. Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** आधारपत्र सक्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
** नालेसफाई व्यवस्थित केल्यानेच मुंबई एका दिवसात पूर्वपदावर
-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा
** स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
आणि
** नाशिक जिल्ह्यातली धरणं भरली; जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७३ टक्क्यांवर
****
आधारपत्र सक्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं
काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. ही मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. या प्रकरणाची
सुनावणी तीन सदस्याच्या घटनापीठाऐवजी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घ्यावी अशी विनंतीही
केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणी आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आधार पत्रावर दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं,
भारतीय विशेष ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. आधार संबधीची माहिती, फक्त या प्राधिकरणाकडेच
आहे, ती खुली केली जात नसल्याचं प्राधिकरणानं सांगितलं आहे.
****
इतर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमीलेयर वर्गासाठीचे लाभ सार्वजनिक
कंपन्या, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही लागू होणार
आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत केंद्रीय
मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता दिली. वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या अशा
कंपन्या तसंच वित्तीय संस्थांमधले कर्मचारी या लाभासाठी आता पात्र असतील. केंद्रीय
मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत लक्झरी कारवर वस्तू सेवा करांतर्गत अधिभार वाढवण्यासही
मंजूरी दिली आहे. वस्तू आणि सेवाकर राज्य मोबदला विधेयक
२०१७ मध्ये उपयुक्त सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे.
****
विमुद्रीकरणानंतर एक हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या
रद्द केलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्याचं रिजर्व्ह बँकेनं
म्हटलं आहे. काल ही माहिती देण्यात आली. चलनात असलेल्या १५ लाख ४४ हजार कोटींपैकी १५
लाख २८ हजार कोटी रुपयांच्या नोटा रिजर्व्ह बँकेला परत मिळाल्या असून, फक्त १६ हजार
५० कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्या नसल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबई महापालिकेनं
नालेसफाई व्यवस्थित केल्यानेच मुंबई एका दिवसात पूर्वपदावर आली, असा दावा शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. जोरदार
पावसामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती महापालिकेनं कार्यक्षमतेने हाताळली असं सांगत,
ठाकरे यांनी, या विषयाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहन केलं. रस्त्यावर पाणी तुंबू
नये यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवाव्यात, असंही ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुंबईतलं
जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत असून, उपनगरी रेल्वे सेवा सुरळीत होत आहे.
मुसळधार पावासामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी
शिवसेना आणि पहारेकरी भाजपा हेच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधीपक्ष
नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. नालेसफाईवर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चाची
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणीही मुंडे यांनी
केली आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत
ही घोषणा केली. त्यापूर्वी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून
बाहेर पडण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत
तुपकर येत्या चार तारखेला वस्त्रद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं
यावेळी सांगण्यात आलं.
****
ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या परवा
झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत: तर काही
गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. आज मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात
आली आहे. मुंबई नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसही काल रद्द करण्यात आली. लोकमान्य टिळक
टर्मिनस ते नांदेड ही गाडी काल रद्द करण्यात आली होती, त्यामुळे नांदेड ते लोकमान्य
टिळक टर्मिनस ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, नांदेड - श्री गंगानगर एक्स्प्रेस
आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून
कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु
असून जिल्ह्यातली तब्बल ११ धरणं १०० टक्के भरली असून ७ धरणातला पाणी साठा ९० टक्क्यांहून
अधिक झाला आहे. पालखेड ८५, गंगापूर ९२ टक्के, तर दारणा धरण ९९ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातून चार हजार घनफूट प्रतिसेकंद तर दारणा धरणातून ८
हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून
साडे १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसंच नदीकाठाच्या
गावांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात काल सायंकाळी २० हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणातला पाणी साठा ७३ टक्क्यांवर पोहोचला असल्याची
माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात
आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रक्रियेअंतर्गत
औरंगाबाद तालुक्यातल्या १४ गावांचा अंतिम मोजणी अहवाल आगामी तीन दिवसांत प्राप्त होणार
आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीच्या अनुषंगानं
राज्य रस्ते विकास महामंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या
जमिनीवरील कर्जाची रक्कम शिल्लक ठेवत, उर्वरित रक्कम संबंधितांना देऊन जमिनीचं संपादन
करण्यास सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात शासनानं मंजूर केलेल्या
कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची सूचना शिवसेना उपनेते आणि खासदार
चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात काल आयोजित बैठकीत ते बोलत
होते. जिल्ह्यातली विकास कामं फक्त समन्वयाअभावी रखडली असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
बालकं आणि गर्भवतींना आजारापासून संरक्षित
करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत "इंटेन्सीफाईड
मिशन इंद्रधनुष्य" ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या
मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहकार्य करावं, असं आवाहन डोंगरे यांनी केलं.
****
अंबाजोगाईतल्या योगेश्वरी नूतन विद्यालयात
कार्यरत सहशिक्षक डॉ. कमलाकर राऊत यांना सन २०१६ चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये, रौप्य पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली इथं
विज्ञान भवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात राऊत यांना हा पुरस्कार दिला जाणार
आहे.
****
बालकांच्या न्यायिक हक्क आणि विकासासाठी, बाल हक्क संरक्षण आयोग स्वयंसेवी संस्थांना
वेळोवेळी आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी दिलं
आहे. काल उस्मानाबाद इथं, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत काल
ते बोलत होते. ज्या बालकांना खऱ्या अर्थाने काळजी तसंच संरक्षणाची गरज आहे, अशाही बालकांना
स्वयंसेवी संस्थांमध्ये प्रवेश देण्याचा मागणीवर घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
****
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी येत्या ७ सप्टेंबरपासून किसान सभेच्या वतीनं
संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे आणि कॉम्रेड
राम बाहेती यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment