Saturday, 17 March 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.03.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 March 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७  मार्च २०१ दुपारी १.०० वा.

****



देशात निर्माण झालेल्या विविध समस्यांमधून काँग्रेस पक्षच मार्ग काढू शकतो, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार देशाला तोडण्याचं काम करत आहे, पण काँग्रेसच्या हातात या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे आणि ते काम सगळ्यांना मिळून करायचं असल्याचं त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितलं. पुढच्या पाच वर्षांसाठी काँग्रेसची धोरणं आणि दिशा या अधिवेशनात निश्चित केली जाणार आहे. तसंच चार महत्वपूर्ण प्रस्ताव यावेळी पारित केले जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 परताव्याबाबतच्या पात्र दाव्यांप्रकरणी विचार करुन त्यांचा लवकरात लवकर निपटारा केला जाईल, असं आश्वासन सरकारनं निर्यातदारांना दिलं आहे. प्रलंबित जीएसटी परताव्याबाबतचे माध्यमांतून प्रसिध्द झालेले किंवा काही व्यापार संघटनांनी दिलेले आकडे पडताळणी न केलेले आहेत. हे आकडे अंदाजांवर आधारित असून त्यातले बहुतांश योग्य नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज मंजूर करताना भारतीय बँकांनी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे, असं ब्रिटीश न्यायालयानं म्हटलं आहे. कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन मधल्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित काही बँक अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश काल न्यायाधीशांनी दिले आहेत. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या घोटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्यानं शेतकऱ्यांनी त्याला विरोध करत, आज सकाळी मुंबई - आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. तसंच सर्वच भाजीपाल्याला मिळणाऱ्या कमी भावाचा निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.

****



 औरंगाबाद शहरात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुकुंदवाडी चौकात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात झाली. विविध पक्ष संघटना, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या अभियानात सहभागी होत परिसर स्वच्छ केला.

****

 नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या मेंढला नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम आज नाम फाउंडेशनच्या वतीनं सुरु करण्यात आलं. या कामाचं उदघाटन उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. यावेळी तहसीलदार अरविंद नरसीकर, नाम फाउंडेशनचे लक्ष्मीकांत मुळे उपस्थित होते.

****

 उस्मानाद जिल्ह्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत असून, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पथकांची स्थापना केली आहे. याअंतर्गत भुम तालुक्यातल्या अंबी इथं शिलीपकुमार रॉय यांचं प्रमाणपत्र बोगस आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आल्याचं उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

 राष्ट्रीयकृत बँकींग क्षेत्रात घोटाळ्याचं प्रमाण वाढलं असून, हा अर्थव्यवस्थेला झालेला रोग असाल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी व्यक्त केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या घोटाळ्याविरोधात पाऊल उचलून सरकारनं दोषींवर तत्काळ कारवाई करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

****



 औरंगाबादच्या बापू सूधा काळदाते प्रतिष्ठान आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भारतीय संविधान परिचय अभ्यासक्रमाचा आज समारोप होणार आहे. विधिज्ञ भगवानराव देशपांडे आणि कल्पलता भारस्वाडकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रताप बोराडे असतील.

****



 बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या इग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या मानांकित सिंधूनं जपानच्या नोजोमी ओकुहाराचा २० - २२, २१- १८, २१ - १८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधू व्यतिरिक्त भारताचे इतर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...