Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
पुणे दहशतवादी पथकानं निगडी,
वानवडी परिसरातून आज तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. हे तिघं, बांग्लादेशानं
बंदी घातलेल्या अन्सार उल्ला बांगला या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं, वृत्त
आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बांग्लादेशी पारपत्र जप्त केले आहेत. पुण्यात काही बांग्लादेशी
नागरिक अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर, दहशतवाद प्रतिबंधक
पथकानं ही कारवाई केली.
****
जम्मू काशमीरमध्ये श्रीनगरनजीक
नुकत्याच झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून सुरक्षा बलाच्या जवानांनी आणखी एका दहशतवाद्याचा
मृतदेह ताब्यात घेतला आहे. गेल्या गुरुवारी एका स्थानिक भाजप नेत्याच्या सुरक्षारक्षकांवर
दहशतवाद्यांनी हल्ला केल्यांनतर ही चकमक झाली होती. त्यावेळी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी
दोघांचे मृतदेह सापडले होते.
****
चारा घोटाळा प्रकरणातल्या
चौथ्या खटल्यावर रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं आजही निकाल सुनावला नाही. याप्रकरणी
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य तीस
जण आरोपी आहेत. झारखंडच्या दुमका कोषागारातून डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान
आर्थिक अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लालु प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणातल्या
पहिल्या खटल्यात पाच वर्ष, दुसऱ्या खटल्यात साडे तीन वर्ष आणि तिसऱ्या खटल्यात पाच
वर्षांची शिक्षा याआधीच सुनावण्यात आली आहे.
****
देशभरातल्या विविध विमानतळांवर आपल्या विसरलेल्या
वस्तु पुन्हा मिळवण्यासाठी प्रवाशांना आता एका मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून
तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं प्रवाशांना तशी सुविधा
उपलब्ध करून दिली आहे. लॉस्ट अॅण्ड फाऊण्ड असं या ॲपचं नाव असून, ते माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या
संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रवक्ते
सहाय्यक पोलिस महानिरीक्षक हेमंद्र सिंग यांनी ही माहिती दिली.
****
कृषी क्षेत्रातल्या नवीनतम तांत्रिक विकासाच्या
माहितीबाबत जागरुकता निर्माण करुन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत
वार्षिक कृषी उन्नती मेळाव्यात बोलत होते. सरकार किमान आधारभूत किंमत उत्पादन
खर्चापेक्षा दीड पट देणार असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज उपलब्ध
करुन देण्यासाठी केंद्र सरकार राज्यांबरोबर मिळून काम करत असून, यासाठी देशातल्या सर्व
प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या
मेळाव्यामुळे एकाच वेळी शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्याशी संवाद साधता येत
असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. पंतप्रधानांनी यावेळी जैविक शेतीसंबधी एका पोर्टलचं
उद्धाटन केलं तसंच तेरा राज्यातल्या कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली.
****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात
गुढीपाडव्याचा सण उद्या साजरा होत आहे. यानिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी
राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडव्याचा मंगल सण तसंच नूतन वर्ष
सर्वांकरता सुख, शांती, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो, असं ते आपल्या शुभेच्छा संदेशात
म्हणाले.
****
केंद्र शासनानं केलेल्या तिहेरी
तलाकच्या विधेयकाविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरातल्या
मुस्लिम महिलांनी आज सकाळी मूकमोर्चा काढला. शहरातल्या जामा मशिदीपासून निघालेला मोर्चा
शहराच्या प्रमुख मार्गावरून एकात्मता चौकात पोहचला. तिहेरी तलाक विधेयक रद्द करावा
अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
जालना तालुक्यात ६३ गावातल्या
संभाव्य पाणी टंचाईचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्हा परिषद सभागृहात आढावा
घेतला. पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये विहीर अधिग्रहण, नळ योजना दुरुस्ती, टँकर सुरु
करणं आदी उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसंच कायमस्वरूपी पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाय योजनांबाबत खोतकर यांनी सरपंचांशी
चर्चा केली. पाणी टंचाई निवारणार्थ कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित
करण्याच्या सूचना खोतकर यांनी दिल्या.
****
लातूर जिल्हा कृषी महोत्सव
येत्या २४ ते २८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी
शासनाच्या विविध विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचं दालन, विविध
स्टॉल्स, धान्य महोत्सव, सेंद्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
****
श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास
टी ट्वेंटी क्रिकेट तिरंगी मालिकेचा अंतिम सामना उद्या भारत आणि बांग्लादेश संघादरम्यान
होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment