Thursday, 7 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v आयकर विवरणपत्रं भरण्यासाठी  कायम खाते क्रमांक पॅन आधार क्रमांकाशी जोडलेला असणं अनिवार्य

v चित्रपटांची पायरसी रोखण्यासाठी १९५२ च्या छायाचित्रण कायद्यात सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

v दुष्काळ तीव्र असला तरी नागरिक आणि जनावरं उपाशी राहणार नाहीत - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

v राज्य शासनाचे विविध सांस्कृतिक पुरस्कार जाहीर; पुरस्कार प्राप्त कलावंतांमध्ये अभिनेते रवी पटवर्धन, गायिका माधुरी ओक यांचा समावेश

आणि

vदिव्यांग व्यक्ती तसंच त्यांच्या साथीदाराला शिवशाही बस  च्याप्रवास भाड्यात लागू

****



 आयकर विवरणपत्रं भरताना करदात्याचा कायम खाते क्रमांक पॅन हा आधार क्रमांकाशी जोडलेला असणं अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं दोन व्यक्तींना आधार आणि पॅन क्रमांकांची जोडणी न करता आयकर विवरणपत्रं भरण्याची अनुमती दिली होती, या निर्णयाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं कायम खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जोडलेला असणं, आवश्यक असल्याचं नमूद केलं.

****



 चित्रपटांची पायरसी रोखण्यासाठी १९५२ च्या छायाचित्रण कायद्यात सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, यानुसार अवैध पद्धतीनं छायाचित्रण करणं, तसंच चित्रपटांच्या बनावट प्रती तयार करणं हा दंडनीय अपराध असेल.



 आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांमध्ये सर्व सेवांच्या नियमनासाठी एकीकृत प्राधिकरण स्थापना, अनियमित बचत प्रतिबंध विधेयकात दुरुस्ती, राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना तसंच राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन विधेयकालाही मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली.

****



 दुष्काळ तीव्र असला तरी नागरिक आणि जनावरं उपाशी राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. बीड इथं, जिल्हा रुग्णालयात, माता - बालसंगोपन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिलं नाही, इतकं, म्हणजे पंचाहत्तर हजार कोटी रुपये अनुदान सरकारनं थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, जयदत क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीड शहरातल्या विविध विकास कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला.



 दरम्यान, धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आपणच केंद्राकडे पाठवू आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल हिंगोली इथल्या शेतकरी आणि बचत गट मेळाव्यात बोलताना दिलं. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसे पोहोचत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरूच राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हिंगोली नगरपालिकेनं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

****



 २०१७ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नाट्य लेखक अभिराम भडकमकर, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्यासह देशभरातल्या ४२ कलाकारांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 राज्य शासनाचे विविध सांस्कृतिक पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. नाट्य क्षेत्रातल्या योगदानासाठी रवी पटवर्धन यांना, कंठसंगीतासाठी माधुरी ओक यांना, तर उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपटातल्या योगदानासाठी उषा नाईक यांना, नृत्य कलेसाठी माणिकबाई रेंडके, वाद्यसंगीतासाठी पंडित प्रभाकर धाकडे, तमाशासाठी चंद्राबाई आवळे, लोककलेसाठी मोहन कदम, कलादानसाठी श्रीकांत धोंगडे, कीर्तनासाठी हरिभक्त परायण विनोदबुवा खोंड, तर शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.



 राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन कवठेकर यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये, असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. विक्री करताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं आहे. केंद्र शासनानं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पंचाहत्तर रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी करण्यासाठी आतापर्यंत एकशे चौतीस तूर खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली असून, आतापर्यंत १७ हजार २६४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांकडून आधारभूत किंमतीहून कमी किमतीत तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

****



 शाश्वत स्वच्छता ही काळाची गरज असून, महाराष्ट्र हा शाश्वत स्वच्छतेतही अग्रेसर राहणार असल्याचा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद २’ या जाहिरात अभियानाचा प्रारंभ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झाला, त्यावेळी लोणीकर बोलत होते.

****



 असंघटित कामगारांसाठी येत्या अधिवेशनापूर्वी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येईल, असं कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटलं आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते.



 दरम्यान, राज्यातल्या कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा सुलभतेनं आणि परिणामकारकरित्या पुरवण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्याला प्राधान्य द्यावं, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत  दिले. कामगार राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक मंडळाच्या ११२व्या बैठकीत ते बोलत होते.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

 ****



 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एस टी.च्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासभाड्यात सवलत देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. दिव्यांग व्यक्तीला प्रवास भाड्यात ७० टक्के तर त्यांच्या सहप्रवाशाला ४५ टक्के सवलत देण्यात येणार असल्याचं रावते यांनी सांगितलं. सध्या महामंडळामार्फत साध्या आणि निमआराम बसमधून दिव्यांग प्रवाशांना ७५ टक्के आणि त्यांच्या साथीदारास ५० टक्के सवलत देण्यात येते. दिव्यांगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे. कुलकर्णी यांनी २०१२-१३ मध्ये नगरसेवक असतांना, प्रवास आणि इतर भत्यांच्या रक्कमेचा हा अपहार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन नगरसेवकांनी केला होता, त्यावरुन नगरविकास राज्यमंत्र्यांनी हा अपात्रतेचा आदेश जारी केला होता.

****



 राज्यातल्या मराठा समाजातल्या ५० हजार तरूणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी येत्या  मार्चपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि सहकारी बॅंकांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचं हे कर्ज असेल. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. 



 या कर्जावरचं संपूर्ण व्याज सरकार भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या बॅंकांना दीड हजार  कर्ज प्रकरणं मंजूर करण्याचं उद्दिष्ट दिलं आहे.

****



 बळीराजा सबलीकरण योजनेअंतर्गत  लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या आत्महत्या ग्रस्त नऊ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत जिल्हा बँकेचे संचालक  रमेश कराड यांच्या हस्ते काल रेणापूर पंचायत समिती इथं  देण्यात  आली. नापीक आणि इतर कारणांने या  नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भारत आणि न्यूझीलंडदरम्यान काल वेलिंग्टन इथं महिला आणि पुरुषांच्या पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचे दोन्ही संघ विजयी झाले. न्युझीलंडच्या महिला संघानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत चार बाद १५९ धावा केल्या. भारतीय महिला संघ १३९ धावांतच सर्वबाद झाला.



 दुसऱ्या सामन्यात, न्युझीलंडच्या पुरुष संघानं भारतीय पुरुष संघाचा ८० धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. उत्तरादाखल भारतीय संघ १३९ धावांत सर्वबाद झाला.

मालिकेत दोन्ही संघाचा दुसरा सामना उद्या ऑकलंड इथं होणार आहे.

****



 नांदेड जिल्ह्यासाठी एकशे पंचवीस कोटी शहात्तर लाख रुपयांची दुष्काळी मदत मंजूर झाली आहे. त्यात पहिल्या टप्यात देगलूर, मुखेड आणि उमरी या तालुक्यांतल्या शेतकऱ्यांसाठी २५कोटी ७५ लाख ५६ हजार रूपये निधी प्राप्त झाल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली . जिल्ह्यातल्या देगलूर, मुखेड आणि उमरीसह अन्य चौदा महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा पंचायत समितीतला संगणक परिचालक सचिन देशमुख याला पाचशे रुपयांची लाच घेताना उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. घरकुलाच्या कामाचं देयक काढण्यासाठी देशमुख यानं ही लाच मागितली होती.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...