Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 1 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना
कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या
योजनेत २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले होते, मात्र
या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे विहीत मुदतीत अर्ज
सादर करता आले नाहीत अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली होती, ती आता येत्या १४ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. दीड लाखावरील कर्जासाठी
एकरकमी अर्ज सादर करण्यास ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
संपूर्ण देशात लवकरच हवाई सेवेद्वारे माल वाहतूक करण्याचं
धोरण विचारधीन असल्याचं केंद्रीय नागरी वाहतूक आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी
म्हटलं आहे. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते. रात्रीच्या
वेळी देशांतर्गत विमान सेवा बंद असते त्या वेळेचा उपयोग माल वाहतुकीसाठी करण्यात येणार
असून, छोट्या अंतरासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी
दिली. कोकणच्या आंब्याची अशाच प्रकारे वाहतूक करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात आज सुरक्षा जवान
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यदलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं तर दोन
स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. आज सकाळी झालेल्या या तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये दहा
दहशतवादी मारले गेले तर एका दहशतवाद्यानं आत्मसमर्पण केलं.
****
इराकमधे इस्लामिक स्टेट दहशतवादी
संघटनेकडून मारले गेलेल्या ३९ भारतीयांचे पार्थिव देह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार
राज्यमंत्री व्ही.के.सिंग आज इराकला रवाना झाले. सिंग उद्या परतणार असून, पार्थिव देह संबंधितांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यासाठी ते अमृतसर, पाटणा आणि कोलकाता इथं जाणार
आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं
गेल्या गुरुवारी प्रक्षेपित केलेल्या ‘जी-सॅट-६ ए’ या उपग्रहाशी संपर्क तुटल्याचं, सांगितलं आहे. उपग्रहाशी संपर्क स्थापीत करण्याचे प्रयत्न सुरु असून, हा उपग्रह एलएएम इंजिनाद्वारे दुसऱ्या कक्षेत स्थापित झाला असल्याचंही इस्रोनं सांगितलं आहे.
****
रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकांमधल्या
स्वच्छतेसंबंधी प्रवाशांना आता गुण देता येणार आहेत. प्रवाशांच्या या गुणांवरच संबंधित
कंत्राटदाराचं काम कायम ठेवायचं की नाही, हे ठरवलं जाणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. रेल्वेतल्या अस्वच्छतेचा परिणाम थेट प्रवाशांवर होत असल्यानं या प्रक्रियेत
त्यांचा सहभाग असणं आवश्यक असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रवाशांचा
अभिप्राय जीपीएस प्रणालीवर नोंदवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
- सीबीएसईच्या दहावी अभ्यासक्रमाचा संस्कृत विषयाची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा खुलासा,
सीबीएसईनं केला आहे. सामाजिक माध्यमांवरून व्हायरल झालेली संस्कृत विषयाची प्रश्नपत्रिका
मागच्या एखाद्या वर्षाची असल्याचं, मंडळानं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनी अफवांवर
विश्वास ठेवू नये, अशा संकेतस्थळांना भेटी देऊ नये, तसंच परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून
विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे.
****
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
राज्य शासनाकडून तीन चित्रपट पाठवण्यात येणार आहेत. यात इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी.
या चित्रपटांचा समावेश आहे.
****
अहमदनगर इथले प्रसिद्ध चित्र-शिल्पकार
प्रमोद कांबळे यांच्या कार्यशाळेला आग लागून अनेक चित्रं तसंच शिल्प नष्ट झाली. या
आगीची झळ शेजारच्या पाच मजली इमारतीलाही बसली. या इमारतीला लागलेली आग विझवण्यात अग्निशामक
दलाला यश आलं, मात्र कार्यशाळेची आग विझवण्याचे प्रयत्न गेल्या दोन तासांपासून सुरू
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकसहभाग वाढवून गाव पाणीदार करण्यासाठी
प्रयत्न केल्यास, पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास परभणीचे सहायक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात
सोस इथं शोष खड्ड्याच्या कामाला कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी
ते बोलत होते. पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून हे काम केलं जात आहे. पाण्याचा गावात
तसंच शेतात नियोजनपूर्वक वापर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शिवारफेरी काढून
गाव शिवारात पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातूनच सुरू असलेल्या कामाची यावेळी पाहणी करण्यात
आली.
****
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तापमानात
लक्षणीय वाढ झाली आहे. आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर
इथं नोंदवलं गेलं. परभणी ४२ पूर्णांक दोन, नांदेड ४२ आणि औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक
तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी
तापमानात आणखी वाढ होण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment