Friday, 1 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.



****

** आधार क्रमांक पॅन शी जोडण्याकरता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

** मुंबई भेंडीबाजार भागात पाच मजली रहिवासी इमारत कोसळून २४ जण ठार

** एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातल्या तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार; परभणीच्या लता वांईगडे यांचा समावेश

आणि

** चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर १६८ धावांनी दणदणीत विजय

****

आधार क्रमांक कायम खाते क्रमांक -पॅन शी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हे दोन्ही क्रमांक परस्पर संलग्न करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख होती. बॅंक खातं तसंच मोबाईल सिमकार्ड सह घरगुती वापराच्या गॅसचं अनुदान घेण्यासाठी वापरला जाणारा आधार क्रमांक, आता आयकर विवरण पत्र सादर करण्यासाठीही अनिवार्य आहे. त्यामुळे हे दोन्ही क्रमांक परस्पर संलग्न करणं अनिवार्य असून, तसं न केल्यास, आयकर विवरण पत्रही सादर करता येणार नाही, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न जीडीपीत घसरण झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीतल्या ६ पूर्णांक एक टक्क्यांच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी दरात घट होऊन तो ५पूर्णांक ७ टक्के इतका नोंदवला गेला आहे.

****

मुंबईतल्या जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात काल सकाळी पाच मजली रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या २४ झाली आहे. सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ३० जणांना बाहेर काढण्यात आलं असून, उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, इमारत दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

****

मुंबई वगळता राज्यातल्या दहा अकृषक विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बृहत आराखड्यांना अंतिम मंजूरी देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या विद्यापीठांमध्ये औरंगाबाद इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा समावेश आहे. या बृहत आराखड्यांमध्ये विद्यापीठांचं पाच वर्षांचं नियोजन असून त्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातल्या ५१ अंगणवाडी सेविकांना काल केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या तीन अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र असं स्वरुप असलेल्या या पुरस्कारप्राप्त अंगणवाडी सेविकांमध्ये, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या, पडेगाव अंगणवाडी केंद्राच्या सेविका लता वांईगडे, चंद्रपूर जिल्हयातल्या गोपालपूर इथल्या अंगणवाडी केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पैंडाखले अंगणवाडी केंद्राच्या सेविका चंद्रकला चव्हाण यांचा समावेश आहे.

****

नाशिक मुंबई रेल्वेमार्गावर कसाऱ्या जवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल नाशिकरोड स्थानकावरून पंचवटी, गोदावरी, राज्यराणी आणि शताब्दी अशा चार गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या, मुंबई कडून येणाऱ्या रेल्वे मात्र किमान चार तास विलंबानं नाशिक कडे येत आहेत. दरम्यान, मुंबई ते नागपर नंदिग्राम एक्स्प्रेस तसंच मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस आज आणि उद्या रद्द करण्यात आली असल्याचं, दक्षिणमध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलंबो इथं झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर १६८ धावांनी मात केली. नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीच्या १३१ तर रोहित शर्माच्या १०४ धावांच्या बळावर भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७६ धावांचं लक्ष्य ठेवलं, मात्र श्रीलंकेचा संघ २०७ धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासह मालिकेत भारतानं चार - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे, मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना परवा रविवारी कोलंबो इथं होणार आहे. 

****

जर्मनीत हॅम्बर्ग इथं झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या गौरव बिधुडीनं कांस्य पदक पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीत गौरवचा अमेरिकेच्या मुष्टीयोद्ध्याकडून पराभव झाला.



दरम्यान, जागतिक बॅटमिंटन स्पर्धेत रौप्य तसंच कांस्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांना काल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. किदांबी श्रीकांत, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि विमल कुमार यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

****

घरोघरी स्थापन झालेल्या ज्येष्ठा गौरींचं काल पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. गौरींसोबत अनेक ठिकाणी काल सात दिवसांच्या गणपतीचंही विसर्जन झालं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं रात्री एक वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती, उदगीर शहरात प्रथमच बँडपथकाच्या घोषात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



उस्मानाबाद जिल्ह्यात २८५ गावात एक गाव एक गणपती तर दोन शहरांमधल्या आठ प्रभागांमध्ये एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. अनेक गणेश मंडळांनी सामजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

हिंदू मुस्लीम तरुणांनी एकत्रित रित्या स्थापन केलेल्या परंडा शहरातल्या हंसराज गणेश मंडळानं स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, अवयवदान, सुकन्या समृद्धी योजनांची जनजागृती केली आहे, तर उस्मानाबाद शहराच्या दुर्गावाहिनी गणेश मंडळाच्या मुलींनी या वर्षी पहिल्यांदाच केवळ मुलींच्या सहभागातून गणेशोत्सव सुरू केला आहे. समता गणेश मंडळानं झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणाऱ्या गणेश मूर्तीची स्थापना केलीय. ढोकी इथलं कामगार गणेश मंडळ स्वखर्चानं परिसरातल्या नागरिकांना विद्युत पंपानं पाणी पुरवठा करतंय, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील गणेशोत्सव लोकजागृती तसंच सामाजिक कार्यात सर्वांना सहभागाची प्रेरणा देणारा ठरत आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

****

नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातून गोदावरी पात्रात पाण्याची आवक सुरू असल्यानं, पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा आता ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल रात्री, धरणात ५१ हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.

****

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा पुलावरून होणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत, हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत जनतेनं सहकार्य करावं असं आवाहन बीड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. या महामार्गावर उस्मानाबादकडून येणारी वाहनं मांजरसुंबा इथून तर औरंगाबाद कडून येणारी वाहनं गेवराई तालुक्यातल्या गढी इथून वळवण्यात येत आहेत.

****

उस्मानाबाद इथं औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या महिला स्वाधार केंद्राच्या अधीक्षकासह दोन जणांविरोधात फसवणूक तसंच महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रातल्या महिला गर्भवती प्रकरण तसंच शासकीय अनुदानासाठी बनावट हजेरीपत्र तयार केल्या प्रकरणी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या काल झालेल्या विशेष सभेमध्ये शहर निर्मल करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला.

****

No comments: