Friday, 2 February 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.02.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२ फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००

****

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कृषी क्षेत्रावर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे, असं केंद्रीय अर्थमंत्रालयातले व्यय सचिव अजय नारायण झा यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पावर आधारीत आकाशवाणीच्या रेडिओ-ब्रिज या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, त्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत दर देण्याचं केंद्रसरकारनं या अर्थसंकल्पात जाहीर केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तर वित्तिय एकीकरण आणि विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशाची वित्तिय तूट साडेतीन टक्क्यांऐवजी तीन पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले.

****

राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाच्या नियुक्तीचा निर्णय कामगार विभागानं घेतला असून, या अभ्यास गटात विविध कामगार संघटना सदस्यांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे. या अभ्यासगटामध्ये संबंधित संघटनांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी, निलंगेकर यांनी काल कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज आपल्या नियोजित वेळेऐवजी सकाळी साडेअकरा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीत, भाग्यलक्ष्मी स्टील कारखान्यात काल सायंकाळी झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले. क्रेनमधलं भंगार भट्टीत पडल्यानं, वितळलेला लोहरस बाहेर पडून हा अपघात झाला. गंभीर जखमी असलेल्या चार जणांना औरंगाबाद इथं हलवण्यात आलं असून, सहा जणांवर जालना इथं उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन आणि शिरेगाव इथं तीन जणांच्या घरावर धाड टाकून २४ लाख २१ हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. दोन मालवाहू छोटी वाहनंही पोलिसांनी जप्त केली आहेत.

****

परभणी इथल्या सय्यद शाह तूसबूल हक्क यांच्या ऊर्सला कालपासून सुरुवात झाली. १५ फेब्रुवारी पर्यंत चालणारा हा ऊर्स सामाजिक एकतेचं प्रतिक मानला जातो.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...