Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२० मार्च २०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
Ø कर्नाटक
सरकारची लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता; अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे
शिफारस
Ø संसदेचं कामकाज
सलग अकराव्या दिवशीही ठप्पचं.
Ø अंगणवाडी सेविकांचं
निवृत्तीचं वय ६५ वर्ष कायम ठेवण्याचा निर्णय
Ø शेतकरी संघटनांच्या
सूकाणू समितीचं राज्यभर 'अन्नत्याग' आंदोलन
आणि
Ø औरंगाबाद शहरातल्या
कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीनं प्रक्रिया करणार - महानगरपालिका आयुक्त
*****
कर्नाटक सरकारनं लिंगायत समाजाला स्वतंत्र लिंगायत
धर्माचा दर्जा देण्यास मान्यता दिली असून, याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे
अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहे. ही मान्यता मिळण्यासाठी कर्नाटकसह महाराष्ट्रातला लिंगायत
समाज आग्रही होता. या मागणीवर विचार करण्यासाठी कर्नाटक सरकारनं सात न्यायाधिशांची
समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारनं लिंगायत समाजाला धर्म
म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल सलग अकराव्या
दिवशीही विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही. तेलगु
देसम पार्टी आणि वाय एस आर काँग्रेस यांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा व्हावी, अशी सरकारची
इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी
केलं. सभापती सुमित्रा महाजन यांनीही सदस्यांना शांत राहण्याचं आणि चर्चा होऊ देण्याचं आवाहन
केलं. मात्र गोंधळ कायम राहिल्यामुळे त्यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.
राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी सदस्यांनी
हौद्यात धाव घेऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. सदस्यांच्या हातातल्या फलकांविषयी
अध्यक्ष एम. व्यंकया नायडू यांनी आक्षेप घेतला. तसंच,
चर्चा सुरु करायला तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं,
त्यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, राजू शेट्टी
यांनी काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन, आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या
प्रश्नांबाबत कॉंग्रेस पक्षासवेत युती करण्याची तयारी दर्शवली. काँग्रेसचे महाराष्ट्र
प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष, अशोक चव्हाण हे शेट्टी यांच्या समवेत होते.
****
अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय, ६५ वर्ष ठेवण्याचा
निर्णय कायम ठेवण्यात आला असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी
काल विधानसभेत सांगितलं. मात्र ६० वर्ष वयानंतर अंगणवाडी सेविकांच्या शारिरीक
योग्यतेची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या जवळपास १३ हजार अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा
फायदा होणार आहे. महाराष्ट्रातल्या
अंगणवाडी सेविकांनी संप केल्यास, अत्यावश्यक सेवा कायदा – मेस्मा लागू
करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात
आलेल्या वाढीव ५० जागा रद्द करण्यासंदर्भात, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं केंद्र सरकारकडे
शिफारस केली आहे. मात्र, या ५० जागा कमी होऊ नयेत, यासाठी शासनानं तत्काळ योग्य ती
कार्यवाही करावी अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल
विधान परिषदेत केली. चव्हाण यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
राज्यात जात पडताळणीची प्रकरणं प्रलंबित असल्याकडेही
चव्हाण यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. यावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी,
राज्यातल्या जात पडताळणी कार्यालयात अध्यक्षांची रिक्त पदं पुढील दोन महिन्यात भरण्यात
येतील असं सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शेतकरी संघटनांच्या सुकाणु समितीतर्फे काल राज्यात
अनेक ठिकाणी 'अन्नत्याग' आंदोलन करण्यात आलं. १९ मार्च, १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या
चिल गव्हाण गावातले शेतकरी, साहेबराव करपे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आत्महत्या
केली होती, ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. यापार्श्वभूमीवर शेतकरी
समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
मराठवाड्यातले सर्व जिल्हे, तसंच नाशिक, धुळे, चंद्रपूर,
भंडारा, गोंदिया, अमरावती, पुणे, यासह अन्य जिल्ह्यांतले शेतकरी या आंदोलनात सहभागी
झाले होते.
****
१९९३ साली लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी आणि परिसरात
झालेल्या प्रलयंकारी भूकंपात, आणि त्यानंतरच्या कालावधीत मरण पावलेल्या भूकंपग्रस्त
नागरिकांच्या वारसांना, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे निर्देश, पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रमाणपत्र बदलून हवे
असल्यास, तेही देण्याची सूचना पाटील यांनी केली आहे. यामुळे भूकंपग्रस्तांसाठीच्या सवलतीचा या प्रमापणपत्र
धारकांना लाभ मिळणं शक्य होणार आहे.
****
औरंगाबाद शहरात ओल्या कचऱ्याबरोबरच सुक्या कचऱ्यावर
देखील शास्त्रोक्त पध्दतीनं प्रक्रिया करण्यात येईल, असं महानगरपालिका आयुक्त नवल किशोर
राम यांनी सांगितलं. या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत काल
ते बोलत होते. सध्या शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. हा कचरा उचलण्यास
प्रथम प्राधान्य राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नारेगाव इथल्या डेपोमध्ये कचरा टाकण्यास उच्च न्यायालयानं
२००३ मध्येच मनाई आदेश दिलेला असतानाही, या
आदेशाचं पालन का केलं नाही, याची चौकशी करण्यात
येत असून, ती चौकशी तीन मिहिन्यात पूर्ण केली जाईल, असं आयुक्त नवल किशोर राम यांनी
सांगितलं.
****
लातूर इथं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात
आला. विमुद्रीकरण, वस्तू सेवा करामुळे देशातले उद्योग व्यापार बंद पडले, त्यामुळे अनेक
युवक बेरोजगार झाल्याचं, पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाचा किती युवकांना फायदा
झाला, असं विचारत, कोते पाटील यांनी मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलनाचा
इशारा दिला.
****
जालना जिल्ह्यात अंबड पोलिसांनी काल राणीउंचेगाव
इथं, अकरा लाख २३ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी
ताब्यात घेतला असून, ट्रक चालकाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
परभणी इथं उद्या पासून २५ मार्चपर्यंत जिल्हा कृषी
महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं
आयोजित हा महोत्सव शहरातल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या पोतरा इथले माजी सैनिक कॅप्टन
दत्तराव रणवीर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर
आज सकाळी अकरा वाजता पोतरा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment