Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 01 April 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø लातूर इथं रेल्वे
डबे बांधणी कारखान्याचं भूमीपूजन; दरवर्षी सातशे डब्बे तयार होणार
Ø दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे
अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यातल्या कथित
व्यावसायिक संबंधांची प्राथमिक चौकशी सुरू
Ø देशात आजपासून
नव्या करप्रणालीची अंमलबजावणी
आणि
Ø रेडीरेकनरचा दर
कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
*****
लातूर इथं रेल्वे डबे बांधणी कारखान्याचं काम जलद
गतीने पूर्ण करून लातूर हे औद्योगिक शहर बनवण्याचा निर्धार रेल्वेमंत्री पियुष गोयल
यांनी व्यक्त केला आहे. लातूर इथं तीन टप्प्यात उभारल्या जात असलेल्या मेट्रो रेल्वे
डबे बांधणी कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचं, हरंगुळ रेल्वे स्थानकाजवळ औद्योगिक वसाहतीतल्या
चारशे एकर जागेवर काल रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
भूमिपूजन झालं, त्यावेळी गोयल बोलत होते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
या कारखान्याच्या अनुषंगानं,
इतर लघु आणि मध्यम उद्योग लातूरमध्ये येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या
कारखान्यातून सध्या दरवर्षी सातशे डबे तयार होतील, ही संख्या तीन हजारावर नेण्याचा
मानसही रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, वर्षभरात या कारखान्यातून रेल्वे डब्यांचं उत्पादन
सुरू करून, लातूर विकासाचा नवीन पॅटर्न तयार करण्याचा विश्वास व्यक्त केला. मराठवाड्यातली
प्रस्तावित वॉटर ग्रीड - जलवाहिनी जाळे योजना, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, आदी
योजनांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असून,
त्यासाठी इस्राइलसोबत करार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्र्यांना विविध मागण्याचं निवेदन दिलं.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग सुरु करावा, उस्मानाबाद रेल्वे स्थानकावरील
फलाटाची लांबी वाढवावी, बीदर-मुंबई अतिजलद गाडीचे डबे वाढवावेत आदी मागण्या या निवेदनात
करण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सी
बी आयनं आय सी आय सी आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती
दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यामधील
कथित व्यावसायिक संबंधांबाबत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आय सी आय सी आयनं २०१२
मध्ये धूत यांना तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्ज दिल्यानंतर सहा महिन्यांनी
धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप आहे. धूत यांना
आय सी आय सी आय बँकेकडून मिळालेलं हे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियासह २०
बँकांकडून मिळालेल्या चाळीस हजार कोटी रुपये कर्जाचा भाग आहे. मात्र, या प्राथमिक चौकशीमध्ये
चंदा कोचर यांचा समावेश नसून त्यांच्या चौकशीबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं
सी बी आयनं म्हटलं आहे.
दरम्यान, उर्जा
नूतनीकरण व्यवसायात अडीच लाख रूपये गुंतवण्यापलिकडे दीपक कोचर यांच्याशी कोणतेही आर्थिक
व्यवहार करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरण व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी
दिलं आहे.
****
देशात आजपासून नवी करप्रणाली लागू होत आहे. केंद्र
सरकारनं अर्थसंकल्पात घोषित केलेले सर्व कराची अंमलबजावणी सुरु होत आहे. त्यानुसार
या नव्या आर्थिक वर्षापासून देशभरात काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. मोबाईल,
सोनं, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, दंत चिकित्सेची साधनं, अत्तर, पादत्राणं, रेशीम
कपडे, एलसीडी टीव्ही, खेळण्या, सिगारेट, मेणबत्ती आणि खाद्यतेल या वस्तूंच्या दरात
वाढ होणार आहे. तर, काही निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कच्चे काजू, आदी वस्तू स्वस्त होणार
आहेत.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या तीनशे
अडतीसा व्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना राज्यभरात अभिवादन करण्यात
आलं. मुंबईत विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार
आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे
प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आणि इतर अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
स्वराज्याची राजधानी
असलेल्या रायगड किल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी
शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला अभिवादन केलं. शिवाजी महाराज यांचे विचार
आजही प्रेरक असून, रायगड हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं भागवत यांनी यावेळी नमूद
केलं. श्री शिवपुण्यस्मृती पुरस्कार ही भागवत यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले.
****
देशातल्या अधिकाधिक नागरिकांनी
पारपत्रधारक होऊन देशाच्या विकासात सहभागी व्हावं असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे
सचिव डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं आहे. अहमदनगर इथल्या पारपत्र कार्यालयाचं उद्घाटन
करतांना काल ते बोलत होते. देशातली केवळ ६ टक्के जनता पारपत्रधारक असल्याबद्दल यावेळी
खंत व्यक्त केली. खासदार दिलीप गांधी यावेळी उपस्थित होते. अहमदनगरमध्ये सुरू झालेल्या
या सुविधेचा जिल्ह्यातल्या नागरिकांना लाभ घ्यावा, असं आवाहन गांधी यांनी केलं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
मालमत्तेचे वास्तव बाजारमूल्य- रेडीरेकनरचा दर कायम
ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरवर्षी १ एप्रिल रोजी राज्यात या मूल्यांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ केली जाते.
या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी राज्य शासन आणि
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली उत्पन्नात घट होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
नीति आयोगानं मागास जिल्ह्यांच्या क्रमवारीत उस्मानाबाद
जिल्ह्याचा समावेश केला आहे, या पार्श्वभूमीवर काल उस्मानाबाद इथं रेल्वेमंत्री पियुष
गोयल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
..
केंद्र सरकारच्या निती आयोगानं देशातील 101 जिल्हयातला मानव
विकास निर्देशांक उंचावण्यासाठी महत्त्वाकांशी कार्यक्रम हाती घेतला असून त्या नुसार
पंतप्रधानांनी जिल्हयाच्या विकासाला चालना देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने वाढीव निधी
दिला असून यासाठी निधीची कमतरता नसल्याचं प्रतिपादन गोयल यांनी केलं. यावेळी निती आयोगाच्या
मागास जिल्हयाच्या क्रमवारीत उस्मानाबाद जिल्हा मागास जिल्हयाच्या तिसऱ्या असल्याची
तसंच शिक्षण क्षेत्रात दुसऱ्या तर आरोग्य आणि जलसंसाधण सुविधा मध्ये चौथ्या स्थानी
असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
जालना
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी तात्पुरता निवारा
सुरू करणं, शहरातल्या खुल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क विकसित
करणं आदी २१ ठरावांना सभागृहानं मान्यता दिली. शहरातल्या आठवडी बाजारात ग्रामीण भागातून
भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागाभाडे वसूल केलं जाऊ नये, अशी मागणी
शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केली.
****
परभणी महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण
सभा महापौर मीना वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली, या सभेत २२ लाख ६
हजार रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या
विविध विषयांवर नगरसेवकांनी आपली मतं नोंदवली.
****
राज्यात मराठवाडा आणि
विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल सर्वात
जास्त ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४२, बीड
४१, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन
दिवस राज्यात आणखी उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार-लोहा विधानसभा मतदार
संघातल्या रस्त्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थ संकल्पात राज्य शासनानं ६० कोटी रुपयांचा
निधी मंजूर केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे
ही माहिती दिली. यात कंधार – लोहा मतदारसंघातल्या २२ रस्त्यांच्या कामांसाठी ४७ कोटी
तर मुख्यमंत्री सडक योजतअंतर्गत दोन रस्त्यांसाठी १३ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
****
ईस्टर संडे आज साजरा केला जात आहे. ख्रिस्ती
धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना पठणासह विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर
कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी मिशन
यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या दोन एप्रिल रोजी ‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment