Wednesday, 5 July 2017

Text-AIR News Bulletin,Aurangabad 05072017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, जागतिक शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाला रोखण्याचा इरादा व्यक्त केला आहे.  इस्त्राईल भेटीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईलचे राष्ट्रपती रियवेन रिव्हलीन यांची भेट घेणार आहेत, तसंच इस्त्राईलचे विरोधी पक्षनेते आयजॅक हरजोग यांनाही भेटणार आहेत. इस्त्राईलमधल्या भारतीय समुदायालाही पंतप्रधान मोदी आज तेल अव्हीव्ह इथे संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये या दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे.

****

आंतरखंडीय बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर कोरियानं जाहीर केल्यानंतर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक होत आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी मागणी केल्यानंतर आज दुपारी ही बैठक होत आहे.अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी ही चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेनं, उत्तर कोरियाचा मित्रदेश चीननं याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची इच्छा दर्शवली आहे, तर जागतिक सत्तांनी याबाबत उत्तर कोरियासोबत चर्चा करून मार्ग काढावा, असं चीननं म्हटलं आहे.

*****

सुरक्षा स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात लागू असलेला सशस्त्र  दल विशेष अधिकार अधिनियम अर्थात अफ्स्पा, अंशत: हटवण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे. या राज्यांमधली सुरक्षा स्थिती आधीपेक्षा चांगली झाल्यामुळे, या राज्यांच्या सरकारांशी याबाबत चर्चा केल्यानंतर, या अधिनियमाला अंशत: सूट देण्याचा विचार असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

***

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून वस्तुंच्या किमती आणि पुरवठ्याच्या स्थितीवर सरकार देखरेख ठेवत आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर वस्तूची किंमत वाढली असेल,तर उत्पादकानं त्या वस्तुंच्या पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आणि हा बदल किमान दोन वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं आवश्यक आहे, असं ग्राहक कार्य सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी कळवलं आहे. वस्तुची किंमत कमी झाली असल्यास, उत्पादकानं फक्त पाकिटावर दोन्ही किंमती छापणं पुरेसं आहे. या कराची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत असल्याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारनं दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

***

पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात, फेसबुक या सोशल माध्यमावरच्या एका आपत्तीजनक संदेशानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं काल अर्धसैनिक दलाचे तिनशे जवान तिथे तैनात केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दार्जिलिंगचे खासदार आणि केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी, राज्य सरकारनं परिस्थिती नीट न हाताळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी अहवाल द्यावा, असा आदेश आज गृह मंत्रालयानं दिला आहे.

*****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समाजवादी पक्षाचे नेते शिवपालसिंह यादव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतीत समाजवादी पक्षात मतभेद झाल्याचं चित्र असून, पक्षनेते अखिलेश यादव यांनी मीरा कुमार यांना तर मुलायम सिंह यांनी कोविंद यांना याआधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

****

माहितीच्या अधिकाराअंतर्गत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दलच्या माहितीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ही माहिती पंधरा दिवसांच्या आत द्यावी, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगानं गृह मंत्रालयाला दिले आहेत. उज्जैन इथल्या एका व्यक्तीनं याबाबत आधी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयानं ही याचिका गृह मंत्रालयाकडे पाठवली होती.या पार्श्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त आर के माथूर यांनी हे निर्देश दिले आहेत.

****

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडच्या डर्बी इथे भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. या स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आणि इंग्लंड संघांवर सलग विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघाचे सहा-सहा गुण मिळवले असून,  चांगल्या रन रेटमुळे भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आहे.

****

बाविसावी आशियायी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आजपासून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथे सुरू होत आहे. या स्पर्धेत आशियातल्या ४४ देशांचे बाराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...