Thursday, 1 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.03.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च  २०१ दुपारी १.०० वा.

****



 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी लाच घेतल्याच्या कथित आरोपावरुन आज विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केली.

 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा आरोप फेटाळून लावला असून, कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं म्हटलं आहे. 

****

 औरंगाबाद महानगरपालिकेच्या सूचनेनुसार जांभाळा शिवारात कचरा टाकण्यासाठी जाणारी गाडी जमावानं पेटवल्याची घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास मिटमिटा इथं घडली. रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावून जमावानं ही गाडी अडवली आणि वाहनातला कचरा पेटवला. प्रसंगावधान राखून चालक मिलिंद घाटे यांनी तत्काळ आग विझवली.

 दरम्यान, औरंगाबाद लेणीजवळ असलेल्या हनुमान टेकडीमागील मोकळ्या जागेत कचरा टाकण्यासाठी महानगरपालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत पंधरा ट्रक कचरा आणण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे या पथकाला माघारी परतावं लागलं.

 दरम्यान, कचराप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरु असून, नारेगाव इथं कचरा टाकण्यासाठी तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी प्रशासनानं न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

****

 पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी आणि गीतांजली ग्रुपचा मालक मेहुल चोकसीच्या एक हजार २०० कोटी रुपयांच्या ४१ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे. यामध्ये मुंबईतले १५ घरं आणि १७ कार्यालयं, तर कोलकाता मधलं शॉपिंग मॉल आणि अलिबागमधल्या फार्म हाऊसचा समावेश आहे.

 दरम्यान, या प्रकरणातला मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याही चार स्थावर मालमत्तांवर आयकर विभागानं टाच आणली आहे. त्यात एक फार्म हाऊस आणि एका सौर ऊर्जा संयंत्राचा समावेश आहे. मोदी आणि चोकसी देशात कुठेही आले तरी कळावं, याकरता आयकर विभागानं लूक आऊट सर्क्युलर जारी केलं आहे.

****

 संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संक्षण खरेदी परिषदेनं लष्कर आणि तटरक्षदलांच्या नऊ हजार ४३५ कोटी रुपये किंमतीच्या शस्त्र खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली आहे. मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी परिषदेनं ४१ हजार मशीनगन आणि साडेतीन लाखांहून अधिक इतर शस्त्रास्त्रांच्या खरेदी आणि उत्पादनाला मंजुरी दिली. ७५ टक्के शस्त्रास्त्रं खरेदी आणि निर्माण श्रेणीअंतर्गत भारतीय उद्योगांकडून घेतली जातील, तर उरलेली शस्त्रास्त्रं कारखाना बोर्डाकडून मिळणार आहेत.

****

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत यापूर्वी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आजपासून नव्यानं ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

****

 फसवणूक करून टॅक्स क्रेडिट मिळवल्याप्रकरणी शाह ब्रदर्स इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रवीण मेहता आणि व्ही. एन. इंडस्ट्रीजचे संचालक विनयकुमार डी. आर्या यांना केंद्रीय वस्तू आणि सेवा कर - सी जी एस टीच्या मुंबई मध्यवर्ती आयुक्तालयानं अटक केली आहे. फसवणूक करून मेहता यांनी पाच कोटी २० लाख रुपयांचं, तर आर्या यांनी दोन कोटी तीन लाख रुपयांचं टॅक्स क्रेडिट मिळवलं होतं. या दोन्ही कंपन्यांनी कागदोपत्री दाखवलेले खरेदी वा विक्रीचे व्यवहार प्रत्यक्षात मात्र झालेच नसल्याचं चौकशीत आढळलं होतं.

****

 गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत औरंगाबाद विभागात गाळ काढण्याच्या कामाला येत्या पाच तारखेपासून प्रारंभ करण्यात येणार असून, या संदर्भातल्या तांत्रिक बाबी येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत जलयुक्त शिवारची २०१७-१८ ची कामं १५ जून पूर्वी पूर्ण करावीत, असंही त्यांनी सांगितलं. औरंगाबाद विभागात ६९९ गाळ काढण्याचं उदिष्ट असून, लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागांचे एकूण ३५१ कामं प्रगती पथावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

 बीड जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटीच्या नियामक समितीची बैठक आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातल्या आरोग्य विषयक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातला उपलब्ध निधी या महिना अखेरपर्यंत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

*****

***






No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...