Monday, 2 October 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 02.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** अर्धा महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्राचं अभिनंदन

** शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, तसंच श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्यास प्रारंभ

** देशभरातल्या महामार्गांवर आजपासून मोफत नेत्र तपासणी शिबीरं

** माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची नवीन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापनेची घोषणा

** प्रसिध्द लेखक पत्रकार ह. मो. मराठे यांचं निधन

आणि

** ऑस्ट्रेलियाविरूध्दचा अंतिम क्रिकेट सामनाही भारतानं जिंकला

****

महाराष्ट्रातली शहरं उघड्यावरच्या शौचापासून मुक्त झाली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा केली. महाराष्ट्रातले सुमारे ४९ टक्के नागरिक शहरात राहतात, या अर्थानं, अर्धा महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राचा हा आदर्श इतर राज्यांसाठी प्रोत्साहन देणारा ठरेल, सा विश्वास व्यक्त करत, राष्ट्रपतींनी, स्वच्छ भारत अभियानाची उद्दिष्टं पूर्ण करणं, ही महात्मा गांधीच्या जयंतीदिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल असं नमूद केलं. स्मार्ट शहरं योजनेसोबतच स्मार्ट सांडपाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट घनकचरा व्यवस्थापनाची गरज त्यांनी व्यक्त केली. उघड्यावर शौचापासून मुक्त नवभारताच्या निर्माणात मुलींची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती म्हणाले.

महाराष्ट्रातली शहरं उघड्यावर स्वच्छापासून मुक्त घोषित होणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. जनतेला शिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता कार्यक्रम हाती घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातलं एखादं शहर अथवा गाव हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी त्रिस्तरीय वैधता प्रक्रिया राबवली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी ांदेड महापालिकेसह काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं.

****

राष्ट्रपतींनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्या काल शिर्डी इथं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, तसंच श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ केला. यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी परभणी जिल्ह्याच्या पाथरी इथल्या साई जन्मस्थळाचा विकास करण्याबाबत विचार व्हावा, असं मत व्यक्त केलं. साई संस्थान अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, राष्ट्रपतींनी स्वच्छतेच्या बाबतीत अधिक सजग राहण्याचं आवाहन केलं.

तत्पूर्वी राष्ट्रपतींनी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करुन, शिर्डी - मुंबई विमान हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हवाई मार्गानं जोडल्यामुळे शिर्डीच्या आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, आणि अधिकाधिक रोजगार निर्माण होईल, असं राष्ट्रपती म्हणाले.

राज्‍य शासनानं विकसिकरून चालवण्‍यास घेतलेलं शिर्डी विमानतळ हे देशातलं पहिलं विमानतळ असून, या विमानतळाचा विस्‍तार करण्‍यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या विमानसेवेअंतर्गत शिर्डी विमानतळाहून मुंबईसाठी चार तर हैदराबाद आणि दिल्लीसाठी एक एक विमान सोडण्यात येणार आहे.

****

देशभरातल्या महामार्गांवर आजपासून मोफत नेत्र तपासणी शिबीरं भरवण्यात येत आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज नागपूर नजिक पांजरी पथकर नाक्यानजिक या नेत्र तपासणी शिबीराचं उद्घाटन करतील. पाच दिवस चालणाऱ्या या शिबीरांमध्ये ट्रकचालक आणि त्यांच्या सहायकांची मोफत नेत्र तपासणी तसंच गरजेनुसार मोफत चष्मे वाटप केलं जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुक सुरक्षित असावी, या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे.

वर्धा जिल्ह्यात सिंदी इथं ड्रायपोर्टचं भूमीपूजनही गडकरी यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे. विदर्भातल्या उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी ३५० एकर क्षेत्रात ५०० कोटी रूपये खर्च करून हे ड्रायपोर्ट उभारलं जाणार आहे.

****

काँग्रेस पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नवीन पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. पक्षाची नोंदणी लवकरच होणार असून, पक्षाचा झेंडा आणि चिन्ह लवकरच जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या पक्षाच्या माध्यमातून घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेना, तसंच कॉंग्रेस पक्षांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन सारख्या उपक्रमांचं कौतुक करत राणे यांनी भारतीय जनता पक्षाचं अप्रत्यक्ष समर्थन केलं.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ- एस टीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ‘संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा आज प्रारंभ होत आहे. या अंतर्गत सर्व एसटी बस आणि बस स्थानकं स्वच्छ केली जाणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई इथं ही घोषणा केली. एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयांच्या मुख्य बस स्थानकांवर आज सकाळी ११ वाजता या प्रकल्पाला प्रारंभ होईल.

****

उपनगरीय रेल्वेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन विशेष बाब म्हणून बोलावावं, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंबईत गेल्या २९ तारखेला झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी या मागणीचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काल केवळ महिलांशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी अशा ग्रामसभा घेण्याची सूचना केली होती. औरंगाबाद जिल्ह्यात ८६२ पैकी ८१५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या.

****

नागपूर इथं झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सात गडी आणि सात षटकं एक चेंडू राखून दणदणीत विजय मिळवत मालिका चार एकनं जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया संघानं प्रथम फलंदाजी करत, भारताला २४३ धावांचं लक्ष्य दिलं होतं, भारतीय संघानं रोहित शर्माच्या १२५ धावांच्या बळावर ४२ व्या षटकांतच हे आव्हान पार केलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौदावं शतक झळकावणारा रोहित शर्मा सामनावीर तर मालिकेत २२२ धावा आणि सहा बळी घेणारा हार्दिक पंड्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान या दोन्ही संघादरम्यान ट्वेंटी ट्वेंटी मालिकेला येत्या शनिवारपासून सुरुवात होत असून, तीन सामन्यांपैकी पहिला सामना रांची इथं खेळवला जाणार आहे.

या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारत पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

****

नांदेडकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे काल सकाळच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरले. यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. नांदेडहून अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्सप्रेस नांदेडहून सुमारे एक तास उशीरानं निघाल्या.

****

लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी काल हरंगुळ इथं समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहाची पाहणी केली. या वसतीगृहात सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी इथल्या मुला मुलींची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून इथल्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

****

मुस्लीम समाजाच्या वतीनं काल मोहर्रम निमित्त ताबूत तसंच सवाऱ्यांचं विसर्जन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान, कोल्हापूर इथं या मिरवणुकीत शहर बस घुसल्यानं, दोन जण ठार झाले. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

"स्वच्छता हीच सेवा" या कार्यक्रमाअंतर्गत जालना शहरात आज महास्वच्छता अभियान राबवलं जाणार असून, याची सुरुवात जनजागृती महासंदेश फेरीनं करण्यात येणार आहे. शहरातल्या  महात्मा गांधी पुतळ्याजवळून सकाळी साडे आठ वाजता ही संदेश फेरी निघणार असून, यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

प्रसिध्द लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. विपुल साहित्य लेखन केलेले मराठे यांची पत्रकारितेची कारर्किदही चांगली गाजली होती.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघानं तालुक्यातल्या एकहजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांची १८ हजार क्विंटल इतकी तूर खरेदी केली असल्याचं संघाचे अध्यक्ष भरत चामले यांनी सांगितलं. ही तूर खरेदी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आलं होतं.

****

No comments: