Sunday, 4 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.11.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 सीमेवर जवान ज्या प्रकारे संकटांचा सामना करतात त्याप्रमाणे तरुण डॉक्टरांनी कामाला समर्पित करुन घ्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल ऋषिकेश इथल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलत होते. विविध विषयांमध्ये मुलींनी सुवर्ण पदकं पटकावल्यामुळे गर्व वाटत असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले. हे फक्त महिलांचं समर्पण दर्शवत नसून विविध क्षेत्रात त्यांची वाढती संख्या हे समाज कशा प्रकारे सशक्त होत आहे हेही दर्शवतो असं त्यांनी नमूद केलं.

****



 केरळमध्ये शबरीमाला इथल्या अय्यप्पा मंदिरात काल मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू झाले. महापूजा उद्या होणार असून त्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. सर्व वयोगटातल्या महिलांना मंदिरात प्रवेशाची अनुमती राहील, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निषेधाचे सूर उमटत असल्यानं आणि गेल्या महिन्यात काही हिंसक घटना घडल्यानं मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण दीड हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, मंगळवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील.

****



 देशातले सर्व जिल्हे उघड्यावर शौचमुक्त करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं राज्यं आणि जिल्ह्यांसाठी “स्वच्छ भारत विश्व शौचालय स्पर्धे”चं आयोजन केलं आहे. देशात स्वच्छता मोहिम आणखी तीव्र करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. यातून उत्कृष्ट कार्य करणारे दहा जिल्हाधिकारी, तीन स्वच्छता संचालक आणि स्वच्छतेचे प्रभारी सचिवांची निवड करुन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

****



 परभणीमधल्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालयातला उपकार्यकारी अभियंता युनुसखान इब्राहिमखान याला आठ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदार हे त्याच कार्यालयात कनिष्ठ अभियंता असून त्यांची ५० दिवसांची आजारी रजा मंजूर करण्यासाठी आरोपीनं ही लाच मागितली होती. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...