Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
४८ वा भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट
महोत्सव गोव्यातल्या पणजी इथं सुरु झाला. हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या
हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह
हिंदी चित्रपट सृष्टीतले कलाकार या सोहळ्यात उपस्थित आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ८० देशातले
सुमारे २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत.
****
देशातल्या रस्ते आणि महामार्गांवर
वाढत जाणारी गर्दी ही मोठी समस्या असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी
म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पहिल्या स्मार्ट परिवहन संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. गर्दीमुळे प्रदुषण आणि अपघातांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता
व्यक्त केली. भविष्यात मॅथेनॉल, इथेनॉल, बायो सीएनजी आणि ऊर्जा यांचा पर्यायी इंधन
म्हणून वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यावहारीक आणि आर्थिकदृष्ट्या
हे इंधन जास्त योग्य ठरेल, असं ते म्हणाले.
****
वैष्णोदेवीच्या दर्शनाकरता पायी
जाणाऱ्या भाविकांसाठी आणि बॅटरीवर चालणाऱ्या कारसाठी तयार करण्यात आलेला नवीन रस्ता
२४ नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं
स्थगिती दिली आहे. हा रस्ता २४ नोव्हेंबरपासून सुरु करणं शक्य नसल्याचं श्री माता वैष्णोदेवी
विश्वस्त मंडळानं न्यायालयात सांगितलं. नवीन रस्ता बनवण्याचं काम सुरु असून, तो पुढच्या
वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरु करण्यात येईल, असं मंडळानं सांगितलं आहे.
****
माजी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियरंजन
दासमुन्शी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. २००८ साली त्यांना
अर्धांगवायुचा झटका आला होता, तेव्हापासून ते कोमा मध्ये होते. पश्चिम बंगालमधल्या
रायगंज मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाकडून लोकसभेवर निवडून गेले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
स्मृती इराणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दासमुन्शी
यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दासमुन्शी हे राजकीय आणि प्रशासकीय अनुभव असलेले
नेते होते, असं पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष
म्हणून काम करताना त्यांनी, भारतात फुटबॉलला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी महत्वाची
भूमिका पार पाडली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी
स्वयंसेवी संस्थांनी आपल्या कामाची गती वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिले आहेत. मराठवाड्यासंदर्भातल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या स्थितीचा आणि प्रगतीचा
आढावा घेण्यासाठी आज मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद
आणि परभणी इथं नवीन कौटुंबीक न्यायालयं लवकरच सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेला तीन कोटी रूपयांचा
निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत
येणाऱ्या प्रत्येक अर्जाला मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या कर्जमाफीस पात्र सहा हजार १५५ शेतकऱ्यांना मंजुर
झालेली ५० कोटी रुपये इतकी रक्कम राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली आहे. कर्जमाफीस
पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांची अंतिम पडताळणी प्रशासनामार्फत सुरू असून, पडताळणीचं
काम पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल, असं जिल्हा
उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आज शिवसेनेच्या वतीनं कोकणवाडी
परिसरात आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत,
तसंच परिवहन महामंडळानंही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जिल्ह्यात बसच्या अनेक फेऱ्या
रद्द केल्या असल्याचं शिवसेनेनं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे
निवेदन यावेळी बांधकाम विभागाच्या अधिक्षकांना देण्यात आलं. यावेळी शिवसेना महानगर
प्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी
डोणगावकर आदींची उपस्थिती होती.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता
इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राहीला. भारतानं श्रीलंकेसमोर सामना
जिंकण्यासाठी २३१ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र निर्धारित वेळेत श्रीलंकेनं २६ षटकं
तीन चेंडूत सात बाद ७५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारनं चार, मोहम्मद शमीनं दोन, तर
उमेश यादवनं एक गडी बाद केला. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या २४ नोव्हेंबरपासून
नागपूर इथं सुरु होणार आहे.
****
No comments:
Post a Comment