आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीयांच्या गौरव आणि स्वाभिमानाचा उदय होणं, म्हणजेच उदयोन्मुख
भारत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका खाजगी दूरचित्रवाहिनीनं आयोजित केलेल्या ‘रायझिंग इंडिया’ संमेलनात
ते बोलत होते.
सरकार इशान्येकडील राज्यांसाठी जलद
कार्यवाही या नीतीचा अवलंब करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. मोठ्या कालावधिपासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर
भर देण्यात येईल, त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं असमानता आणि असंतुलन यांचा सामना करत
असलेल्या लोकांना, त्याचा लाभ मिळेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
दरम्यान, पंतप्रधान आज नवी दिल्लीत वर्षिक कृषी उन्नती मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या तीन दिवसीय मेळाव्याला
कालपासून सुरूवात झाली. मेळाव्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर लक्ष्य केंद्रीत
करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकास करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये
जनजागृती करणं, हा या मेळाव्याचा उद्देश आहे.
****
केंद्र सरकारविरोधात
तेलगु देशम पक्ष तसंच वाय एस आर काँग्रेसनं दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावासंदर्भात
अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्ष तसंच शिवसेनेकडून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या
अविश्वास प्रस्तावाला, डाव्या पक्षांसह काही पक्षांनी समर्थन देण्याचा निर्णय जाहीर
केला असून, काँग्रेसही या प्रस्तावाला समर्थन देण्याची शक्यता आहे. तेलंगणा राष्ट्र
समितीनं मात्र हा प्रस्ताव राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचं सांगत, प्रस्तावाला समर्थन
देणार नसल्याचं सांगितलं. परवा सोमवारी हा प्रस्ताव लोकसभेत मांडला जाण्याची शक्यता
आहे.
****
किसान सभेनं गेल्या
आठवडय़ात मुंबईत विधान भवनावर काढलेल्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये
दाखल असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रकरणांवर जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे
दोनशे दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या या बैठकीत वन हक्क दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment