Tuesday, 1 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर दरमहा चार रुपयांनी वाढवण्याच्या निर्णयाचे पडसाद आज राज्यसभेत उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाविरोधात सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अनुदान टप्प्याटप्प्यानं रद्द करण्याचा हा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडीप्रणीत सरकारनं २०१०मध्ये घेतला असल्याचं सांगितलं. मात्र सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं, सदनाचं कामकाज साडेबारा वाजेपर्यंत दोनवेळा तहकूब झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

****

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या राज्यसभेत अत्यल्प उपस्थितीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली.

येत्या १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान देशभरात संकल्प यात्रा काढली जाणार असल्याचंही अनंत कुमार यांनी सांगितलं. सर्व खासदार, आमदार, पक्ष पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. नवमतदार युवकांचं स्वागत झालं पाहिजे, यावर या बैठकीत एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काकापोरा इथं आज सकाळी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजाना आणि अन्य दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात अबू दुजानासह तीन दहशतवादी लपले असल्याच्या माहितीवरून सैन्य दलानं, या भागात शोधमोहीम सुरू केली, त्यानंतर पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत हे तीन दहशतवादी ठार झाले.

****

छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यातून चार नक्षलवाद्यांना काल अटक करण्यात आली. छत्तीसगड सशस्त्र दल आणि जिल्हा पोलिस दलानं संयुक्तपणे ही कारवाई केली. अटक केलेले चारही जण पोलिस दलाची कारवाई तसंच इतर माहिती नक्षलवाद्यांना पुरवत असल्याचं, समोर आलं आहे.

****

देशातल्या काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून, पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामसह ईशान्येकडच्या काही राज्यात पूर परिस्थिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुवाहाटी इथं एका बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. राजस्थान मध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राजस्थान सरकारनं पूरामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये, तर गंभीर जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरातमध्ये पूर परिस्थितीची पाहणी केली. पश्चिम बंगालमध्ये पूराशी संबंधित घटनांमध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आता ३९ झाली आहे. उत्तराखंड मध्येही मुसळधार पाऊस सुरु असून, भुस्खलनाच्या अनेक घटना घडत आहेत. ओडीशातली पूर परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

****

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं देशातल्या ४६ संग्रहालयांमध्य़े सेल्फीस्टिकच्या वापरावर निर्बंध घातल्याची माहिती सांस्कृतिक आणि पर्यटन राज्य मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. छायाचित्रीकरणाच्या धोरणाअंतर्गंत हा निर्णय घेण्यात आला. मात्र संग्रहालयाच्या आसपासच्या परिसरात छायाचित्रे काढण्यावर बंदीचा निर्णय, विभागानं घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक सन्मान यंदा पतंजली समुहाचे शिल्पकार आचार्य बाळकृष्ण यांना आज सकाळी पुणे इथं प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं शैक्षणिक संस्थांमधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकमान्यांना तसंच अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

लातूर इथं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभा साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं.

****

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि आडते यांच्यात आडत दरावरून सुरु असलेल्या वादामुळे गेल्या दोन दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले असल्यानं शेतकरी हवलिदिल झाले आहेत. या बाजार समितीत वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह शेजारच्या हिंगोली आणि पुसद तालुक्यातले शेतकरीही आपला शेतमाल विक्री साठी आणतात. 

****

केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे. या योजनेतून शहरातल्या प्रत्येक बेघरांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. 

****






No comments: