Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 7 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
हातमाग आणि हस्तकलेसाठी भौगोलिक
संकेतांक - जीआय प्राप्त करण्यामध्ये भारत आघाडीवर असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग
मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आज अहमदाबाद इथं
आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जीआयमुळे विणकरांना त्यांच्या वस्तूंसाठी चांगली
किंमत मिळेल, त्यामुळे या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
आपल्या दैनंदिन जीवनात हस्तोद्योग वस्तूंचा वापर करुन विणकरांना प्रोत्साहन द्यावं
असंही त्या म्हणाल्या. बुनकर मित्र या मोबाईल ॲपचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
हातमाग दिनाचा मुख्य सोहळा आज
गुवाहाटी इथं आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद नजीक पैठण इथंही या निमित्तानं एका
विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
****
आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या
प्रसार माध्यमांनी सरकारी कार्यक्रमांच्या सामाजिक प्रभावाचा अभ्यास करावा आणि आपल्या
विविध कार्यक्रमाद्वारे यशोगाथा प्रसारित करावी, असं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ. ए
सूर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे. ते आज बंगळुरु इथं आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांना संबोधित
करताना बोलत होते. लोकशाहीची तत्वं बळकट करण्यासाठी तसंच देशाची संस्कृती पुढे नेण्यासाठी
प्रसार माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. प्रसारणामध्ये तंत्रज्ञानाचा
वापर वाढवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी यावेळी भर दिला.
****
दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या
गोविंदांची वयोमर्यादा १८ वर्षावरून १४ वर्ष करत, या खेळावरचे सर्व निर्बंध हटवण्याचा
निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी
यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेकवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, दहीहंडीसाठी
मानवी मनोरा रचताना, थरांच्या उंचीबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं सांगितलं
आहे. गोविंदांसाठी सुरक्षा साधनं पुरवण्याची जबाबदारी दहीहंडी आयोजकांवर सोपवली असल्याचं,
सरकारनं सांगितलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पत्रकारांशी बोलताना, स्वाती पाटील
यांनी येत्या १५ ऑगस्टपूर्वी सरकारनं थरांच्या उंचीबाबत निर्णय न घेतल्यास, सर्वोच्च
न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
****
ठाणे शहरातल्या कौसा भागात एका
गॅरेजमध्ये स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी
इस्माइल शेख, अब्दुल्ला शेख आणि महेंद्र नाईक या तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त
केलेल्या स्फोटकांमध्ये १० ते १५ किलो अमोनिअम नाइट्रेट, नऊ डेटोनेटर्स तसंच क्रूड
बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा समावेश आहे.
****
गणेशोत्सव शांततेत पार पडावा,
यासाठी पोलीस विभागानं सुरक्षेचे आवश्यक उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबई इथं गणेशोत्सव आढावा बैठकीत बोलत होते. गणेशोत्सव
मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातल्या सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही
करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या
विविध भागातून आलेल्या शेतकरी तसंच अल्पसंख्याक महिलांनी आज मुंबईत इथं मुख्यमंत्र्यांना
राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
****
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेचे नेते दशरथ
सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकरी संपात खोत यांनी सरकारला अनुकूल
भूमिका बजावली असा आरोप करत, संघटनेनं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. खोत
यांनी चौकशी समितीपुढे हजर राहून आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडले होते. खोत यांच्या
हकालपट्टीनंतर आता भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत राहायचं की नाही याचा निर्णय संघटना
लवकरच घेईल, असंही सावंत यांनी सांगितलं.
****
पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी सरकारनं द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या
सुकाणू समितीनं केली आहे. सरकारनं हमी न दिल्यास, येत्या १४ ऑगस्टच्या नियोजित चक्का
जाम मध्ये कर्जमुक्तीच्या मागणी बरोबरच पीक विम्याचा मुद्दा घेऊ, असंही समितीच्या वतीने
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पीक विमा नोंदणीसाठी ऑन लाईन पद्धतीचा
अनावश्यक आग्रह धरल्यानं, राज्यातले ४० टक्के शेतकरी पीक विमा संरक्षणांपासून वंचित
राहिले असल्याचा आरोपही समितीनं केला आहे.
****
देशभक्त आणि देशप्रेम या दोन्ही
शब्दात फरक असून, आपण देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचं दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले विद्यार्थी नेते कन्हय्या कुमार यांनी
स्पष्ट केलं आहे. बिहार ते तिहार या कन्हय्या कुमार लिखित आत्मकथनाच्या मराठी अनुवादाचं
प्रकाशन आज औरंगाबाद इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
डॉ. भालचंद्र कांगो, पुस्तकाचे अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात
मठ पिंपळगाव इथं आज वायुसेनेच्या एका हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लॅंडिंग करावं लागलं.
या हेलिकॉप्टरमध्ये तीन जवान होते. सुमारे दहा मिनिटांनंतर हे हेलिकॉप्टर सुखरूप मार्गस्थ
झालं.
****
No comments:
Post a Comment