Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** मुंबईत पादचाऱ्यांसाठी पूल बंधनकारक करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
** पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवण्याचे तसंच समान कर, समान इंधन दर
प्रणाली अंमलात आणण्याची शिवसेनेची दसरा मेळाव्यात मागणी
** साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या हस्ते शुभारंभ
आणि
** ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पाचवा आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना
आज नागपूरमध्ये खेळला जाणार
****
मुंबईत एल्फिन्स्टन
स्थानकावर चेंगराचेंगरीत झालेल्या २३ जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल
यांनी उपनगरीय रेल्वेमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी काल रेल्वे मंडळाची
मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत स्थानकावरून चालत जाण्यासाठीचे
पादचारी पुल हे आता प्रवाशांची सुविधा म्हणून नव्हे तर बंधनकारक
म्हणून असतील, असे निर्देश गोयल यांनी दिलेत. तसंच ज्या स्थानकावर अधिक गर्दी असते
अशा ठिकाणी अधिकच्या लिफ्ट बसवण्याचे निर्देशही गोयल यांनी यावेळी दिले. याशिवाय या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली
एक उच्चस्तरीय समिती त्यांनी नियुक्त केली. दरमहा ही समिती कामांचा आढावा घेणार आहे.
****
केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नागपूरमध्ये चिंचभुवन ते नवीन विमानतळ दरम्यानच्या मेट्रो रेल्वेच्या
चाचणी सेवेला काल हिरवा झेंडा दाखवला. या दोन स्टेशनमध्ये साडेपाच किलोमीटरचं अंतर
आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे
रोजगाराच्या २० हजार संधी निर्माण होणार असून आर्थिक विकासाला गतीदेखील मिळेल, असं
सांगितलं.
****
विजयादशमी
अर्थात दसऱ्याचा सण काल सर्वत्र
उत्साहात साजरा
करण्यात आला. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या
सणाला उद्योग आणि व्यापारी जगतात अधिक महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्ट्याही या सणाचं
देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळं महत्त्व आहे, त्यामुळे परंपरेनुसार हा सण सर्वत्र
साजरा करण्यात आला. नागपूर इथं दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार
पडला. जगाला आत्ता भारताच्या शक्तीचा परिचय होत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यावेळी
म्हणाले. गोरक्षा, चीन, पाकिस्तान, रोहिंग्या, आदी मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य
केलं. शिवसेनेचाही दसरा मेळावा मुंबईत पार पडला.
सरकारनं पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवावेत तसंच
समान कर प्रणालीसोबत समान इंधन दर प्रणाली अंमलात आणण्याची मागणी शिवसेना पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलतांना केली. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४० रूपये
प्रतिलिटर असून या दरानुसार भारतातही पेट्रोलचे दर असावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी
व्यक्त केली. आपल्या भाषणात ठाकरे यांनी केंद्र सरकारची धोरणं आणि भारतीय जनता पक्षावरही
जोरदार टीका केली. यामध्ये बुलेट ट्रेन, रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न, जम्मू काश्मीरची
स्वायत्तता, नोट बंदी, वस्तु आणि सेवा कर, गोहत्या, वाढती महागाई आदि मुद्यांचा समावेश
होता. हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षावरही ठाकरे यांनी कडाडून टीका केली.
राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवरही ठाकरे यांनी आपल्या भाषणातून नापसंती व्यक्त केली,
त्याचबरोबर राज्यात सत्तेत राहून जनहिताची भूमिका घेतली जाईल, असंही त्यांनी यावेळी
स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट या
भगवानबाबा यांच्या जन्मगावी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल दसरा मेळावा घेतला.
पाथर्डी इथल्या भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी परवानगी
नाकारली होती. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. सावरगाव इथं भगवान
बाबांची पाण्यावर तरंगणारी मूर्ती उभारण्यात येणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी
सांगितलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथ कुलस्वामिनी तुळजभवानीचा
सीमोल्लंघन सोहळा सूर्योदयाच्या पहिल्या किरणात काल पहाटे पार पडला. लाखोच्या संख्येनं
भाविकांची या सोहळ्याला उपस्थिती होती. काल झालेल्या सीमोल्लंघन आणि धार्मिक विधीनंतर
येत्या ५ तारखेपर्यंत तुळजाभवानी श्रम निद्रा घेणार आहे.
नांदेड इथं गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा असलेला दसरा
हल्ला महल्ला उत्सव आणि नगरकीर्तन सोहळा काल जल्लोषात पार पडला. गुरुद्वारा तख्त सचखंद
हुजूरसाहिब मध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो. काल काढण्यात आलेल्या हल्ला महल्ला
आणि नगरकीर्तन यात्रेमध्ये घोडे, हत्तींची मिरवणूक, कीर्तन जत्त्थे, भजन मंडळी तसंच
बँड पथकांचा समावेश होता.
*****
धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं होतं. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा
भूमीवर मुख्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना केंद्रात
भंते विशुद्धानंद बोधी यांनी उपासकांना धम्मसेना दिली. यावेळी शहर आणि परिसरातून उपासकांची
उपस्थित होती.
परभणी
इथं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन शहरातल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी पंचरंगी ध्वजास मानवंदना
देण्यात आली. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
वतीनंही दसऱ्यानिमित्त परभणी इथं पथसंचलन करण्यात आलं.
****
शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष
सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज करणार आहेत. राज्यपाल सी विद्यासागर
राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील. शिर्डी-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ ही आज राष्ट्रपती
करणार आहेत.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
कारखान्यांनी
शेतकऱ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ अधिक गतिमान करावी, असं आवाहन
पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथं काल संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन
कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी, कामगारांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्याकरता
लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं जानकर यावेळी म्हणाले.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा आणि मिशन ९० दिवस या उपक्रमांतर्गत
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे जिल्ह्यात शौचालय
बांधकामाच्या कामाला गती मिळाली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे
वार्ताहर.....
स्वच्छताही सेवा या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांमध्ये सर्व नगरपालिकांच्या
कार्यक्षेत्रात स्वच्छतारथ, परिसर स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छालय बांधकामं आणि वापर
याबाबत जनजागृती, तुळजापूर इथल्या एका महिलेनं जोगवा मागून मिळालेल्या उत्पन्नातून
स्वच्छालयं बांधकाम, भुम तालुक्यातील एका महिलेनं मंगळसुत्र विकून स्वच्छालयाच बांधकाम
केलं. तुळजापूर तालूक्यातील एका शिक्षकानं स्वतःच्या पैश्यातून तीस स्वच्छालयं बांधली,
कंचेश्वर ग्रुपने शंभर स्वच्छालयांचे खंडे खोदून दिले. बालाजी अमायन्स कंपनीनं सामाजिक
दायीत्व निधीतून दोन गावात चोवीस सर्वाजनिक स्वच्छालयं बांधकामं सुरु केली आहेत. एकाच
दिवशी दहा हजार स्वच्छालयं खड्डे खोदण्याचा उपक्रमही या अभियानात केला गेलायं. त्यामुळे
जिल्ह्यात वैयक्तिक स्वच्छालयांची संख्या वाढत असून त्याचा वापरही वाढत आहे.-देवीदास
पाठक,वार्ताहर,उस्मानाबाद
****
ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पाचवा आणि अंतिम
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता
हा सामना सुरू होईल. प्रारंभीचे तिन्ही सामने जिंकून भारतानं ही मालिका अगोदरच जिंकली
आहे. मात्र चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियानं २१ धावांनी जिंकला होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे काल सकाळी अर्ध्या
फूटानं उघडण्यात आले. नदीपात्रात दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात
येत असल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून
जलाशयात पाण्याची आवक चालूच असल्यामुळे विसर्गात वाढही करण्यात येऊ शकते. धरणाच्या
डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही प्रत्येकी एक हजार आणि चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जालना शहरात येत्या
दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतचं नियोजन करण्यासाठी
काल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात बैठक घेतली.
****
No comments:
Post a Comment