Monday, 20 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.11.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

*******

  • साखर कारखानदारांशी चर्चा करुन दोन दिवसात ऊस दरावर तोडगा काढला जाईल-सहकार मंत्री सुभाष देशमुख
  • ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात
  • आधार कार्डशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जूनपासूनचं थकित मानधन रोखीनं देण्याचा निर्णय
  • इंदिरा गांधी शांतता, पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर

आणि

  • कोलकाता क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या एक बाद १७१ धावा

****

राज्यातल्या साखर कारखानदारांशी चर्चा करुन दोन दिवसात ऊसाच्या दरावर तोडगा काढला काईल असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात वाखरी इथं गेल्या आठ दिवसांपासून तीन शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. या शेतकऱ्यांची देशमुख यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या शेतकऱ्यांनी आंदोलन  मागे घ्यावं अस आवाहन त्यांनी यावेळी केलं.

आपण या ठिकाणी कारखानदार म्हणून नाही तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून आल्याचं देशमुख म्हणाले. ऊस दर आंदोलनात आपणास जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, काल सोलापूर जिल्ह्यात ऊस दरवाढीसाठी वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यामुळे शेतकरी त्यांना परवडेल त्या कारखान्यांना ऊस देऊ शकतील. शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांना ऊसाचा पाहिजे तो भाव मिळाला नाही तर त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडावा, असं ते म्हणाले.

****

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक वक्तव्य करणं हा गुन्हा असून, त्यासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं एका व्यक्ती विरोधात अपराधाबाबत कारवाई रोखण्यास तसंच प्रथम माहिती अहवाल रद्द करण्यास नकार दिला आहे.  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक टिपण्णी केल्याच्या विरोधात दाखल याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला.

****

गोव्यातल्या पणजी इथं आजपासून ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित असणार आहेत. या महोत्सवात ४२ भारतीय चित्रपटांसह एकूण २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत.

****

बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जून २०१७ पासूनचं मानधन बाकी आहे, त्यांना ते रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयास दिले आहेत. 

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काल त्यांच्या शंभराव्या जयंती दिनानिमित्त देशभर आदरांजली वाहण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांचं स्मरण करुन आदरांजली वाहीली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनामिमित्त मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

दरम्यान, यंदाचा इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे.  इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं ही माहिती दिली. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय राज्य घटनेचा मुलभूत आधार महाभारत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार करताना राज्य घटना, सर्वोच्च न्यायालय आणि स्त्री या तिनही क्षेत्राच्या समतोल अधिकाराचा समन्वय साधला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रीय न्याय गौरव पुरस्कार सिरपुरकर यांना काल प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

****

जालना जिल्हा पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं. आष्टी इथं विविध कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं ते म्हणाले.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मराठवाड्यातल्या गोरगरिब जनतेला न्याय देण्याचं महत्वाचं काम केलं आहे असं मुख्य न्यायमूर्ती डॉ.मंजुला चेल्लूर यांनी म्हटलं आहे. खंडपीठातल्या वकिल कक्षाच्या इमारत बांधकामाचं भूमीपूजन डॉ. चेल्लूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. शहरातल्या वकिलांच्या उत्कृष्ट कार्यामुळे खंडपीठाचा दर्जा उंचावला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. अत्याचारासारखं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी येत्या तीन महिन्यात नविन पाणी पुरवठा योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं. ते काल शहरातल्या रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभ तसंच लोकार्पण करतांना बोलत होते. नगरोत्थान योजनेअंतर्गत १०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामं पूर्ण केली जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

****

कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात एक गडी बाद १७१ धावा करत श्रीलंकेवर ४९ धावांची आघाडी घेतली. यात शिखर धवनच्या ९४ धावांचा समावेश आहे. कालचा खेळ संपला तेव्हा लोकशे राहुल ७३ आणि चेतेश्वर पुजारा दोन धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, श्रीलंकेचा संपूर्ण संघ २९४ धावा करून बाद झाला. श्रीलंकेला पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी चार तर उमेश यादवनं दोन बळी घेतले. आज सामन्याचा अंतिम दिवस आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल पहाटे हा अपघात झाला. मृत तिघेही सोलापूरचे रहीवाशी होते.

****

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या चिखली गावाजवळ टँकरनं धडक दिल्यानं एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल सकाळी हे कुटुंब चिखली गावाकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टँकरचा चालक फरार झाला आहे.

*******

No comments: