Tuesday, 4 July 2017

Text-AIR News Bulletin,Aurangabad 04.07.2017...13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

राज्य सरकारतर्फे जाहीर झालेल्या कर्जमाफीबाबतची तपशीलवार माहिती, आज मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवरुन जाहीर केली. दीड लाखापर्यंत कर्ज असलेले आणि सात बारा पूर्णत: कोरा होणाऱ्या राज्यभरातल्या एकूण छत्तीस लाख दहा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या एक लाख ४८ हजार ३२२ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. लातूर ८० हजार चारशे त्रेहात्तर, परभणी एक लाख त्रेसष्ठ हजार ७६०, बीड दोन लाख आठ हजार ४८०, जालना एक लाख ९६ हजार चारशे त्रेसष्ठ, नांदेड एक लाख छप्पन हजार आठशे एकोणपन्नास, उस्मानाबाद ७४ हजार ४२० आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ५५ हजार १६५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासह अहमदनगर, बुलडाणा, जळगाव, नाशिक, अकोला, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अमरावती इथल्या कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

****

आषाढी एकादशी आज राज्यभरात भक्तीभावानं साजरी होत आहे. राज्यासह देशभरातून सात लाखांवर भाविक पंढरपूर नगरीत दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

औरंगाबाद नजिक प्रती पंढरपूर इथंही आजूबाजच्या अनेक जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायानं पंढरपूरात ठिय्या आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

****

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला. गेल्या २४ तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण तीन दहशतवादी ठार झाले. जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याची माहिती समोर आली आहे. आणखी काही दहशतवादी याच परिसरात लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे बांदीपोरामधील परिसरातही घेरावबंदी करण्यात आली आहे.

****

हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी सैयद सलाउद्दीन याचं भारतात करण्यात आलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल वक्तव्य म्हणजे, पाकिस्तानाचा सीमेपलिकडून दहशतवाद सुरु ठेवण्याचं प्रमाण असल्याचं भारतानं म्हटलं आहे. सलाउद्दीननं पाकिस्तानी वृत्त वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमुळे, पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कार करत असल्याचं स्पष्ट होतं, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा प्रसार करणं थांबवून आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करायला पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्त्राईल आणि जर्मनी या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. इस्त्राइल इथं ते पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत. दहशतवादासह काही प्रमुख मुद्यांवर यावेळी चर्चा करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारत आणि इस्त्राइलच्या राजनैतिक संबंधांना यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत.

****

महावितरणनं एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा राज्यभरातल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जाहीर केले. राज्यभरातल्या सुमारे एक कोटी ३९ लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाईलवर पाठविण्यात येत आहे.

****

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी - महाजेनकोचा ‘पिण्याच्या पाण्याचे एटीएम’ हा उपक्रम जलव्यवस्थापनात देशात प्रथम ठरला आहे. या उल्लेखनीय उपक्रमासाठी वाणिज्य आणि उद्योग संघटना - अॅसोचॅमनं महाजेनकोला जलव्यवस्थापनाचा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवलं. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के पी बक्षी यांच्या हस्ते महाजेनकोच्यावतीनं दिल्लीस्थित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

नांदेड - मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, अर्थ आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. ते नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईला जागा उपलब्ध न झाल्यानं ही विमानसेवा सुरु झाली नाही, मात्र येत्या काही दिवसांत यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन ही सेवा लवकर सुरु करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. याशिवाय शहरात सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत चालू ठेवणं हे एक मोठं आव्हान असून, जिल्हा नियोजन मंडळात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...