Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
बलिप्रतिपदा
अर्थात दिवाळीचा पाडवा आज सर्वत्र साजरा होत आहे. आज गोवर्धन पूजा तसंच अन्नकूट करण्याचा
प्रघात आहे. उत्तर भारतीय बांधवांमध्ये हा सण विशेषत्वाने साजरा केला जातो. विक्रम
संवत दोन हजार ७४ ला आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी
बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
उत्तराखंड
सरकारनं सिक्कीमप्रमाणे शंभर टक्के सेंद्रीय शेतीचा संकल्प करावा, असं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केदारनाथ इथं विविध योजनांची पायाभरणी केल्यानंतर ते
बोलत होते. राज्याराज्यांनी परस्परांमध्ये विकासाची स्पर्धा करावी, असं पंतप्रधान म्हणाले.उपलब्ध
नैसर्गिक साधनसंपदेचा वापर करून, पर्यटनाला अधिक चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त
केली. उघड्यावर शौचापासून मुक्तीच्या अभियानात उत्तराखंडमध्ये शासकीय यंत्रणेसह सर्वांनी
सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यापूर्वी पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिराला भेट
देऊन पूजा केली. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उद्यापासून बंद होणार आहेत.
****
पालघर जिल्ह्यात पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी दिवाळी निमित्त बुधाडपाडा
इथं गरीब आदिवासी महिलांना साडी आणि
मिठाईचं वाटप करण्यात आलं. सुमारे पाचशे आदिवासी
महिलांना साड्या आणि मिठाईचं वाटप करण्यात आल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
एसटी कर्मचारी संघटनांचा
संप अद्याप सुरूच आहे. यामुळे पुणे शहरातल्या चारही बसस्थानकांवर आरक्षित
तिकिट रद्द करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. काल दिवसभरात सुमारे ६५ हजार प्रवाशांनी आरक्षण रद्द करून सुमारे १४ लाख
रुपये परतावा घेतल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, पुणे प्रशासनाकडून
प्रवाशांच्या सोयीसाठी ४०० खासगी बस तसेच स्कूल बस उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत.
****
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या अनेक मालमत्तांचा
लिलाव होणार असून यामध्ये औरंगाबाद इथल्या ६०० चौरस फुटाच्या
भूखंडाचा समावेश आहे. प्रशासनानं या संदर्भात एक जाहिरातही प्रसिध्द केली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा लिलाव होणार आहे.
****
मुंबई हल्ल्याचा
सूत्रधार आणि जमात उद दावा
ह्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदच्या नजरकैदेत लाहोर उच्च
न्यायालयानं काल आणखी ३० दिवसांची वाढ केली आहे. सरकारच्या विधी अधिकाऱ्यानं केलेल्या
युक्तीवादानंतर तीन सदस्यीय पंजाब न्यायिक पुनर्विचार मंडळानं सईदच्या नजरकैदेत काल
वाढ केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ही नजरकैद २४ ऑक्टोबरपासून लागू होईल. दरम्यान
न्यायिक मंडळानं सईदच्या अन्य चार साथीदारांच्या नजरकैदेत वाढ करण्यास मनाई केली आहे.
****
राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे. मराठा समाजानं आपल्या विविध
मागण्यांसाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढूनही राज्य सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा
आरोप करत, काल विविध संघटनांच्या वतीनं औरंगाबाद इथं सत्याग्रह करण्यात आला, त्यावेळी
ही माहिती देण्यात आली. शहागंज परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ दिवसभर हे
आंदोलन करण्यात आलं. यासंदर्भात येत्या २९ ऑक्टोबरला मराठा महासभेचं आयोजन करण्यात
आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर
खासगी आरामबसला आज पहाटे झालेल्या अपघातात एक जण ठार, तर १४ जण जखमी झाले. मुंबईहून गोव्याकडे
निघालेल्या या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. पहाटे पाच वाजण्याच्या
सुमारास संगमेश्वरजवळ रामकुंड इथल्या वळणावर, चालकाचा ताबा सुटून
ही बस उलटली. बसची काच फुटून, चालकाचा सहचालक बाहेर फेकला गेला, त्याच्या अंगावरच
बस उलटल्यानं तो बसखाली दबून जागीच ठार झाला. इतर प्रवाशांना संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल
करण्यात आलं असून ११ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर दोन अपघातात
दोघांचा मृत्यू झाला. पाटस गावाजवळ कंटेनर आणि टॅम्पोच्या धडकेत टॅम्पोचालक ठार झाला,
तर दुसऱ्या दुर्घटनेत एका बसची धडक बसून पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
****
शिक्षक पात्रता
परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र होणं असा अर्थ होत नाही,
असं राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. शिक्षक भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षा
या दोन्ही बाबी भिन्न आहेत. शिक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांनं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेबरोबरच शिक्षक
पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सर्व अर्हता पूर्ण असलेल्या उमेदवाराचा शिक्षक संवर्गातल्या रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार नियुक्तीकरीता
विचार करण्यात येतो,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment