Saturday, 2 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 02.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.



****

** केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांचे राजीनामे

** देशभरातल्या १७२ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार; राज्यातल्या १५ शाळांचा समावेश

** नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या सात हजार ५७६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

** सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.तात्याराव लहाने यांची निवड

आणि

** ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक लोककलावंत स्वाभिमान योजना सुरु करण्याची सामाजिक न्याय मंत्र्यांची घोषणा

****

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रपती भवनात सकाळी दहा वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी, बंडारू दत्तात्रय, संजीव बलियान, महेंद्रनाथ पांडे, फगनसिंह कुलस्ते यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय इतरही काही मंत्री राजीनामे देण्याची शक्यता आहे.

****

स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबाजवणी करणाऱ्या १७२ शाळांना काल दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, यामध्ये महाराष्ट्रातल्या १५ शाळांनाही गौरवण्यात आलं.​​ पाण्याची उपलब्धता, शौचालयांची तसंच हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, क्षमता विकास आदी मानकांवर हे पुरस्कार देण्यात आले. प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या किनवट इथली शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, बीड जिल्ह्यात शिरूर इथली मुलांची शासकीय निवासी शाळा, आणि परभणी जिल्ह्याच्या कोलवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे.

****

केंद्र शासनाकडून दिल्या जाणार्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातल्या २५ शिक्षकांचा समावेश आहे. मराठवाड्यातून लातूर इथले रामकिसन सुरवसे, गोपाळ सूर्यवंशी, उस्मानाबाद इथल्या उर्मिला भोसले, बीड इथल्या नंदा राऊत तसंच कमलाकर राऊत यांचा पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये समावेश आहे. पन्नास हजार रुपये, रौप्य पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र अस स्वरूप असलेल्या या पुरस्कारांचं वितरण येत्या ५ सप्टेंबरला नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या सात हजार ५७६ ग्रामपंचायतींचा  निवडणूक कार्यक्रम काल जाहीर झाला. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल हा कार्यक्रम जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी सात आणि १४ ऑक्टोबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून, सरपंचाची निवडही थेट केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १८  जिल्ह्यातल्या तीन हजार ८८४ तर दुसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यातल्या तीन हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात सात ऑक्टोबरला मतदान होणार असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१२, जालना २४०, बीड ७०३, नांदेड १७१, परभणी १२६, हिंगोली ४९, लातूर ३५३ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी १५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २७  सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. सात ऑक्टोबरला मतदान तर मतमोजणी नऊ ऑक्टोबरला होईल. या निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे.

****

ईद उल जुहा अर्थात बकरी ईद आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पणभाव, श्रद्धा आणि त्याग या शाश्वत मूल्यांचं स्मरण करून देणारा हा सण, प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रगती आणि समृद्धी घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

घरगुती अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपयांनी तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत ७४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कालपासून हे दर लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान प्रणाली बंद करण्यासाठी गॅस सिलिंडरच्या किमतीत दरमहा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

येत्या १० सप्टेंबरला होणाऱ्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. इंडोनेशियातल्या बाली इथं हे संमेलन होणार असून ‘वैद्यक क्षेत्राशी संबंधित लेखन आणि लेखन व्यवहार’ हा यंदाच्या संमेलनाचा विषय आहे.

****

लोककलावतांसाठी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक लोककलावंत स्वाभिमान योजना सुरु करणार असल्याची घोषणा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वामनदादांच्या लेखन साहित्याचा युवा पिढीला परिचय करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल, त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक यांच्या जन्मगावी त्यांचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असंही बडोले म्हणाले. या कार्यक्रमात प्राध्यापक रामदास गायकवाड यांना महाकवी वामनदादा कर्डक शिक्षकरत्न गौरव पुरस्कार तर डॉ. प्रमोद दुथडे यांना परिवर्तन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधाकिशन पठाडे विजयी झाले आहेत. काल झालेल्या निवडणुकीत पठाडे यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल सावंत यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला.

****

बीड शहरातल्या बिंदुसरा नदीवरचा पुल खचल्यामुळे पर्यायी रस्त्याचं काम लवकरच सुरु होईल अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.त्या काल अंबाजोगाई इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. मुंडे यांच्या हस्ते यावेळी तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं.

****

शेतीचं उत्पन्न दुपटीनं वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. काल जालना जिल्ह्यात खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित ‘संकल्प ते सिध्दी‘ शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

****

लातूर जिल्हा नियोजन समितीच्या ३२ पैकी २९ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर तीन जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होऊन येत्या १० तारखेला ही निवडणूक होईल. बिनविरोध निवड झालेल्या जागांपैकी जिल्हा परिषदेच्या २३, महापालिकेच्या पाच तर नगर पंचायत विभागाच्या एका जागेचा समावेश आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणी साठा आता ८० टक्क्यांवर झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, धरणात होणारी पाण्याची आवकही मंदावली आहे. काल रात्री धरणात दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.

दरम्यान, पाऊस वाढल्यास, धरणात पाण्याची आवक वाढेल, आणि कधीही विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता असल्यानं, गोदाकाठच्या नागरिकांनी सावध राहावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे.

****

नागपुर - मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस आसनगाव - वाशिंद स्थानकादरम्यान रुळावरुन घसरल्यामुळे सिकंदराबादहून नांदेड, औरंगाबादमार्गे मुंबईला जाणारी देवगिरी एक्सप्रेस काल रद्द करण्यात आली होती. परिणामी मुंबईहून येणारी देवगिरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते नागपूर नंदिग्राम एक्स्प्रेस तसंच मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसही आज रद्द करण्यात आल्या आहेत.

****



जनसामांन्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती जनतेला करुन देण्यासाठी  माहिती आणि  जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचं  मराठवाड्यात ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या योजनांचा  महिलांनी लाभ घ्यावा असं  आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे औरंगाबाद जिल्हा समन्वयक विजय डोके यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यात खोपेगाव इथं संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांचं शासकीय योजनांबाबत प्रबोधन करण्यात आलं.

****

No comments: