Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
जम्मू
आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात, दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस दलाच्या एका इमारतीत
केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस जवान शहीद झाले असून, सहा जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी
इमारतीत घुसून जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन ते तीन दहशतवाद्यांची या इमारतीत
नाकाबंदी करण्यात आली असल्याचं सुरक्षा दलातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं
आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहिम सुरू
केली आहे. कोणत्याही संघटनेनं आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
****
डेरा
सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम सिंगच्या सिरसा इथल्या आश्रमातल्या अनुयायांना सैन्यानं
आश्रम सोडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र सैन्य आणि प्रशासनाच्या आवाहनानंतरही बाबाचे अनुयायी आश्रम सोडायला तयार नाहीत. बाबा
राम रहिम सिंगविरोधात बलात्कार प्रकरणात गुन्हा सिद्ध झाला असल्यानं त्याच्या अनुयायांनी
हरियाणात हिंसाचार सुरू केला आहे. तसंच सिरसा
इथल्या आश्रमात सुमारे एक लाख लोक तळ ठोकून असून सैन्य आणि पोलिसांनी त्यांना आश्रम सोडण्याचं आवाहन केलं आहे. सिरसामध्ये
सुमारे एक हजार एकरवर राम रहिमचा आश्रम वसलेला असून यामध्ये शाळा, रुग्णालयं, क्रीडांगणं
आणि सिनेमागृहांसारख्या सुविधा उभारलेल्या आहेत. तसंच बाबा राम रहिमच्या हरियाणातल्या
३६ आश्रमांना सील ठोकण्यात आलं आहे.
****
जनुकीयदृष्ट्या
सुधारित अशा पिकांच्या वाणांच्या जातींची जैविक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षिततेची
पाहणी आणि मूल्यमापन केल्याशिवाय देशात त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचं संसदेच्या
स्थायी समितीनं म्हटलं आहे. याशिवाय पारदर्शकता आणि याबाबतची पूर्णपणे जबाबदारी निश्चित
करणारी यंत्रणा असल्याशिवाय ही परवानगी देता येणार नसल्याचं या समितीनं म्हटलं आहे.
तसंच, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं या वाणांना परवानगी दिल्यास त्याचा पर्यावरणावर
काय परिणाम होईल, याचाही अभ्यास करणं आवश्यक असल्याचं या समितीनं नमूद केलं आहे. काँग्रेस
नेत्या रेणुका चौधरी या समितीच्या अध्यक्षा असून याबाबतचा अहवाल समितीनं नुकताच राज्यसभेत
सादर केला आहे. भारतात जनुकीयदृष्ट्या सुधारित वाणांच्या वापराबाबत नियंत्रण करणारी
जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समितीनं मोहरीच्या वाणाला परवानगी दिल्यानंतर समितीनं
हा अहवाल सादर केला आहे.
****
कागदविरहीत
न्यायालयं ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशी आशा भारताचे मावळते सरन्यायाधिश
जे. एस. खेहर यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत वकिलांच्या संघटनेनं आयोजित केलेल्या
निरोप समारंभात ते काल बोलत होते. न्यायव्यवस्थेला डिजिटल करण्यामध्ये वकिल संघटनांनी
केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी यावेळी आभारही व्यक्त केले. सरन्यायाधिश खेहर, परवा सोमवारी निवृत्त होत असून,
न्यायमूर्ती दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधिश म्हणून त्यांची जागा घेणार आहेत.
****
देशाच्या
आर्थिक विकासासाठी कृत्रीम बुद्धीमत्ता विकसीत करण्यासाठी सरकारनं एक कृती दल स्थापन
केलं आहे. अठरा सदस्यांच्या या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रासचे
डॉ. व्ही कामाकोटी असून यामध्ये शिक्षण, संशोधन आणि उद्योगक्षेत्रातल्या तज्ञांचा सदस्य
म्हणून सहभाग आहे. ही समिती सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांना सुत्रबद्ध आणि अंमलबजावणी
करता येण्याजोग्या शिफारसी सादर करणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये
होत असलेल्या मोठ्या प्रमाणातल्या बदलांमुळे उद्योग क्षेत्रामध्ये चौथी क्रांती होणार
असल्याचं वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
****
इंडियन
मेडिकल असोसिएशन - आय एम ए च्या वतीनं आज दुपारी चार वाजता औरंगाबाद इथं अवयवदान या
विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शहरातल्या आय एम ए सभागृहात होणाऱ्या या
परिसंवादात डॉक्टर उन्मेष टाकळकर, डॉक्टर आनंद देवधर, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे
अध्यक्ष डॉक्टर सुधीर कुलकर्णी आदी तज्ञ वैद्यकीय व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment