Sunday, 19 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

हेतुपुरस्पर कर्ज न फेडणाऱ्या कर्जदारांना परत तीच मालमत्ता खरेदी करण्यापासून रोखण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयानं सर्व बँकांना दिले आहेत. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे दिवाळखोर कायद्याअंतर्गत दिवाळखोरीची प्रक्रिया यशस्वी ठरेल. काही कर्जदार दिवाळखोर नियमाअंतर्गत विक्रीस काढण्यात आलेली मालमत्ता पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अर्थ मंत्रालयाला सांगण्यात आलं, त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. 

****

हिंदी आणि प्रादेशिक भाषांचा योग्य ताळमेळ राहीला तर राष्ट्रीय आणि सांस्कृतिक एकता मजबूत होईल, असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. हैदराबाद इथं आज दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. देशातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषा सशक्त माध्यम असल्याचं ते म्हणाले.

****

देशात स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्वच्छतागृह दिनानिमित्त ट्विटरवरच्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी, खुल्या जागेवर शौच करण्याची संकल्पना संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त केली. महिलांनी ही सर्वोत्तम भेट असेल, असं ते म्हणाले. देशातल्या विविध भागातले स्वच्छतागृह आणि ते बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेले लोक आणि संस्थां यांच्या योगदानामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियानाला गती मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक वक्तव्य करणं हा गुन्हा असून, त्यासाठी पाच वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं एका व्यक्ती विरोधात अपराधाबाबत कारवाई रोखण्यास तसंच प्रथम माहिती अहवाल रद्द करण्यास नकार दिला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक टिपण्णी केल्याच्या विरोधात दाखल याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला.

****

बँकांना आपल्या आवारात आधार केन्द्र स्थापन करण्यासाठीच्या नियमात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं सवलत दिली आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. बँकांनी आपल्या आवारातच आधार केंद्र स्थापन करावीत, तसंच या केंद्रांमध्ये नाव नोंदणी करणारी यंत्र आणि खासगी डेटा एंट्री ऑपेरेटर्स नियुक्त करावेत, या अटीवर नियमांमध्ये ही शिथिलता दिल्याचं त्यांनी सांगितलं.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनामिमित्त मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

****

गोव्यातल्या पणजी इथं उद्यापासून ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. महोत्सवात ४२ भारतीय चित्रपटांसह एकूण २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत.

****

बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जून २०१७ पासूनचं मानधन बाकी आहे, त्यांना ते रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयास दिले आहेत. 

****

भारतीय राज्य घटनेचा मुलभूत आधार महाभारत असून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार करताना राज्य घटना, सर्वोच्च न्यायालय आणि स्त्री या तिनही क्षेत्राच्या समतोल अधिकाराचा समन्वय साधला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रीय न्याय गौरव पुरस्कार सिरपुरकर यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

****

कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. अत्याचारासारखं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद १७१ धावा झाल्या. शिखर धवननं ९४ धावा केल्या. लोकेश राहुल ७२ आणि चेतेश्वर पुजारा सहा धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. भारत ४९ धावांनी आघाडीवर आहे.

****

No comments: