Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 2 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
रेल्वे विभाग लवकरच स्वस्त दरात
वातानुकुलित प्रवास सेवा उपलब्ध करून देणार आहे. पूर्णपणे वातानुकुलीत असलेल्या या
रेल्वेत तृतीय श्रेणीचे वातानुकुलीत डबे असतील, मात्र या रेल्वेचं प्रवास भाडं सध्याच्या
वातानुकुलीत तृतीय श्रेणीपेक्षा कमी असेल. या डब्यांना स्वयंचलित दरवाजे असतील. या
गाडीचं तापमान २४ ते २५ अंश सेल्सियस दरम्यान असेल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं
दिली.
****
राष्ट्रपती पदाची निवडणूक, राष्ट्रीय
आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार या दोघांमध्ये
होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर हे दोन उमेदवारच निवडूणक रिंगणात
असल्याचं, स्पष्ट झालं आहे. येत्या १७ तारखेला या पदासाठी मतदान होणार असून, २० तारखेला
मतमोजणी होणार आहे.
****
कर्जाची परतफेड न करणाऱ्या ग्राहकांकडून
कर्ज वसुलीसाठी बँक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असं केंद्रीय दक्षता आयुक्त
टी एम भसीन यांनी म्हटलं आहे. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. कर्जबुडवा उद्योजक विजय
मल्ल्यासह दहा मोठ्या कर्जबुडव्यांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग करत असलेल्या चौकशीवर
केंद्रीय दक्षता आयोग लक्ष ठेऊन असल्याचं ते म्हणाले. निर्णय योग्य असेल, तर बँक अधिकाऱ्यांना
भीती बाळगण्याचं कारण नाही, असंही भसीन यांनी स्पष्ट केलं.
****
आसाममध्ये सतत सुरु असलेल्या
मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती कायम आहे. राज्यातल्या दोन लाख साठ हजारांहून
अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला असून, आठ जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
ब्रम्हपुत्रेसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्त
भागात सर्व प्रकारची पाठवण्यात मदत येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात
आज पावसानं हजेरी लावली.
****
अमरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी
सुमारे पंधरा हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं. पवित्र गुहेत पोहोचून
दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आता २९ हजारावर पोहोचली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या
तुलनेत यात्रेचा कालावधी आठ दिवसांनी कमी झाला असून, येत्या सात ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा
अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथांच्या पालख्यांसह बहुतांश लहान मोठ्या दिंड्या
आज पंढरपूर नजीक वाखरी इथं एकत्र आल्या असून, त्या ठिकाणी पालख्यांचा भव्य रिंगण सोहळा
पार पडला. उद्या या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं,
“पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी” या आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित करण्यात
आलेल्या पर्यावरण दिंडीचा उद्या पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
समारोप होणार आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीसाठी पंढरपूर
मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असून, कालपर्यंत एक ते सव्वा लाखाहून अधिक भाविक
दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशीसाठी राज्य महामार्ग
परिवहन महामंडळ - एस टी नं तीन हजार ६८७ जादा बस सोडल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी
गट आरक्षण, आगाऊ आरक्षण तसंच प्रत्यक्ष बस स्थानकावर थेट तिकिटाची सुविधा दिली आहे.
****
राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी
सेविका आणि मदतनीस यांचं मासिक मानधन, उद्यापासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या
उपस्थितीत उद्या मुंबईत, या योजनेचा शुभारंभ होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत,
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे दोन लाख कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बँक
खात्यामध्ये थेट मानधन जमा करणारा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हा देशातला पहिला
विभाग आहे.
****
बीड जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाने
शौचालय बांधून त्याचा वापर करावा असं आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी
केलं आहे. माजलगाव तालुक्यातल्या पवारवाडी इथं देवकृपा उद्योग समूहाच्यावतीनं उभारण्यात
आलेल्या ३० स्वच्छतागृहाचं लोकार्पण आज मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी
त्या बोलत होत्या. शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना
मिळाला पाहिजे, यासाठी योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी
केल्या.
****
मराठी भाषेच्या विकासाकरता केंद्र
आणि राज्याचे अधिनियम मराठीतून उपलब्ध होण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोग
नेमावा, अशी मागणी मराठी साहित्य महामंडळानं केली आहे. १९९५ पूर्वीच्या सर्व संबंधित
अधिनियमांचंही मराठी भाषांतर करण्यात यावं, अशी मागणीही महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद
जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्याकडे
पत्राद्वारे केली आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात
सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज अँटीग्वा
इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment