Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*******
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, चार डिसेंबरपर्यंत उमेदवारी
अर्ज भरता येणार आहेत. नवी दिल्ली इथं आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या
बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. ११ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
असून, १६ डिसेंबरला मतदान तर १९ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सरकार
अजुनही हिवाळी अधिवेशनाची घोषणा करत नसल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी
यावेळी टीका केली. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचंही
त्या म्हणाल्या.
****
ऊसाला हमीभाव, शेतकऱ्यांची
कर्जमुक्ती, सरकारचं शेतकरी धोरण यासह विविध मागण्यांसाठी देशातल्या सुमारे १८० शेतकरी
संघटनांनी आज राजधानी दिल्लीत मोर्चा काढला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू
शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा रामलीला मैदानातून निघाला असून, संसद भवनापर्यंत
जाणार आहे. विविध राज्यातले शेतकरी नेते मोर्चात उपस्थित असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
४८ व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला
आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ८०
देशातले सुमारे २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत. हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या
हस्ते संध्याकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होईल. वांबोलिमच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात होणाऱ्या
या उद्घाटन समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर प्रसिद्ध इराणी चित्रपट
दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या 'बियॉण्ड द क्लाउड्स' या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल. या चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते
अमिताभ बच्चन यांना 'पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. या वर्षी या महोत्सवात कॅनडा चा विशेष
देश म्हणून सहभाग असून, कॅनडाचे आठ सर्वोत्तम चित्रपट दाखवले जाणार आहेत. कॅनडाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते
एटम एगोयान यांना या चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या
दोनशेहून अधिक संकेतस्थळांवरून आधार कार्ड धारकांची नावं, पत्ता आणि शहर यासारखी माहिती
सार्वजनिक झाली असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं म्हटलं आहे. माहिती अधिकार
कायद्याअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्राधिकरणानं ही माहिती दिली.
आधारमध्ये देण्यात आलेली माहिती कधीही सार्वजनिक केली नसून, याबाबत दक्षता घेत अशा
संकेतस्थळांवरून आधारशी संबंधित माहिती हटवल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये
यावर्षी सुरक्षा बलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १९० दहशतवादी ठार झाले असल्याची
माहिती श्रीनगर इथल्या लष्कराच्या १५ कॉर्प्स कमांडींग ऑफीसचे प्रमुख मेजर जनरल जे.
एस. संधू यांनी दिली आहे. १५ कॉर्प्सच्या बदामी बाग इथल्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. या दहशतवाद्यांपैकी ८० जण स्थानिक होते, तर ६६ जणांचा मृत्यू
हा नियंत्रणरेषेलगत घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. या
कारवायांमुळे स्थानिक पातळीवरील परिस्थिती बदलली असून, सध्या काश्मीरमध्ये २०० दहशतवादी
सक्रीय असल्याचं ते म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमधल्या
सीमावर्ती भागातल्या लोकांसाठी लष्कर आणि निमलष्करी दलात भरती होण्यासाठीची मोहीम केंद्र
सरकार लवकरच आयोजित करेल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात
एका कार्यक्रमात ते बोलत होते. या संदर्भातला प्रस्ताव संबंधित विभागांना पाठवला असल्याचं ते
म्हणाले.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी
अवकाळी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरात ढगाळ वातावरण असून, आज सकाळी हलक्या स्वरुपाचा
पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. आज सकाळी पाऊस
झाल्यानं तापमानात घट झाली आहे. या अवकाळी पावसानं द्राक्ष पिकांचं नुकसान होण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
आसाममध्ये गुवाहाटी इथं
सुरु होत असलेल्या आखिल भारतीय मुष्टीयोद्धा संघटनेच्या महिला अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या
खेळाडूंची लढत आजपासून सुरु होणार आहे. प्राथमिक
फेरीत आज ५४ किलो वजनी गटात शशी चोप्रा, ६० किलो वजनी गटात मिझोरामची वनला लरियापुई,
तर ६९ किलो वजनी गटात आस्था पहवाची यांचे सामने होणार आहेत. भारतीय संघात १० खेळाडूंचा
समावेश असून, सुमारे ३० राष्ट्रांचे २०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
*******
No comments:
Post a Comment