Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 19 April 2018
Time
6.50AM to 7.00AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१९ एप्रिल
२०१८ सकाळी
६.५०
मि.
****
Ø ग्रामीण महाराष्ट्र
उघड्यावर शौचापासून शंभर टक्के मुक्त; बांधलेली शौचालयं वापरण्याबाबत नागरिकांमध्ये
जागरूकता निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
Ø कठुआ लैंगिक अत्याचार
प्रकरणातल्या पीडित बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना, दहा लाख रुपयांचा दंड
Ø नांदेड, बीड आणि
परभणी जिल्ह्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांच्या उपस्थितीत आज विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचं भूमीपूजन
आणि
Ø औरंगाबादच्या
जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नियुक्ती, सुनिल चव्हाण यांची बदली रद्द
*****
राज्याचा ग्रामीण भाग उघड्यावर
शौचापासून शंभर टक्के मुक्त झाल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा
आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. २०१२
पर्यंत पन्नास टक्के ग्रामीण भागात शौचालयं नव्हती, असं एका पाहणीतून स्पष्ट झालं होतं.
२०१४ पासून आतापर्यंत राज्यात, ६० लाख, ४१ हजार १३८ वैयक्तिक, आणि सार्वजनिक शौचालयं
बांधण्यात आल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. उघड्यावर शौचमुक्त योजनेचा पहिला
टप्पा राज्यानं पूर्ण केला असून, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ
झाला. बांधलेली शौचालयं वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, हा या दुसऱ्या
टप्प्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
कठुआ लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आठ वर्षीय पीडित
बालिकेची ओळख उघड करणाऱ्या वृत्तसंस्थांना, दिल्ली उच्च न्यायालयानं, दहा लाख रुपये
दंड ठोठावला आहे. पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल, या वृत्तसंस्थांनी न्यायालयाची माफी
मागितली. या वृत्तसंस्थांनी, एका आठवड्याच्या आत, जम्मू काश्मीरच्या पीडित भरपाई निधीमध्ये,
प्रत्येकी दहा लाख रुपये जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. लैंगिक अत्याचाराच्या
गुन्ह्यांमधल्या, पीडित व्यक्तींची ओळख जाहीर करण्यावर प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याबाबत,
व्यापक जागृती करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नवीन जालना इथल्या सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल तत्वत: मान्यता दिली. पाणी उपलब्धता आणि अन्य अनुषंगिक सुविधा,
आणि प्रकल्प विकसित झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण याबाबत, सविस्तर
अभ्यास करून पुन्हा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. काल
मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित जालना सिडको प्रकल्प
हा मौजे खरपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून
करण्यात आली आहे.
****
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातला
आरोपी ताहिर मर्चंट, याचा काल
पहाटे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झाला. बॉम्बस्फोटप्रकरणी पुण्यातल्या येरवडा
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ताहीर याला, मंगळवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यानं, ससून
रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू
झाला. मार्च १९९३च्या स्फोटानंतर भारत सोडून पळालेल्या ताहीर मर्चंट उर्फ, ताहीर
टकल्याला, २०१०
मध्ये अबुधाबीतून अटक करण्यात आली होती. विशेष टाडा न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा
सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या फाशीला स्थगिती दिली होती.
****
२०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी, खर्चाचा हिशोब विहित कालावधीमध्ये सादर
न केल्यामुळे, एकूण २११ उमेदवारांना, पाच वर्षांकरता उक्त सदस्य म्हणून राहण्यास, किंवा
निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आल्याचं, हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. त्यात हिंगोली तालुक्यातल्या ६७, कळमनुरी
तालुक्यातल्या ५२, सेनगाव तालुक्यातल्या १४, औंढा नागनाथ तालुक्यातल्या ३८, तर वसमत
तालुक्यातल्या ३९ उमेदवारांचा समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते
वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज मराठवाड्यातल्या नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या
दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीत ते ५७ हजार ६७१ कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्गांच्या
कामांचा शुभारंभ करणार आहेत. नांदेड इथं ते विकास कामाचं भूमीपूजन करतील. परभणी आणि
जालना जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग आणि विविध विकास कामांचं ई-भूमीपूजन, तसंच
लोकार्पण सोहळा मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे परभणी इथल्या समाधान शिबिराचा
त्यांच्या उपस्थितीत समारोप होईल. बीड जिल्हा भेटीत फडणवीस आणि गडकरी साडे चार हजार
कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं भूमीपुजन करतील, तसंच अंबा सहकारी
साखर कारखाना परिसरातल्या सभेला मार्गदर्शन करतील.
****
महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल सर्वत्र विविध
कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन
इथं थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत, महात्मा
बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद शहरातल्या
बसवेश्वर चौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. त्यानंतर
बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून, वाहन फेरी काढण्यात आली. तसंच,
शहरात अन्यत्र मिरवणूक, आणि अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड शहरातही यानिमित्त
मिरवणूक काढण्यात आली होती. जालना, हिंगोली, लातूर, बीड इथंही विविध उपक्रमातून महात्मा
बसवेश्वरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त काल औरंगाबाद
शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या ३० ब्राह्मण संघटनांनी
एकत्र येऊन, मिरवणूक काढली.
****
औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी
उदय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर ठाणे महानगरपालिकेचे
अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती रद्द
करून आता चौधरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथल्या अल्पवयीन कब्बडीपटू वरील बलात्कार
प्रकरणी मंगेश गवळी याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दहा वर्ष सक्त मजुरी आणि २० हजार
रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१५ मध्ये ही घटना घडली होती.
****
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यासह सोलापूर
आणि अहमदनगर जिल्ह्यांना भेट देणार आहेत. दोन दिवसांच्या या भेटीत ठाकरे लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत.
****
शक्तिपात दीक्षा मार्गाचे प्रवर्तक
गोविंद पुंड यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं औरंगाबाद इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे
होते. वामनराव गुळवणी महाराज यांचे शिष्य असलेल्या पुंड यांनी दत्त संप्रदायातल्या
लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचा शक्तिपात दीक्षा मार्गाचा प्रसार करण्याचं काम केलं.
यासाठी औरंगाबाद इथं आध्यात्मिक केंद्रही उभारलं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा
वाजता औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी निधीची तरदतूद असूनही,
गेल्या काही वर्षांपासून तो खर्च केला नसल्याच्या निषेधार्थ, प्रहार संघटनेच्यावतीनं
काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं
महापौर नंदकुमार घोडेले यांना घेराव घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या विविध
मागण्या मान्य करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं.
****
ग्रामस्वराज्य अभियाना अंतर्गत, काल लातूर इथं अनेक
ठिकाणी स्वच्छता दिवस, आणि लोकसहभागातून जाणीव जागृती उपक्रम राबवण्यात आले. लातूर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर विपीन इटनकर यांच्या कल्पनेतून आणि प्रत्यक्ष सहभागामुळे आरोग्य केंद्राच्या दर्शनी
भागात, बोलक्या भिंती हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अनेक ग्रामस्थ, शिक्षक,
विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांमधली अनुकरणशील वृत्ती लक्षात घेऊन, त्यांच्या मनात
लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार रूजले, तर ते आपल्या पालकांनाही स्वच्छता मोहीमेत सहभागी करून घेतील, असं इटनकर
म्हणाले.
****
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या, अक्षय तृतीया
या सणा निमित्त काल औरंगाबादसह मराठवाड्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी
गर्दी केली होती. औरंगाबाद शहरात यानिमित्तानं काल वाहन, मालमत्ता आणि सोने खरेदी करण्यात
आली.
*****
***
No comments:
Post a Comment