Wednesday, 2 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 02.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०२ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

माजी केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आसाममध्ये सिल्चर इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान, त्यांचं निधन झालं. १९८० पासून सात वेळा लोकसभेवर निवडून गेलेले देव यांनी डॉ मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सिल्चरच्या काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांचे ते वडील होत.

****

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही संघटना येत्या काळात जागतिक औद्योगिक संघटना म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबई इथं महामंडळाच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उद्योग क्षेत्रामध्ये देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर असल्याचं देसाई यांनी नमूद केलं.

****

लातूर जिल्ह्यात पीक विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांचा गत वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रतिसाद दिसून येतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी जिल्हा बॅंकेच्या ११६ शाखांमधून शेतकऱ्यांनी यंदा ३६ कोटी आठ लाख ५८ हजार इतका विमा हप्ता जमा केला असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक एच जे जाधव यांनी दिली.

****

महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीतून काम करुन मराठवाड्याचा विकास साध्य करावा, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबाद इथं केलं. विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. 

शासनाच्या सर्व योजनांच्या अमंलबजावणीत औरंगाबाद जिल्हा अव्वल कामगिरी करुन उत्कृष्ट काम करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी दिली.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आज सकाळी आठ वाजता धरणातला जिवंत पाणी साठा सुमारे अकराशे दशलक्ष घनमीटर वर पोहोचला, धरणात सध्या तेरा हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

No comments: