Saturday, 8 July 2017

Text-AIR News Bulletin,Aurangabad 08072017 10.00




आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

८ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता



****

जम्मू काश्मीरमधल्या पूँछ सेक्टर इथं पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याठिकाणी सीमेपलीकडून लष्करी तळांवर आणि स्थानिक वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोन स्थानिक नागरिक जखमी झाले.

****

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या अन्नधान्यांचे दर सलग पाचव्या वर्षी म्हणजे जून २०१८ पर्यंत स्थिर राहतील, अशी ग्वाही केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एक जानेवारी २०१६ पासून लागू करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात काल मुंबईत विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जवसुली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. काल अहमदनगर इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

****

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्याकरता, २०१७-१८ या वर्षासाठी २२२ लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. या अभियानात वृक्ष लागवडीसह

रितगृहातील भाजीपाला लागवड, साठवण आदी बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबवण्यासाठी जिल्ह्याला २७ लाखांचा कार्यक्रम प्राप्त झाला असून या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर तसंच चलीत अवजारांचा समावेश आहे.

****



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीनं औरंगाबाद इथं आयोजित वसंतोत्सवात आज राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून, ‘शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी धोरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक आहे किंवा नाही’ हा या स्पर्धेचा विषय आहे.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...