Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 1, September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
येत्या रविवारी होणार आहे. सकाळी दहा वाजता नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात नवीन मंत्र्यांचा
शपथविधी होणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजीव प्रताप रुडी, जलसंधारण राज्यमंत्री संजीव
बालयान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
****
कर प्रशासकांनी २०२२ पर्यंत देशाच्या कर प्रणालीत सुधारणा
करण्यासाठी लक्ष्य निर्धारित करावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्ली इथं महसुल ज्ञान संगम या राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन करताना बोलत
होते. कर प्रशासनात मानवी शक्ती कमीत कमी वापरली पाहिजे, आणि ई कर आकारणीचा वापर केला
पाहिजे, असं ते म्हणाले. देशातल्या ईमानदार करदात्यांचा कर व्यवस्थेवर विश्वास कायम
राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
****
केंद्रीय महिला आणि बालकल्याण
मंत्री मेनका गांधी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘पंतप्रधान मातृवंदना’ योजनेची सुरुवात
केली. गर्भवती महिलांना योग्य सोयी सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ देण्याचं या योजनेचं
उद्दीष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गर्भवती महिलांसाठी राखीव निधीचा उपयोग
त्यांच्या पोषक आहारासाठी व्हावा, असे निर्देश त्यांनी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना
दिले आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयानं आधार कायद्याच्या सुधारणा विधेयकाला
धन विधेयकाचा दर्जा देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस
नेते जयराम रमेश यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दाखवली आहे. गेल्या वर्षी
मार्चमध्ये आधार सुधारणा विधेयक लोकसभेत चर्चा करून पारित करण्यात आलं. मात्र, राज्यसभेत
या विधेयकात अनेक सुधारणा सूचवण्यात आल्या होत्या. विधेयक लोकसभेत परत आल्यानंतर लोकसभेनं,
राज्यसभेनं सूचवलेले कोणतेही बदल न करताच या विधेयकाला धन विधेयकाचा दर्जा देत पारित
केलं होतं.
****
सर्वोच्च न्यायालयानं १९८४च्या शीख विरोधी दंगलींची
चौकशी करण्यासाठी दोन माजी न्यायमूर्तींची समिती नेमली आहे. ही समिती दंगलींच्या १९९
प्रकरणांची चौकशी करणार आहे. न्यायमूर्ती जे एम पांचाल आणि के एस राधाकृष्णन यांची
समिती पाच सप्टेंबरपासून चौकशीला सुरुवात करणार आहे.
****
ईद उल जुहा अर्थात बकरी ईद उद्या
सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत. बकरी ईद हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा आणि त्याग या शाश्वत मूल्यांचं
स्मरण देतो, तसंच बकरी ईदचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रगती आणि समृद्धी घेऊन
येवो, अशी आशा राज्यपालांनी आपल्या शभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.
****
मुंबई इथल्या अल हुसैनी इमारत
दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई महानगरपालिका आणि तिथला
सत्ताधारी पक्ष शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी केला आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मिठी नदीच्या आणि नालेसफाईच्या कामावर झालेल्या
६५० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेत खासगीरित्या परिक्षा
देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सतरा नंबरचा फॉर्म यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीनं
स्वीकारला जाणार आहे. त्यासाठी फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात आली
असून, १५ सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म भरता येणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे
यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं लोककलावतांसाठी ज्येष्ठ
कवी वामनदादा कर्डक लोककलावंत स्वाभिमान योजना सुरु करणार असल्याचं सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं आज महाकवी वामनदादा
कर्डक यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वामनदादांच्या
लेखन साहित्याचा युवा पिढिला परिचय करुन देण्याच्या दृष्टीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात वामनदादा अध्यासन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात
येईल, त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव
सादर करण्यात येईल, असंही बडोले यांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्राध्यापक रामदास गायकवाड
यांना महाकवी वामनदादा कर्डक शिक्षकरत्न गौरव पुरस्कार २०१७ तर डॉ. प्रमोद दुथडे यांना
परिवर्तन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या
निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधाकिशन पठाडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे
उमेदवार राहुल सावंत यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला.
****
No comments:
Post a Comment