Sunday, 1 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मुंबई इथं एका कार्यक्रमात शहरी महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून मुक्त झाला असल्याची घोषणा केली. नवभारताच्या निर्माणात मुलींची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी शिर्डी इथं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, तसंच श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ केला. छोटी शहरं मोठ्या शहरांशी विमानसेवेनं जोडल्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. राज्य शासनानं विकसित करून चालवण्यास घेतलेलं शिर्डी विमानतळ हे देशातलं पहिलं विमानतळ असून, या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

****

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वस्तू आणि सेवा करांतर्गत कर कपातीचे संकेत दिले आहेत, ते फरीदाबाद इथं महसूल अधिकाऱ्यांच्या ६७व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होते. समाजातल्या सर्वच घटकांवर अप्रत्यक्ष कराचा बोजा पडत असल्याचं सांगतानाच अर्थमंत्र्यांनी, सर्वसामान्यांचा अधिकाधिक वापर असलेल्या वस्तूंवरचा कर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं जेटली म्हणाले. ग्रामीण विकास, पायाभूत सोयी सुविधा आणि संरक्षणावर खर्च होत असल्याने, विकासाच्या अपेक्षेसोबतच, कर भरण्याच्या जबाबदारीचंही भान ठेवावं असं मत जेटली यांनी व्यक्त केलं.

****

काँग्रेस पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असं त्यांच्या नवीन पक्षाचं नाव असून, पक्षाचा झेंडा आणि चिन्ह लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या पक्षाच्या माध्यमातून घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन सारख्या उपक्रमांचं कौतुक करत राणे यांनी भारतीय जनता पक्षाचं अघोषित समर्थन केलं.

****

सर्वोच्च न्यायालय आणि २४ उच्च न्यायांलयांमधल्या प्रलंबित खटल्यांची संख्या गेल्या तीन वर्षात कमी झाली, तर छोट्या न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त झाली आहे. विधी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

****

प्रशासन लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हावं यासाठी राज्याने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि कार्यक्षमता या त्रिसूत्रीच्या आधारावर शासनाचं सुशासनात रुपांतर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात ते बोलत होते. वितरण प्रणालीच्या डिजीटायझेशनमुळे दरमहा ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे, तर उद्योग विभागाच्या ‘मैत्री’ प्रकल्पाच्या माध्यमातून ९० हजार कोटींच्या प्रकल्पांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

नांदेडकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे आज सकाळच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरले. यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्सप्रेस नांदेडहून सुमारे एक तास उशीरानं निघाल्या. रेल्वे वाहतूक संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.

****

“स्वच्छता हीच सेवा” या कार्यक्रमाअंतर्गत जालना शहरात उद्या महास्वच्छता अभियान राबवलं जाणार असून, याची सुरुवात जनजागृती महारॅलीनं करण्यात येणार आहे. शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळून सकाळी साडे आठ वाजता ही रॅली निघणार असून, यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या पाचव्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर सामना जिंकण्यासाठी २४३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघानं ५० षटकात नऊ बाद २४२ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलनं तीन, जसप्रित बुमराहनं दोन, तर हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एक बळी घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेतले पहिले तीन सामने जिंकून भारतानं मालिका याआधीच जिंकली आहे.

****

No comments: