Thursday, 19 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****



 केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यामूर्ती ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठानं लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथक -  एसआयटी मार्फत चौकशी करण्यास नकार दिला आहे. लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिकच आहे, त्यामुळे त्याची स्वतंत्रपणे चौकशीची गरज नाही, तसंच या याचिका म्हणजे न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बी. एस. लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशन सहित इतर पक्षकारांनी लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या.

 दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलं आहे. राजकीय फायद्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

****



 आधारकार्ड योजनेला अधिक सुरक्षितता देण्यासाठी सुधारित ‘क्यू आर कोड’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्षात १२ आकडी आधार क्रमांक न उघड करता नाव, पत्ता, छायाचित्र, जन्मतारीख अशा कमी संवेदनशील माहितीच्या आधारे व्यक्तीची ओळख सिद्ध होऊ शकेल. आधार संबंधित कायद्यानुसार आवश्यकता असलेल्या बँकिंग, दूरसंचार कंपन्या, तसंच अनुदानासंबंधित व्यवहाराखेरीज इतर सर्व ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं ओळख पटवणं शक्य होईल आणि आधारच्या दुरुपयोगाला आळा बसेल, असं आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी सांगितलं आहे.

****



 बालक, महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये कुपोषण, तसंच जन्मतःच वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशानं २३५ जिल्ह्यांमध्ये पोषण अभियान राबवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या पोषण आभियानाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी वेगळा निधी स्थापन करण्याऐवजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट निधी देण्याच्या मुद्यावर अर्थ मंत्रालयाशी विचार विनिमय करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****



 गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत २८ पूर्णांक तीन शतांश टक्के इतकी वाढ झाली आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं यासंदर्भातली आकडेवारी जारी केली. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत देशांतर्गत विमानसेवा कंपन्यांच्या प्रवासी वहन संख्येत २३ पूर्णांक ८७ शतांश टक्के वाढ नोंदवली गेल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

****



 परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या मानोली इथल्या चार ग्रामस्थांनी आज आपल्या मागण्यांसाठी मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केल्याचं वृत्त आहे. गावातल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी विष प्राशन केलं. यापैकी तिघांना मानवत इथल्या शासकीय रुग्णालयात, तर एकाची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना परभणी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****



 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यासह सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, त्यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं आगमन झालं. लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी सुभेदारी विश्रामगृह इथं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 पीक परिस्थिती आणि पावसाचा अंदाज याबाबत भाष्य करणारी बुलडाणा जिल्ह्यातली पारंपरिक भेंडवळची घटमांडणी आज जाहीर करण्यात आली. यावर्षी पावसाळा चांगला असून, पाणीटंचाई राहणार नाही, तसंच पीकंही चांगलं येईल, असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. भेंडवळच्या घटमांडणीचं हे भाकीत ऐकण्यासाठी राज्यभरातून शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 हैदराबाद विभागात रेल्वे पुलाखाली आर.सी.सी. बॉक्स बसवण्याकरता उद्या आणि २३ एप्रिल रोजी चार तास लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेडहून हैदराबादला जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. या दोन्ही दिवशी नांदेड ते मेडचल आणि पुणे निझामाबाद या गाड्या उशिरा धावणार आहेत.

****



 सहावं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन येत्या २१ आणि २२ एप्रिल रोजी बीड इथं आयोजित करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग संमेलनाचे अध्यक्ष असून, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. या संमेलनात विविध चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

*****

***

No comments: