Sunday, 18 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशाच्या ऐक्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज पक्षाच्या ८४व्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. युवकांशिवाय देश बदलणं शक्य नसल्याचं सांगून गांधी यांनी, युवक आणि राजकारण्यांमधली दरी हटवण्याचं काम काँग्रेस पक्ष करणार असल्याचं सांगितलं. भ्रष्टाचार आणि बेरोजगारी सध्या देशापुढचं सर्वात मोठं आव्हान असून, काँग्रेस पक्षच देशाला योग्य दिशा दाखवू शकतो, असं त्यांनी नमूद केलं. काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नसल्याचं सांगून, त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. या अधिवेशनात बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली असून, जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीवरही नियंत्रण मिळवता आलं नसल्याचा आरोप केला. या अधिवेशनातून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग शोधून काढणार असून, काँग्रेस पक्ष यात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
केंद्र सरकार सुधारणा, सुशासन आणि नवीन उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज वार्षिक कृषी उन्नती मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं, तसंच नवीन कार्यप्रणालीमुळे नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाबाबत शेतकरी जागरुक झाले असल्याचं ते म्हणाले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं उद्दीष्ट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
****
सामाजिक न्याय विभागानं तृतीयपंथी अधिकार विधेयक मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवलं आहे. संसदीय समितीच्या शिफारशींनुसार या विधेयकात काही सुधारणा करण्यात आल्याचं मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनं पीटीआयशी बोलताना सांगितलं.
****
जागतिक स्तरावर निर्यात वाढवण्यासाठी भारताला आपल्या प्रमुख भागीदारांसोबत संबंध अधिक दृढ करण्याची गरज असल्याचं भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - ॲसोचॅमनं म्हटलं आहे. निर्यातीच्या तुलनेत आयातीचं प्रमाण जास्त असल्यानं व्यापार संघर्ष वाढतो, त्यामुळे भारताला अडचणींचा सामना करावा लागेल, असं महासंघानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
२०१९ पर्यंत राज्य मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज माधव नेत्रालय सिटी सेंटरचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात मोतीबिंदूच्या आजारानी पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण असल्याचं ते म्हणाले. या सर्व रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी शासन उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. कर्करोगाचं त्वरीत आणि अचूक निदान होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
‘अस्मिता योजने’तून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी वितरक म्हणून मागच्या अवघ्या एका आठवड्यात दोन हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचतगट कार्यरत असलेल्या साधारण दोन हजार गावांपर्यंत पहिल्याच आठवड्यात ही योजना पोहोचली आहे. किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांत तर महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणं तसंच त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशानं नुकताच जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
****
जालना तालुक्यात मागील खरीप हंगामात अंतिम पैसैवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या ३५ गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पैसैवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३ पूर्णांक पाच टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तिथं पाणी पुरवठा, कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणं आदी सवलती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली आहे.
****
श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास टी-ट्वेंटी क्रिकेट तिरंगी मालिकेतला अंतिम सामना आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. कोलंबो इथल्या प्रेमदासा मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...