Friday, 2 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangbad 02.02.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 2 February 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०१ दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. कासगंज इथं नुकत्याच झालेल्या प्रकरणाचा मुद्दा सपाचे रामगोपाल यादव यांनी मांडला. कासगंजला उद्भवलेली जातीय हिंसा ही सत्ताधारी पक्षामुळे झाली असल्याचा आरोप करत सपाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मात्र हा मुद्दा सदनात उपस्थित करता येणार नसल्याचं उपसभापतींनी सांगितल्यानंतर सपाच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. यातच आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी दिल्लीतल्या मालमत्ता जप्त करण्याचा, तर काँग्रेसचे के व्ही पी रामचंद्र राव यांनी आंध्र प्रदेशला मदत देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यात गोंधळ वाढत गेल्यानं उपसभापतींनी कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं.

****

बैलांची झुंज दाखवणारा खेळ जलीकट्टू संबंधित सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं संविधान पीठाकडे वर्ग केल्या आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती आर एन नरीमन यांच्या पीठानं संविधान पीठासाठी यासंदर्भात पाच प्रश्न तयार केले आहेत. तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकार जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यत यासंर्भात कायदा तयार करण्यास सक्षम आहेत का, याचा विचार हे संविधान पीठ करणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

नागालँडमध्ये येत्या २७ फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आहे. भाजपचे नागालँडमधले राज्य प्रदेश समन्वयक, के जेम्स व्हिझो यांनी ही घोषणा केली. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी घेतला असून, तसा संयुक्त जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. तसंच भाजपनं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर त्या पक्षावर खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या सांबा जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. मध्यरात्री सीमेवर गस्तीवर असलेल्या जवानांना या ठिकाणी हालचाल आढळून आल्यानंतर त्यांनी गोळीबार केला.

****

मुंबईतल्या कमला मिल्स अग्निकांड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला कमला मिलचा मालक रवि भंडारीनं, त्याच्याविरुद्धचा खटला मागे घेण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालय दोन आठवड्यानंतर सुनावणी घेणार आहे. भंडारीवर केलेला खुनाचा आरोप त्यानं फेटाळून लावला आहे. आपल्यावर निष्काळजीपणाचा आरोप होऊ शकतो, आणि त्यात जामिनही मिळू शकतो, असं त्यानं याचिकेत म्हटलं आहे. २९ डिसेंबरच्या रात्री लागलेल्या या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता.

****

सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापकावर याची तीव्रता तीन पूर्णांक दोन रिश्टर स्केल इतकी असून, भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २२ किलोमीटर दूर वारणा खोऱ्यातल्या जावळे गावाजवळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विविध वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी जालना जिल्ह्यातल्या परतूर नगरपरिषद आणि मंठा नगरपंचायतीला प्रत्येकी सहा कोटी रुपयांचं विशेष अनुदान मंजूर झालं आहे. या निधीतून परतूर शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे.

****

जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल हाफिज यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांच्याकडे काल सादर केला. पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपल्याला पक्षाच्या कामातून डावललं जात असल्यानं आपण, हा निर्णय घेतल्याचं हाफिज यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

भारतीय खुल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात भारताच्या मेरी कोमनं सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं फिलिपाईन्सच्या जोसे गॅबुकोला चार विरुद्ध एक अशा गुणफरकानं हरवलं. पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या संजीतनं ९१ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या संजर तर्सुनोव याला तीन विरुद्ध दोन अशा गुणफरकानं हरवत सुवर्णपदक पटकावलं. ६० किलो वजनी गटात मनिष कौशिकचा प्रतिस्पर्धी जखमी असल्यानं त्यानं माघार घेतली आणि मनिषला सुवर्णपदकासाठी मैदानात उतरावं लागलं नाही. ९१ किलो वजनी गटात सतिश कुमारनं रौप्यपदक पटकावलं.

****

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं बाल्जेरियाच्या लिंडा झेटचिरी हीचा २१ - १०, २१ - १०, तर सायनानं डेन्मार्कच्या लिने होजमार्क जेर्सफिल्डरचा २१ - १२, २१ - ११ असा पराभव केला केला. उपान्त्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना स्पेनच्या बीट्रीझ कोरलशी, तर सायनाचा सामना अमेरिकेच्या बीवन झांगशी होणार आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतला मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैननं पराभूत केल्यामुळे त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...