Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
*******
- पाम तेलांवरचं आयात शुल्क दुप्पट करण्याचा केंद्र सरकाचा निर्णय
- कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातले तिन्ही आरोपी दोषी; येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला शिक्षा सुनावणार
- मराठवाडा आणि विदर्भात, कापसावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचं कृषी राज्य मंत्र्यांचं आवाहन
- लातूर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि ट्रकच्या अपघातात सात जण ठार तर ३८ जण जखमी
आणि
- कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात चार बाद १६५ धावा
****
केंद्र सरकारनं देशात आयात करण्यात
येणाऱ्या कच्च्या पाम तेलांवरचं आयात शुल्क दुप्पट वाढवून ते १५ टक्क्यांवरून ३० टक्के केलं आहे. देशात आयात होणाऱ्या स्वस्त तेलावर निर्बंध घालून देशांतर्गंत शेतकरी आणि तेल उत्पादकांच्या
हिताचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शुद्ध कच्च्या पाम तेलावरचं
आयात शुल्क हे २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तसंच कच्च्या
सोयाबीन तेलावरचं आयात शुल्क हे साडे सतरा टक्क्यांवरून ३० टक्के, तर शुद्ध सोयाबीन
तेलावरचं शुल्क २० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं सोयाबीन,
सुर्यफूल, मोहरीच्या तेलावरच्या आयात शुल्कात मोठी वाढ करुन, शेतकरी आणि देशी तेल उद्योगाला
मोठा दिलासा दिला असल्याची माहिती, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी
दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बाजारात आता सोयाबीनचे भाव हमी
भावाइतके होतील, अशी खात्री असल्याचं ते म्हणाले.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या जितेंद्र शिंदे,
संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिन्ही आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी
ठरवलं आहे. येत्या २१ आणि २२ नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आरोपी
शिंदे यानं बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला तर भवाळ आणि भैलूमे या दोघांनी या गुन्ह्यात
त्याला साह्य केल्याचं स्पष्ट झालं आहे. १३ जुलै २०१६ रोजी ही घटना घडली होती. परिस्थितीजन्य
आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे हा खटला लढवण्यात आला असल्याचं विशेष सरकारी वकील
उज्ज्वल निकम यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन
होणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात, त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचं आवाहन
कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित
मोफत रोजगार मेळाव्यात ते काल बोलत होते. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी
मुद्रा बँक योजनेचा फायदा घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे. ते म्हणाले …
मी इथं आलेल्या तरूणांना सांगेल. की आत्महत्या हा पर्याय नाही. कारण या विदर्भ
मराठवाड्यामध्ये पांढरं सोनं ज्याला आपण कापूस म्हणतो तो प्रचंड प्रमाणात निर्माण होतो.
कापसावर आधारीत प्रक्रिया करणारी उद्योगधंद्याची श्रृखंला आपण उभा करू शकतो. मराठवाड्यामध्ये
कडधान्य मोठ्या प्रमाणात पिकतं. त्या डाळीवर प्रक्रिया करणारा उद्योग असेल, दुधाचा
उद्योग असेल, कडकनाथ जातीची कोंबडी म्हणून एक आता पुढे आलेला हा ही एक उद्योग आहे.
अरे नोकऱ्या कुठे मागता मला गुलाम बनायचं नाही.मला मालक बनायचंय ही भावना मनात तयार
करूया.
****
राज्यात २७ जिल्ह्यांमधल्या
७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी येत्या २६ डिसेंबर रोजी मतदान होणार
असून दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबरला मतमोजणी होईल, असं राज्य निवडणूक आयोगानं आपल्या
प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
आणि लातूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
****
राज्यात आजपासून कौमी एकता
सप्ताहाला प्रारंभ होत आहे. येत्या २५ नोव्हेंबर पर्यंत हा सप्ताह साजरा केला जाईल.
यानिमित्त या काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. नागरिकांनी येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत आपल्या सूचना १८०० ११ ७८०० या निःशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा-निलंगा
मार्गावर चलबुर्गा पाटीजवळ काल राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात सात जण ठार तर ३८ जण जखमी झाले
आहेत. मृतांमध्ये
एका २ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. जखमींवर औसा आणि लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर
आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
अहमदनगर - मनमाड मार्गावर राहुरीजवळ
काल झालेल्या अन्य एका अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. बंद असलेल्या
टेम्पोवर जीप जाऊन आदळल्यामुळे हा अपघात घडला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी
तालुक्यातल्या इंदापूर इथं फटाक्याच्या गोदामात स्फोट होऊन एक मजूर ठार झाला तर एक
जण जखमी झाला. काल सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.
***
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या
धरणग्रस्त आणि इतर शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी पाण्याचं आरक्षण
करण्याची मागणी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी, कामगार मंत्री आणि
राज्य कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे.
लातूर औद्योगिक वसाहतीला लातूर शहरानजीकच्या पाणीसाठ्यातून औद्योगिक वापरासाठी पाणी
आरक्षित करण्यात यावं, असं त्यांनी निलंगेकर यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
बोंड अळीनं बाधित शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज भरुन घेण्याच्या
सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल दिल्या. औरंगाबाद इथं कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष
गावांत जाऊन हे अर्ज भरून घ्यावेत, असं ते म्हणाले. बैठकीनंतर खोत यांनी जिल्ह्यातल्या बाळापूर इथल्या
बोंडअळीनं ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांना
बियाणे कंपन्यांकडून कशा प्रकारे मदत मिळेल याचा पाठ पुरावा करावा तसंच विमा कंपनींकडून सुध्दा
नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना
दिल्या.
****
हिंगोली जिल्ह्यामध्ये महिला
आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या बालकांच्या सर्वेक्षणात ४८२ तीव्र
कुपोषित तर १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालकं आढळली आहेत. या तीव्र कुपोषित बालकांसाठी
लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांचं अंगणवाडी
सेविकांमार्फत समुपदेशन करून या बालकांना चौरस आहार देण्यात येणार असल्याचं जिल्हा
परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितलं आहे.
****
कोलकाता इथं सुरू असलेल्या
भारत-श्रीलंका कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेनं पहिल्या डावात
चार बाद १६५ धावा केल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १७२ धावांवरच संपुष्टात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात नऊ खरेदी
केंद्रांच्या माध्यमातून शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्यात येत आहे, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. या केंद्रांवर एका शेतकऱ्याचं हेक्टरी साडेदहा क्विंटल सोयाबीन, पाच क्विंटल
मूग आणि पाच क्विंटल उडीद खरेदी करण्यात येत आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या रस्त्यावरच्या
खड्ड्याची तक्रार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केल्यास, त्याचा पाठपुरावा संबंधित
विभागाकडे करुन, त्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल यासाठी नागरिकांनी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी केलं आहे. परभणी इथं
विधी सेवा दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहीमेअंतर्गत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या
काल बोलत होत्या.
****
देहदानाबाबत समाजात जनजागृती होणं
गरजेचं असल्याचं मत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी.
आर. बोरा यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रूग्णालय - घाटीच्या शरीरशास्त्र विभागात काल देहदात्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी ‘देहदान
ऋणनिर्देश सोहळ्या’चं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
****
जलयुक्त शिवार अभियानातल्या
कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. उस्मानाबाद
जिल्ह्यात परंडा तालुक्याच्या हिंगणगांव इथं या अभियानातून बांधलेल्या बंधाऱ्यातील साठलेल्या जल पूजनाच्या कार्यक्रमात काल ते बोलत होते.
*******
No comments:
Post a Comment