण
विकासाकरिता भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्याप्रती शासन कटिबध्द असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात दिव्यांगांच्या विशेष शाळेतले शिक्षक तसंच
मतिमंद आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन बापट यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी बापट बोलत होते. दिव्यांग व्यक्तिंचा विकास होण्यासाठी अशा कार्यशाळा
आवश्यक असल्याचं बापट म्हणाले. यापूर्वी औरंगाबाद, लातूर इथं अशा कार्यशाळा भरवण्यात आल्या आहेत.
****
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने
अंतर्गत आतापर्यंत २६ लाख ५० हजारांहून
अधिक शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त
झाल्याची माहिती, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते काल
मुंबईत बोलत होते. येत्या १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे.
आपले सरकार केंद्र, नागरी सुविधा केंद्र, संग्राम
केंद्र, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी
संस्थेतल्या केंद्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरण्याची सुविधा, मोफत उपलब्ध
करुन देण्यात आली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सन २००९ ते जून २०१६ पर्यंत थकलेलं कर्ज या योजनेत माफ होणार आहे.
****
फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांना खाजगीरित्या प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना नावनोंदणी
अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरणं बंधनकारक असून, अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक असून, ऑफलाईन अर्ज स्वीकारले
जाणार नाहीत असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कळवण्यात आलं
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘संकल्प से
सिध्दी’ अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप देण्याची गरज, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात कोळदा कृषी विज्ञान केंद्रात,
काल ‘संकल्प से सिध्दी - एक मंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
****
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३५वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
सरन्यायाधीश जे एस खेहर उद्या निवृत्त होत आहेत. त्यांच्या
जागी न्यायमूर्ती दीपक मिश्रा देशाचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.
****
स्कॉटलंडमध्ये ग्लास्गो इथं
सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी.व्ही.सिंधू महिला एकेरीच्या अंतिम
फेरीत दाखल झाली आहे. काही वेळापूर्वीच झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात
सिंधुनं चीनच्या चेन युफेईचा २१-१३,२१-१० अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत
अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, उपांत्य फेरीच्या
दुसऱ्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध सायना नेहवालचा १२-२१,२१-१७,२१-१०
असा पराभव झाला. त्यामुळे आता सायनाला कांस्य पदकावर
समाधान मानावं लागेल.
****
भारत-श्रीलंकेदरम्यानच्या
पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. श्रीलंकेतल्या
पलैकेले इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं थेट धावतं वर्णन
आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे.
****
लेखकानं काळानुरुप लेखन करत साहित्यातून
आपली भूमिका मांडली पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केलं
आहे. औरंगाबाद इथं साक्षात प्रकाशनचे संस्थापक,पत्रकार रमेश राऊत यांच्या स्मृतिनिमित्त
दिल्या जाणाऱ्या साक्षात पुरस्काराचं वितरण करतांना ते बोलत होते. यंदाचा साक्षात
पुरस्कार कवी विनायक येवले यांना लोमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ
साहित्यिक रा.रं.बोराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
परभणी शहर
आणि परिसरात होत असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपूरी धरणात क्षमतेपेक्षा
जास्त पाणीसाठा झाला असून धरणाचा एक दरवाजा काल उघडण्यात आला.पावसामुळे गोदावरी नदीत
पाण्याची आवक सुरु असल्यानं धरणाचा दरवाजा दुसऱ्यांदा उघडण्यात आला. दरम्यान, नांदेड
शहर आणि परिसरात काल रात्री १० वाजेनंतर दमदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. लातूर जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी पाऊस झाला.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं पुन्हा
जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून ५२०, इगतपुरीतल्या दारणा धरणातून
११००, तर पालखेड धरणातून, ५४४६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं काल सकाळपासून पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
****
लातूरच्या श्री जानाई प्रतिष्ठानचा अभियंता जनाईश्री पुरस्कार
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या ज्ञानप्रबोधिनी या पर्यावरणपूरक विकास संस्थेचे
प्रसाद चिक्षे यांना जाहीर झाला आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी -अभियंता दिनी अर्थक्रांतीचे
अनिल बोकील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
कसबे तडवळा इथं महिला विशेष गुडमॉर्निंग पथकानं
उघड्यावर शौचास जाणाऱ्या ५७ जणांविरुद्ध कारवाई करत २७ हजार रुपये दंड वसूल
केला. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून महिलाचं
हे पथक अशा लोकांवर धडक कारवाई करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड
- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड- श्रीगंगानगर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्याचं रेल्वे
सुत्रांनी कळवलं आहे. पंजाब तसंच हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी पुकारलेल्या
हिंसक आंदोलना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
दीड दिवसाच्या गणपतीचं काल राज्यभरात विसर्जन करण्यात
आलं. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.
****
गणेशोत्सवानिमित्त शासनातर्फे
संवाद पर्व हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पीरबावडा इथं
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विशेष उपस्थितीत उद्या सकाळी या उपक्रमाचं उद्घाटन
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment