Sunday, 20 August 2017

AIR News Bulletin, Aurangabad 20.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 20 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबईसह कोकण विभागात आज दमदार पाऊस सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात आज सर्वदूर मुसळधार पाऊस असून सरासरी शंभर पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुखेड या दुष्काळी तालुक्यात सर्वाधिक १९९ मिलीमीटर, तर सर्वात कमी माहूर तालुक्यात ३० पूर्णांक ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या १६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. महापालिकेनं नाले सफाई केली नसल्यानं शहरात सखल भागात, तसंच अनेक घरात पाणी शिरलं आहे. तर विष्णुपुरी प्रकल्पामध्ये ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
परभणी जिल्ह्यातही आज चांगला पाऊस झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४२ पूर्णांक २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यातल्या लहान नद्या, ओढे पहिल्यांदाच भरुन वाहत आहेत. औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून गंगापूर धरणातून चार हजार ६८० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.

****

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन आय ए मुळे जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना कमी झाल्या असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लखनौमध्ये एन आय एच्या शाखा कार्यालयाचं उदघाटन करताना ते आज बोलत होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात नक्षलवाद, दहशतवाद आणि कट्टरवादाच्या घटना कमी झाल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना निधी पुरवण्याऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचं, संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित नव भारत संकल्प कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.

****

भाजपशासित राज्यांमध्ये सामाजिक आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे त्या राज्यांमधल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या  बैठक घेणार आहे.

****

प्रस्तावित नवोदय विद्यालयांमध्ये मुलींसाठी ४० टक्के जागा राखीव ठेवणार असल्याचं अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. तसंच अल्पसंख्यांकांचं प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये १०० नवोदयसारखे विद्यालयं सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचंही नक्वी यावेळी म्हणाले.

****

ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रियेला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी त्यावर संशोधन आणि विकास करण्यासाठी सरकार सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर इको पार्क उभारण्याचा विचार करत आहे. संघटित क्षेत्रात वातावरणाशी सुसंगत अशा प्रक्रियेद्वारे ई-कचऱ्यावर काम करण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या उपक्रमाचा विचार करत असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं एका संसदीय समितीला दिली आहे.

****

सीमा सुरक्षा दलानं जवानांमधील नैराश्य आणि आत्महत्येला आळा घालण्यासाठी दोन महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत. या उपक्रमांमध्ये जवानांच्या वार्षिक आरोग्य तपासणीमध्ये मानसिक निरोगीपणाच्या तपासणीचा समावेश केला आहे. या तपासणीमध्ये आयुष्यातल्या घटना, आव्हाने आणि परिस्थितीवर आधारीत प्रश्नांचा समावेश असेल. तर दुसऱ्या प्रकल्पामध्ये ‘गुरू-शिष्य’ पद्धतीचा समावेश करण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठीच ‘सर्वांना घरे’ हा उपक्रम प्राधान्यानं राबवत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येत असून, ग्रामीण भागात तीन लाख चार हजार घरे मंजूर करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीयांना घर बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख ५० हजार रुपये देण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या छोट्या शहरात राहणाऱ्या लोकसांसाठीही प्रधानमंत्री आवास योजना असून, ही योजना राज्यातल्या १४२ शहरांत लागू आहे, तर २४३ शहरांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान दांबोला इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या आठ बाद १८७ धावा झाल्या होत्या. भारताकडून अक्षर पटेलनं तीन, केदार जाधवनं दोन तर जसप्रीत बुमराह आणि यजुर्वेंद्र चहलनं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...