Friday, 19 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19  October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑक्टोबर  २०१ दुपारी १.०० वा.

****



 वर्ष २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला स्वतःचं घर देण्याच्या घोषणेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. साईबाबा यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते आज शिर्डी इथं बोलत होते. सर्वांना घर देण्याच्या योजनेतील जवळपास निम्म काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. साईमंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर, या शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलांचं वाटप करण्यात आलं. शिरडीतल्या, चारशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनही यावेळी झालं. २०२२ पर्यंत सगळ्यांसाठी घरकुल,हे पंतप्रधानांचं स्वप्न महाराष्ट्र २०१९पर्यंतच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

****

 दरम्यान, पंतप्रधानांच्या ताफ्याला अडवण्याचा इशारा दिल्याबद्दल भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आग्रह धरणाऱ्या तृप्ती देसाई यांनी या संदर्भात पंतप्रधानांनी चर्चा करण्यासाठी पोलिस अधिक्षकांकडे वेळ मागितला होता. वेळ मिळाला नाही तर त्यांचा मार्ग अडवण्याचा इशारा दिला होता. त्या आज पुण्याहून शिर्डीला जाण्यासाठी निघण्यापुर्वी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****



 सैन्यानं काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात उडी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या भागातील गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले आहेत. सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला दिलेल्या माहितीनुसार भल्या सकाळी काही संशयितांच्या हालचाली जाणवल्यानंतर सतर्क सैनिकांनी त्यांना रोखलं होतं त्यावेळी गोळीबारामध्ये तीन दहशतवादी मारले गेले. ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत, याचा तपास केला जात आहे.

       

 दरम्यान, काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात काल संध्याकाळी उशीरा झालेल्या एका स्फोटात सात सैनिक जखमी झाले. त्रिचाला गावात एका पुलानजिक झालेल्या या स्फोटातील तीन गंभीर जखमींना उपचारांसाठी श्रीनगरमधील सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैन्य दलाच्या वाहनाचं या स्फोटात नुकसान झालं आहे.

****



 कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारीचा तत्काळ  निपटारा करण्याच्या सूचना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला, त्यांची इच्छा असल्यास, ncw.meetoo@gmail.com या इमेल पत्त्यावर पत्र लिहून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****



 ज्या मोबाईल सेवा ग्राहकांना दूरसंचार परिचालकांकडच्या नोंदीमधून आपल्या आधारपत्राचा तपशील वगळण्याची इच्छा आहे, त्यांनी पर्यायी पडताळणी कागदपत्रं सादर करणं आवश्यक असल्याचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. कागदपत्रं बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान सेवा खंडित केली जाणार नाही, असं दूरसंचार विभागानं स्पष्ट केलं आहे. दूरसंचार परिचालकांनी नेहमीच दूरसंचार  विभागाच्या सूचनांचं पालन केलं असून, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचंही पालन केलं जाईल, असं संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटलं आहे.

****



 बीड जिल्ह्यातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसंच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसह दुष्क़ाळाशी संबंधित अन्य मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं  उद्या सकाळी चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, गेवराई, माजलगाव, आंबेजोगाई, केज, वडवणी आणि पाटोदा तालुक्यांमधल्या प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर हे चक्का जाम आंदोलन होईल, अशी माहिती संघटनाजिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे.

****



 उद्या, शनिवारी आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त औरंगाबादमधल्या एमजीएम शिक्षण संस्थेच्या, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अंतराळविज्ञान केंद्रातर्फे अवकाश निरीक्षणाची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या, अपोलो ११ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या चांद्रयानाच्या विशेष प्रतिकृतीचं लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे.

*****

*** 

No comments: