आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
नागपूर-मुंबई
दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ वातानुकूलित डबे सकाळी पावणे सातच्या दरम्यान आसनगाव-वाशिंद
स्थानकादरम्यान ईमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही
जीवित हानी झाली नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं
आसनगावकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचं
रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागपूर-मुंबई दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर
परिणाम झाला आहे.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी
जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजेनंतर मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी
होता येणार आहे. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या आठ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
****
शेतकऱ्यांना
सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या विविध
कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांनी काल लातूर-नांदेड रस्त्यावर
शासकीय विश्रामगृहासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, यांच्या
नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
राज्य परिवहन
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सातव्या वेतन आयोगानुसार
वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी येत्या दिवाळी सणाच्या आठ
दिवस आधी संप पुकारणार आहेत. एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र मोटे यांनी
औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
****
परभणी महानगरपालिकेच्या स्थायी
समितीची सभा, काल सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पाणीपुरवठा
योजनेच्या निविदांना तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment